Hero Passion Plus Disc Brake Variant Launched: दैनंदिन कार्यालय, महाविद्यालय किंवा शहरातील प्रवासासाठी विश्वासार्ह, इंधनाची बचत करणारी आणि आधुनिक सुविधांनी सज्ज अशी बाईक शोधणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक हिरो कंपनीने आपल्या लोकप्रिय कम्प्युटर बाईकमध्ये मोठे बदल करत तिचे नवे रूप बाजारात आणले आहे. या नव्या मॉडेलमध्ये सुरक्षितता, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक वैशिष्ट्यांचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या बाईकमध्ये करण्यात आलेले बदल पाहिल्यानंतर अनेक ग्राहकांचे लक्ष तिच्याकडे वेधले जाण्याची शक्यता आहे.

सुरक्षिततेत मोठी भर

हिरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय Hero Passion+ चे Disc व्हेरिएंट भारतीय बाजारात सादर केले आहे. या नव्या बाईकमधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे समोरील डिस्क ब्रेक. यापूर्वी उपलब्ध असलेल्या ड्रम ब्रेकच्या तुलनेत डिस्क ब्रेक अधिक प्रभावी ब्रेकिंग देतो. अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास वाहनावर अधिक चांगले नियंत्रण मिळते, त्यामुळे चालकाचा आत्मविश्वास वाढतो आणि अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होते. शहरातील दाट वाहतुकीत हा बदल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आधुनिक डिजिटल मीटरची सुविधा

या बाईकमध्ये आता पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, यामुळे वाहन चालवताना आवश्यक असलेली सर्व माहिती स्पष्ट आणि सहजपणे दिसते. वेग, ट्रिप मीटर, ओडोमीटर, प्रत्यक्ष मायलेज, इंधनाची पातळी, सर्व्हिस रिमाइंडर अशा अनेक माहितींसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधाही देण्यात आली आहे, त्यामुळे मोबाईलवरील कॉल आणि संदेशांचे अलर्ट थेट डिस्प्लेवर पाहता येतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी हे फीचर विशेष आकर्षण ठरणार आहे.

रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित

या नव्या बाईकमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आला आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाश असलेल्या रस्त्यांवर अधिक स्पष्ट प्रकाश मिळतो. परिणामी, वाहन चालवताना सुरक्षिततेत भर पडते. याशिवाय साइड स्टँड इंजिन कट-ऑफ हे महत्त्वाचे फीचरही देण्यात आले आहे. साइड स्टँड खाली असताना इंजिन सुरू होत नाही, त्यामुळे स्टँड खाली ठेवून वाहन चालवण्यामुळे होणाऱ्या अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.

इंधन बचतीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

या बाईकमध्ये १०० सीसी क्षमतेचे सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले असून ते बीएस-६ आणि ओबीडी-२ फेज-ए नियमांनुसार विकसित करण्यात आले आहे. हे इंजिन ७.९१ बीएचपी इतकी कमाल शक्ती आणि ८.०५ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. त्याचबरोबर कंपनीचे आय-थ्री-एस तंत्रज्ञानही यात देण्यात आले आहे. वाहतूक सिग्नलवर किंवा बराच वेळ वाहन थांबले असताना इंजिन आपोआप बंद होते आणि क्लच दाबताच पुन्हा सुरू होते, त्यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होते.

कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक तब्बल ७१ किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते, त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्यांसाठी ही बाईक खर्च कमी करणारा पर्याय ठरू शकते.

बाईकची किंमत?

ही सर्व आधुनिक वैशिष्ट्ये घेऊन या नव्या बाईकची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ८० हजार ३२८ रुपये निश्चित करण्यात आली असून, सुरक्षितता, आधुनिक फीचर्स आणि उत्कृष्ट मायलेज यांचा विचार करता कम्प्युटर बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.