मारुती सुझुकीच्या कारचा भारतीय बाजारपेठेत नेहमी बोलबाला पाहायला मिळतो. कार विक्रीच्या बाबतीत मारुतीच्या कार नेहमी अग्रेसर असतात. मारुती सुझुकीच्या कार दमदार फीचर्स, लूक डिझाईन, मायलेज आणि परवडणाऱ्या किमतीमुळे ओळखल्या जातात. त्यामुळे या कारची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असते. आता नुकत्याच देशात नव्या अवतारात लाँच झालेल्या एका कारला मोठी मागणी दिसून आली आहे.

मारुती सुझुकीने गेल्या आठवड्यातच नवीन जनरेशन स्विफ्ट भारतात लाँच केली आहे, ज्याच्या किमती ६.४९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होतात. त्याच वेळी, त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ९.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. नवीन मारुती स्विफ्ट थेट टाटा टियागो आणि ह्युंदाई ग्रँड i10 निओसशी स्पर्धा करते आणि त्याची डिलिव्हरी लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

मारुती सुझुकीने १ मे २०२४ पासून नवीन पिढीच्या स्विफ्टची बुकिंग सुरू केली आणि आता कंपनीने आपल्या बुकिंगचे आकडे देखील शेअर केले आहेत. नवीन मारुती स्विफ्टला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे बुकिंगचे आकडेच दर्शवतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बुकिंग सुरू झाल्यापासून अवघ्या दहा दिवसांत नवीन स्विफ्टच्या १०,००० युनिट्सचे बुकिंग झाले आहे.

बुकिंग रक्कम किती आहे?

११,००० रुपये टोकन रक्कम भरून नवीन मारुती स्विफ्ट बुक करता येईल. ते खरेदी करू इच्छिणारे ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट तसेच डीलरशिपवरून बुक करू शकतात. नवीन जनरेशन स्विफ्ट पाच प्रकारांमध्ये लाँच करण्यात आली आहे – LXi, VXi, VXi(O), ZXi आणि ZXi+. हे नऊ वेगवेगळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

(हे ही वाचा : आधी केली स्वस्त अन् आता कंपनीने ‘ही’ बाईक केली बंद; मुंबईतील रस्त्यांवर धावताना दिसणार नाही, किंमत होती…)

नवीन मारुती स्विफ्टमध्ये जुन्या स्विफ्टपेक्षा बरेच बदल करण्यात आले आहे. तिचा आकार वाढविण्यात आला आहे. नवीन स्विफ्टची लांबी ३,८६० मिमी, रुंदी १,६९५ मिमी आणि उंची १,५०० मिमी आहे. हे त्याच्या जुन्या मॉडेलपेक्षा १५ मिमी लांब, ३० मिमी उंच आणि ४० मिमी रुंद आहे. मात्र, त्याचा व्हीलबेस जुन्या मॉडेलप्रमाणेच आहे.

हायब्रिड इंजिनसह सुसज्ज

नव्या स्विफ्टमध्ये पूर्णपणे नवीन १.२ लीटरची क्षमता असलेले झेड-सिरीजचे सौम्य हायब्रिड इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन ८२hp पॉवर आणि १०८ Nm टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल गिअरबॉक्ससह, इंजिन देखील CVT ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये २५.७ किमी प्रतिलीटर मायलेज देते. जे सध्याच्या मॉडेलपेक्षा जवळपास ३ किमी/लीटर जास्त आहे. 

नवीन स्विफ्टमध्ये कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे. यात ६ एअरबॅग्ज, सर्व सीटवर सीटबेल्ट रिमाइंडरसह ३-पॉइंट सीटबेल्ट, इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP), हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) आणि ब्रेक असिस्ट (BA) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) मिळते, अशी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे सर्व फीचर्स स्टँडर्ड म्हणून उपलब्ध आहेत, म्हणजेच हे फीचर्स स्विफ्टच्या टॉप मॉडेलसह बेस मॉडेलमध्ये उपलब्ध असतील.