महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या स्मृतीवर्षानिमित्त विद्यमान आरोग्य विमा योजना नवीन स्वरुपात ‘महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ या नावाने २ ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात एकाच वेळी लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या जीवनदायी आरोग्य योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपत आहे. यापूर्वी ही योजना दोन टप्प्यांत सुरू करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात नव्याने एकाच टप्प्यात या स्वरुपाची योजना लागू करण्याचा सरकारचा मानस होता. त्यानुसार नवी योजना प्रस्तावित करण्यात आली होती. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या स्मृती वर्षात त्यांना अभिवादन करण्यासाठी या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ही योजना अधिक सर्वसमावेशक आणि प्रभावी ठरण्यासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींचा तिच्यात समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील एक लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना गंभीर व खर्चिक आजारांवरील मोफत उपचारासाठी विमा कंपनीच्या सहभागाने राबविण्यात येणाऱ्या जीवनदायी आरोग्य योजनेच्या स्वरुपात लाभार्थ्यांना उपयुक्त ठरतील, अशा महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्यातील दोन कोटी २६ लाख दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा तसेच शासकीय आश्रमशाळा, अनाथालय व वृद्धाश्रम, नोंदणीकृत पत्रकार व शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या घटकांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
योजनेंतर्गत समाविष्ट उपचार पद्धतींवरील उपचारासाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रतिवर्ष प्रतिकुटुंब दीड लाख रुपयांवरून दोन लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा प्रतिवर्ष प्रतिकुटुंब अडीच लाखांवरून तीन लाख रुपये करण्यात आली आहे.