मारूती सुझुकी एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन कार्स मॉडेल्स बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. मारुती सुझुकीने आपल्या बहुप्रतिक्षित ऑफ-रोडर 'जिमनी'च्या किमती जाहीर केल्या आहेत. मारूती सुझुकी कंपनीच्या म्हणण्यानुसार, जिमनीची सुरूवातीची किंमत १२. ७४ लाख रुपये असणार आहे. सुझुकी जिमनी आजपासून देशातील सर्व Nexa शोरूममध्ये डिलिव्हरीसाठी उपलब्ध असणार आहे. या वर्षी झालेल्या ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये जिमनीला सादर करण्यात आले होते. जिमनी (5-डोअर) Zeta आणि Alpha प्रकारांमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. जिमनीच्या किंमतीची घोषणा करताना मारूती सुझुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हिसाशी टेकुची म्हणाले, '' भारतीय बाजारपेठेमध्ये साहसाचे प्रतीक असलेली क्लासिक जिमनी सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. सुझुकीच्या ALLGRIP PRO (4WD) टेक्नॉलॉजीद्वारे समर्थित असणारे वाहन १९७० पासून त्याच्या चांगल्या डिझाईन आणि ऑफ रोड क्षमतांसह स्टिरियोटाइप तोडत आहे. जिमनी लॉन्च करणे हा आमच्या SUV पोर्टफोलिओमधला एक महत्वाचा टप्पा आहे. देशातील सर्वात मोठी SUV उत्पादक कंपनी होण्याच्या प्रयत्नांमध्ये ती महत्वाची भूमिका बजावेल.'' याबाबतचे Financial Express ने दिले आहे. हेही वाचा : Maruti Suzuki च्या भारतातील ४,५०० व्या सर्व्हिस सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न; CEO म्हणाले, “ग्राहकांचा विश्वास..” मारूती सुझुकी जिमनी कारमध्ये १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. जे १०३ बीएचपी आणि १३४ टॉर्क जनरेट करते. जिमनीमध्ये लो-रेशो ट्रान्सफर केस आहे जे एसयूव्हीला ऑफ रोडींग करण्यासाठी मदत करते. जिमनीमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, पुश स्टार्ट किंवा स्टॉप बटण आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम असे फीचर्स देण्यात आले आहेत. मारूती सुझुकी जिमनीची किंमत कंपनीने जाहीर केली आहे. या जिमनी कारची भारतीय बाजारपेठेमध्ये प्राथमिक स्पर्धा ही महिंद्रा थार आणि गुरखा यांच्याशी आहे. मारूती सुझुकी जिमनीमध्ये हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोलसह चांगल्या ट्रॅक्शनसाठी ब्रेक-अॅक्ट्युएटेड डिफ लॉक सारखी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मिळतात.