केंद्र सरकारने अलीकडेच कारमध्ये सहा एअर बॅग असाव्यात, असं बंधन घातलं आहे. सरकारच्या या नवीन निर्णयामुळे छोट्या कार उत्पादक कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित निर्णयाचा फेरविचार करावा, असं मारुती सुझुकी इंडिया कंपनीनं म्हटलं आहे. संबंधित निर्णयाचा केवळ कार कंपन्यांवरच नव्हे तर रोजगारावर देखील परिणाम होऊ शकतो, असंही कंपनीनं म्हटलं आहे.

गेल्या तीन वर्षात छोट्या कारच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर कारमध्ये सहा एअर बॅग लावणं बंधनकारक केल्याने कारच्या किमती आणखी वाढू शकतात. त्यामुळे कारच्या विक्रीत आणखी घट होऊ शकते. याचा इतरही क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो. मध्यमवर्गीय लोक छोट्या कार खरेदी करत असतात, त्यांच्यासाठी कारच्या किमती हा संवेदनशील मुद्दा असतो. त्यामुळे कारच्या किमती वाढल्या तर ते कार विकत घेणार नाहीत. ते दुचाकी घेण्याला प्राधान्य देतील. परिणामी अपघाताचं प्रमाण आणखी वाढेल, असंही कंपनीनं म्हटलं आहे.

ज्या कारमधून ८ प्रवाशी प्रवास करू शकतील, अशा कारमध्ये सहा एअर बॅग लावाव्यात, असं बंधन केंद्र सरकारने घातलं आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ऑक्टोबर महिन्यापासून केली जाणार आहे. मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितलं की, उत्सर्जनाच्या नियमामुळे आणि कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे आधीच कारच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी छोट्या कारची विक्रीदेखील कमी झाली आहे.

अशा स्थितीत कारमध्ये ६ एअर बॅग बसवायचे असल्याच कारच्या किमती २५ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतात. मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी ही रक्कम मोठी असते. जगातील कोणत्याच देशात असा नियम नाहीये. त्यामुळे केंद्र सरकारने संबंधित नियमाचा फेरविचार करावा, असं मारुती सुझुकी इंडिया कंपनीनं म्हटलं आहे.