BMW 5 Series launched in India: दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांपैकीच एक म्हणजेच बीएमडब्ल्यू मोटरराड इंडिया. भारतातील लक्झरी कार बनवणारी कंपनी BMW India ने अलीकडेच आपल्या बहुप्रतिक्षित गाड्या नुकत्याच दिल्लीत लाँच करुन बाजारपेठेत मोठी खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने बीएमडबल्यू ५ सीरीज लाँग व्हिलबेस, मिनी कूपर एस आणि ऑल इलेक्ट्रिक असलेली मिनी कंट्रीमॅन या कार सादर केल्या आहेत. त्याचबरोबर बीएमडब्ल्यू मोटार्डनं CE04 ही पहिली प्रिमियम इलेक्ट्रिक दुचाकीसुध्दा बाजारात दाखल केली आहे. या गाड्यांमध्ये विशेष कोणते फीचर्स आपल्याला पाहायला मिळणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे, चला तर जाणून घेऊया. BMW CE04 Electric Scooter बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियाने लाँच केलेली CE04 दुचाकी आपल्या हटके माॅडलने सर्वांच लक्ष वेधत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ८.५kwh क्षमतेचं बॅटरी पॅक आहे जे एका चार्जवर १३० किमीपर्यंतची रेंज देऊ शकतं. शिवाय २.३ किलोवॅटचा मोफत होम चार्जरही देण्यात आला आहे, ज्यामुळे साडेतीन तासांत शून्य ते ८० टक्क्यांपर्यंतची बॅटरी चार्ज करता येणार आहे. त्याचबरोबर पर्यायी बीएमडब्ल्यू वाॅलबाॅक्स चार्जरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. CE04 ची लिक्विड कुल्ड इलेक्ट्रिक मोटर ४२एचपी जनरेट करते, जे स्कूटर केवळ २.६ सेकंदात ० ते ५० प्रितितास वेगात वाढवण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला. यातील खास वैशिष्ट्य म्हणजे, ऑटोमॅटिक स्टेबिलिटी कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह १०.२५ इंचाचा टीएफटी डिस्प्ले, तीन रायडिंग मोड (इको, रेन, रोड) आदींचा समावेश आहे. या नव्या CE04 इलेक्ट्रिक दुचाकीची किंमत तब्बल १४ लाख ९० हजार इतकी आहे. Mini Countryman EV समुहाने मिनी कूपर आणि ऑल इलेक्ट्रिक असलेली मिनी कंट्रीमॅन लाँच केली आहे. १५० किलोवॅट/२०४ एचपी आणि जास्तीत जास्त २५० न्यूटन-मिटर (Nm) टॉर्कसह ऑल इलेक्ट्रिक मिनी कंट्रीमॅन ८.६ सेकंदात ० ते १०० किमी धावते. यामध्ये ६६.४५kwh किलोवॅट तास क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो एकदा चार्ज केल्यानंतर ४६२ किमीपर्यंतच्या (WLTP) श्रेणीसह येतो. डीसी चार्जरचा वापर करून अर्ध्या तासात शून्य ते ८० टक्क्यांपर्यंत चार्जिंग केली जाऊ शकते. मिनी कंट्रीमॅनची किंमत ५४ लाख ९० हजार इतकी आहे. (हे ही वाचा : किंमत ४४ हजार रुपये, मायलेज ५३ किमी, भारतातील बाजारपेठेत TVS च्या ‘या’ बाईकला मोठी मागणी ) Mini Cooper S मिनी कूपर एस ही या वर्षातील चौथ्या जनरेशनची माॅडल आहे. यामध्ये २.० लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, ज्याची क्षमता २०४ एचपी आणि ३०० एनएम आहे. शिवाय यामध्ये ७ स्पीड ड्युअल कल्च ट्रान्समिशन सिस्टम देण्यात आलं आहे. कंपनीचा दावा आहे की, मिनी कूपर एस ६.६ सेकंदात शून्य ते १०० किमी प्रतितास वेग पकडते जे आधीच्या माॅडेलपेक्षा जास्त वेगवान आहे. मिनी कूपर एसची किंमत ४४ लाख ९० हजार इतकी आहे. BMW Series 5 LWB बीएमडबल्यूने आठव्या जनरेशनची ५ सीरीज लाँग व्हीलबेस असलेली कार लाँच केली आहे. जर्मन कार उत्पादक कंपनीची ही प्रीमियम सेडान पहिली उजव्या बाजूने चालवली जाणारी कार आहे, ज्याची किंमत ७२ लाख ९० हजार इतकी आहे. सप्टेंबर महिन्यात या माॅडेलच्या विक्रीला सुरुवात होईल. कंपनीने ५३०LiM स्पोर्ट या एकाचप्रकारात कार लाँच केली आहे. या श्रेणीतील ही सर्वात मोठी गाडी आहे, ज्याची लांबी ५१६५ मिमी, रुंदी २१५६ मिमी, उंची ११५८ मिमी आणि व्हीलबेस ३१०५ मिमी इतका आहे. व्हीलबेसचा बाह्य भाग मोशन आणि आकर्षक स्पोर्टी कॅरेक्टर दर्शवतो. कारमध्ये सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह २.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे. दरम्यान, बीएमडबल्यू इंडिया समुहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पवाह म्हणाले की, "५ सीरीज लाँग व्हीलबेस अधिक आरामदायक, डिजिटल आणि डायनॅमिक अनुभव देईल. भारत हे जगातील पहिलं उजवं हँड ड्राईव्ह मार्केट आहे, ज्याने सर्व नवीन ५ सीरीज व्हीलबेस अवतारात सादर केल्या आहेत. त्यामुळे हा माॅडेल भारतातील आमच्या प्रीमियम ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आल्याचं," पवाह यांनी नमूद केलं.