गेल्या दोन वर्षात कार उत्पादक क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. करोना संकट आणि लॉकडाउनमुळे या क्षेत्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. हळूहळू जनजीवन रुळावर येत असताना सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या उत्पादनात घट दिसून आली आहे. ब्रिटनमध्ये १९५६ नंतर कारचं उत्पादन घटल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. गेल्या ६६ वर्षातील ही निच्चांकी नोंद आहे. त्याचबरोबर होंडा कारखाना बंद झाल्यामुळे त्याचा परिणाम जाणवत असल्याचं देखील नमूद केलं आहे. सोसायटी ऑफ मोटर मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स (एसएमएमटी) ने म्हटले आहे की, २०२१ मध्ये यूकेमध्ये ८,५९,५७५ कारची निर्मिती केली. २०२० या वर्षाच्या तुलनेत ६ ते ७ टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून आलं आहे. २०१९ या वर्षातही १.३ दशलक्षाहून अधिक गाड्यांचं नोंदणी झाली होती. त्या तुलनेत २०२० मध्ये करोना संकटाचा फटका बसला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२१ या वर्षात कार उत्पादनात घट झाल्यानंतर एसएमएमटीचे सीईओ माईक हॉवेस म्हणाले की, “२०२१ यूके कार उत्पादनासाठी आणखी एक कठीण वर्ष होते, दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वात वाईट वर्ष होते.” सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे ऑटो क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्याचा यूके कार उद्योगालाही फटका बसला आहे. वाहन निर्मितीसोबत वितरणावरही परिणाम झाला आहे. २०२१ च्या सुरुवातीला लॉकडाऊनमुळे कार शोरूम बंद होते. वाहन उद्योगातील कामगारांना झालेली करोनाची लागण, आर्थिक संकट याचा थेट परिणाम झाल्याचं समोर आलं आहे.

टेस्ला यंदा नवं मॉडेल लॉन्च करणार नाही; २०२१ या वर्षात विक्रमी कमाई करूनही घेतला निर्णय, कारण…

दुसरीकडे, जपानी ऑटो कंपनी होंडाने गेल्या वर्षी जुलैमध्ये दक्षिण इंग्लंडमधील स्विंडन कार प्लांट बंद केला. त्यामुळे कार उत्पादनाच्या संख्येत घट झाली. करोना संकट येण्यापूर्वी ब्रिटीश कार उत्पादनात होंडाचा वाट १० ट्क्के होता. मात्र असं असलं तरी स्विंडन प्लांड बंद होण्यामागे कमी विक्रीचं कारण देण्यात आलं आहे. ब्रेक्झिटचाही यूकेच्या वाहन उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. ब्रिटीश कार उत्पादनापैकी ८० टक्क्यांहून अधिक निर्यात केली जाते. व्यापार अडथळे कार उत्पादकांसाठी चिंतेचा विषय आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uk car production has dropped to the lowest in 66 years rmt
First published on: 27-01-2022 at 11:44 IST