Hero Destini 110 Classic Edition Launched: भारतीय दुचाकी बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन कंपन्या सातत्याने नवनवीन मॉडेल्स आणि त्यांच्या विशेष आवृत्त्या सादर करत असतात. कधी आकर्षक रंगसंगती, तर कधी आधुनिक तंत्रज्ञान आणि आरामदायी सुविधांच्या जोरावर कंपन्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. सणासुदीच्या काळात अशा नव्या वाहनांची मागणीही वाढते. याच पार्श्वभूमीवर हिरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय स्कूटरला नवा आणि आकर्षक लूक देत बाजारात नवीन पर्याय आणला आहे.
कंपनीने डेस्टिनी ११० क्लासिक एडिशन ही विशेष आवृत्ती लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये निओ-रेट्रो म्हणजे जुन्या काळातील डिझाइनची झलक आणि आधुनिक शैली यांचा मेळ घालण्यात आला आहे. नवीन ड्युअल-टोन रंग, आकर्षक पट्ट्या आणि खास ३डी बॅजमुळे ही स्कूटर आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळी दिसते. दैनंदिन वापरासाठी आवश्यक सुविधा कायम ठेवत तिच्या बाह्यरूपात बदल करण्यात आले आहेत.
दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध
डेस्टिनी ११० क्लासिक एडिशन दोन नवीन रंगसंगतींमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मॅट गोल्डफिश सिल्व्हर आणि लाईट इंडस्ट्रीयल ग्रे या रंगांसोबत तपकिरी आतील पॅनेल्स देण्यात आले आहेत. दुसरा पर्याय मॅट एरिस ब्राऊन रंगात असून त्यामध्ये काळ्या रंगाचे आतील पॅनेल्स आहेत.
स्कूटरच्या पुढील हँडल कव्हर आणि बाजूच्या भागांवर विशेष पट्ट्या देण्यात आल्या आहेत. रंगसंगतीशी जुळणारे आरसे आणि आसन, ३डी क्लासिक एडिशन बॅज तसेच ब्रँडेड रिम टेप यामुळे तिच्या लूकमध्ये वेगळेपणा जाणवतो.
लांब सीट आणि प्रशस्त जागा
कुटुंबातील सदस्यांसाठी आरामदायी प्रवास महत्त्वाचा असल्याने या स्कूटरमध्ये ७८५ मिमी लांबीचे आसन देण्यात आले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या प्रकारातील हे सर्वांत लांब आसन आहे. यामुळे चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला अधिक आराम मिळण्यास मदत होऊ शकते. याशिवाय पाय ठेवण्यासाठीही प्रशस्त जागा देण्यात आली आहे.
स्कूटरमध्ये पुढील आणि मागील बाजूस १२ इंचांची चाके आहेत. मागील बाजूस १००/८०-१२ आकाराचा रुंद टायर देण्यात आला आहे. सामान ठेवण्यासाठी आसनाखाली १९ लिटरची जागा मिळते. तसेच पुढील बाजूस मोबाईल चार्जिंग सुविधेसह स्टोरेज कप्पा आणि सामान ठेवताना उपयोगी पडणारा दिवाही देण्यात आला आहे.
इंजिन आणि आधुनिक सुविधा
या स्कूटरमध्ये ११० सीसीचे सुधारित इंजिन देण्यात आले आहे. इंधनाची बचत करण्यासाठी हिरो मोटोकॉर्पचे i3S तंत्रज्ञानही यात आहे. याशिवाय एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि पोझिशन लॅम्प देण्यात आले आहेत. डिजिटल आणि अॅनालॉग अशा दोन्ही प्रकारांची माहिती दाखवणारे स्पीडोमीटर, अलॉय व्हील्स आणि क्रोम सजावट यामुळे स्कूटरचे रूप अधिक आकर्षक बनते.
किंमत किती आहे?
डेस्टिनी ११० क्लासिक एडिशन ही स्कूटर हिरो मोटोकॉर्पच्या अधिकृत वितरकांकडे उपलब्ध आहे. तिची एक्स-शोरूम किंमत ७६ हजार ४०० रुपये (दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे आकर्षक नवा लूक आणि दैनंदिन वापरासाठीच्या सुविधा असलेली स्कूटर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक नवीन पर्याय ठरू शकतो.
