वाहनांच्या किंमती आधीच वाढलेल्या आहेत. त्यात इंधनाच्या वाढलेल्या किंमती खिसा अधिक सैल करत आहेत. अशात वाहन प्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. वाहनांच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात उत्सर्जनाचे कडक नियम लागू होणार आहेत. याने वाहनांना अपडेट करण्यासाठी वाहन कंपन्यांची गुंतवणूक वाढणार आहे. परिणामी प्रवाशी आणि व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय वाहन उद्योग सध्या आपल्या वाहनांना बीएस – ६ उत्सर्जन मानकांच्या दुसऱ्या टप्प्याशी जळुवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. असे झाल्यास उत्सर्जनाचे मानक युरो – ६ मानकांच्या बरोबरीत येतील.

(सेकंड हँड बाईक घेण्यासाठी घाई करू नका, आधी ‘या’ गोष्टी तपासा, नुकसान टळेल)

उत्पादन खर्च वाढेल

चारचाकी प्रवाशी आणि व्यावसायिक वाहनांना नवीन मानकांनुसार बनवण्यासाठी त्यामध्ये दुसरे उपकरण लावावे लागेल. अशा स्थितीत वाहन निर्मितीचा खर्च वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी त्याचा भार पुढील आर्थिक वर्षापासून खरेदीदारांना सोसावा लागणार आहे. नवीन उत्सर्जन मानकांवर खेर उतरण्यासाठी वाहनांमध्ये उत्सर्जनवर नजर ठेवणारे उपकरण लावावे लागेल.

हे बदल करावे लागतील

उत्सर्जनावर नजर ठेवणारे उपकरण कॅटेलिक कन्व्हर्टर आणि ऑक्सिजन सेन्सर सारख्या आनेक भागांवर नजर ठेवेल. वाहनातील उत्सर्जनाचे प्रमाण ठरलेल्या मानकांपेक्षा अधिक वाढल्यास हे उपकरण वाहनाची सर्व्हिसिंग करण्याची वेळ आल्याची माहिती देईल. तसेच, वाहनात वापरल्या जाणाऱ्या इंधनाची पातळी नियंत्रित करण्यासाठी वाहनांमध्ये एक प्रोग्राम्ड इंधन इंजेक्टर लावले जाईल. हे इंजेक्टर पेट्रोल इंजिनमध्ये पाठवण्यात येणाऱ्या इंधनाचे प्रमाण आणि त्याच्या वेळेवरही नजर ठेवेल. तसेच, इंजिनचे तापमान, ज्वलनासाठी पाठलेला हवेचा दाब आणि उत्सर्जनात सोडल्या जाणाऱ्या कणांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहनात वापरण्यात येणाऱ्या सेमिकंडक्टर चीपला देखील अपडेट करावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

(‘या’ आहेत जगातील सर्वात वेगवान कार्स, लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात)

तज्ज्ञ काय म्हणतात?

नवीन मानके लागू झाल्यास वाहानांच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पण, किंमतीत झालेली वाढ ही बीएस ४ आणि बीएस ६ कडे वाटचाल करताना झालेल्या वाढीपेक्षा कमीच असेल. गुंतवणुकीचा मोठा भाग वाहनातील उत्सर्जनाची ओळख करणारे उपकरण लावण्याबरोबरच सॉफ्टवेयर अपडेटमध्ये जाईल. बीएस – ६ च्या पहिल्या टप्प्यात लागलेल्या खर्चापेक्षा दुसऱ्या टप्प्यातील खर्च कमी राहील, असे इक्रा रेटिंग्सचे उपाध्यक्ष रोहन कंवर गुप्ता यांचे म्हणणे आहे.

उत्सर्जन मानक म्हणून बीएस ६ चा पहिला टप्पा २०२० साली लागू करण्यात आला होता. या मानकानुसार वाहनांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी कंपन्यांना ७० हजार कोटींची गुंतवणूक करावी लागणार होती. मानकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर वाहन निर्मिती कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचे अध्यक्ष विजय नाकरा यांनी इंजिन क्षमता वाढवणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या सर्व वाहनांना बीएस ६ च्या दुसऱ्या टप्प्याच्या मानकांच्या लायक करणार असल्याचे नाकरा यांनी सांगितले. यासाठी इंजिन क्षमता विकसित करण्यावर भर दिल जाईल, असे ते म्हणाले.