रस्त्यावर गाडी चालवताना तुमच्याकडे वाहन परवाना (Indian Driving Licence) असणे आवश्यक असते. हे ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र म्हणून देखील वापरता येते. पण, तुम्हाला माहीत आहे का? परदेशातही तुम्ही तुमच्या भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर गाडी चावण्यासाठी करू शकता. होय; तुम्ही भारतात बनवलेला तुमचा वाहन परवाना परदेशातही ड्रायव्हिंग करताना वापरू शकता. कोणत्या देशात किती कालावधीसाठी तुम्ही भारतीय वाहन परवाना वापरू शकता, चला पाहूयात :
यूएस (USA) :




यूएसमधील बहुतेक राज्ये एखाद्या व्यक्तीला भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह भाड्याने घेतलेली कार चालविण्याची परवानगी देतात. पण, लायसन्स इंग्रजी भाषेत आणि कायदेशीर वैध असले पाहिजे. भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सबरोबर, गाडी चालवण्याआधी तुम्हाला आय ९४ (I-94) फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये अमेरिकेत येण्याची तुमची तारीख नमूद केलेली असते. सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसह, भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स यूएसमध्ये एक वर्षासाठी वैध आहे.
जर्मनी (Germany) :
भारतातून जर्मनीमध्ये तुम्ही फिरायला गेला असाल आणि तुम्हाला गाडी चालवण्याची इच्छा असेल तर भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर सहा महिन्यांसाठी गाडी चालवू शकता. तसेच भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजी किंवा जर्मन भाषेतच असावे. पण, हे अनिवार्य नाही. तरीसुद्धा सुरक्षिततेसाठी तुमच्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे नेहमी जवळ ठेवा.
ऑस्ट्रेलिया (Australia) :
ऑस्ट्रेलियाचे काही भाग, जसे की न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलँड, दक्षिण ऑस्ट्रेलिया, राजधानी क्षेत्र (Capital Region) येथे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स स्वीकारतात. तसेच याचा कालावधी तीन महिन्यांचा असेल. महत्त्वाचे हे की, हे ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजी भाषेत असेल. भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजी भाषेत नसेल तर तुम्ही ते लायसन्स इंग्रजीत सहज करून घेऊ शकता.
यूके (United Kingdom):
युनायटेड किंगडममध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स एक वर्षासाठी वैध आहे. सरकार भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्या व्यक्तीला केवळ निवडक गाड्या चालवण्याची परवानगी देते. तसेच सुरक्षिततेसाठी ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित तुमच्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे नेहमी जवळ ठेवा.
कॅनडा (Canada) :
कॅनडामध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या व्यक्तीला ६० दिवसांसाठी गाडी चालवण्याची परवानगी मिळते. तसेच तुमचे लायसन्स इंग्रजी भाषेत असावे. मुख्य म्हणजे त्या व्यक्तीने कॅनडा प्रवेशाची तारीख नमूद केलेली अतिरिक्त कागदपत्रे सोबत ठेवावी. पण, भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स कॅनडामध्ये ६० दिवसांसाठी अर्थात फक्त दोन महिन्यांपर्यंतच वैध असते. त्यानंतर मात्र कॅनडामध्ये गाडी चालवण्यासाठी कॅनडाचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक असतं.
तर या पाच देशांत फिरायला गेल्यावर तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग करून परदेशात गाडी चालवण्याचा आनंद लुटू शकता.