जागतिक बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिकवर धावण्याऱ्या गाड्यांचा बोलबाला आहे. त्यात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतीय बाजारात गेल्या अनेक दिवसात नव्या इलेक्ट्रिस स्कूटर लॉन्च झाल्या आहेत. त्यात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे तरुण आणि व्यवसायिकांचा कल इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे वाढला आहे. वाढतं प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. ‘फेम’ योजनेंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर सबसीडी दिली जात आहे.

शहरांमध्ये ई-स्कुटरच्या मागणीत २२०.७ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसत आहे. जस्ट डायल कंज्युममर इनसाइट सर्व्हेने हा अहवाल दिला आहे. तर इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत ही वाढ १३४.४ टक्के आणि इलेक्ट्रिक बाइकच्या बाबतीत ११५.५ टक्के इतकी आहे. इलेक्ट्रिक सायकलही यात मागे नाही. इलेक्ट्रिक सायकलच्या मागणीत ६६.८ टक्के वाढ झाली आहे. मोठ्या शहरांसोबत छोट्या शहरातही इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. म्हैसूर, इंदौर, जयपूर, सुरत, आग्रा, जोधपूर, सांगली, वडोदरा, नाशिक आणि चंदीगड या शहरात सर्वाधिक मागणी आहे.

देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांची मागणी ही दिल्लीत आहे. गेल्या काही दिवसात दिल्लीत सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. त्यानंतर मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याचा नंबर येतो. चार्जिंग स्टेशन्सची संख्या आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बिघाड झाल्यास त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारल्यास वाहनांची विक्री आणखी वाढणार आहे.