Maruti Swift CNG Launch: भारतात सीएनजी कारची मागणी सातत्याने वाढत आहे. यामुळे ह्युंदाई आणि टाटा मोटर्ससह आता मारुती सुझुकीदेखील सीएनजी गाड्या बनवत आहेत. पेट्रोल कारच्या तुलनेत सीएनजी कारची रनिंगकॉस्ट कमी आहे. काही काळापूर्वी मारुती सुझुकीने आपली नवीन स्विफ्ट पेट्रोल कार भारतात लाँच केली, आता या कारने सर्वात जास्त विक्री झालेल्या १० कारमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

स्विफ्टचे पेट्रोल मॉडेल २५.७५ किमीपर्यंत मायलेज देते, परंतु आता ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनी स्विफ्टचे सीएनजी मॉडेल आणत आहे, ज्याचे मायलेज ३० किमीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. ही नवी सीएनजी कार १२ सप्टेंबरपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे.

मायलेज ३० किमीपेक्षा असेल जास्त

नवीन स्विफ्ट सीएनजी कारला Z सीरिजमधील १.२ लिटर, तीन-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, पण पेट्रोल इंजिनच्या तुलनेत सीएनजी कारमध्ये पॉवर आणि टॉर्कची शक्ती कमी आहे, सध्या पेट्रोल व्हर्जनमध्ये हे इंजिन ८२ hp पॉवर आणि ११२ Nm टॉर्क देते.

या इंजिनबरोबर 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा ऑप्शन देण्यात आला आहे. सध्याची नवीन स्विफ्ट कार (पेट्रोल) २४.८० kmpl प्रति लिटर मायलेज देते, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये ही कार २५.७५ kmpl मायलेज देते. पण, समोर आलेल्या माहितीनुसार स्विफ्टची सीएनजी कार ३० किमी/किलोपेक्षा जास्त मायलेज देऊ शकते.

नवीन स्विफ्ट सीएनजी कारची किंमत किती?

स्विफ्ट सीएनजी कार पेट्रोल मॉडेलपेक्षा ९० हजार रुपयांपर्यंत महाग असू शकते. सूत्रांनुसार, स्विफ्ट सीएनजी वेरिएंटची किंमत ७.४४ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होऊ शकते. सध्या पेट्रोल स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत ६.४९ लाख ते ९.६४ लाख रुपये आहे. तसेच स्विफ्टच्या सीएनजी कारमध्ये फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन मिळण्याची शक्यता आहे.

सहा एअरबॅग्ज

नवीन स्विफ्ट सीएनजीच्या डिझाइनपासून ते आतील इंटीरिअरमध्ये कोणताही बदल होणार नाही. कारमध्ये फक्त एक S-CNG लोगो लावला जाईल. सुरक्षेसाठी कारमध्ये सहा एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD, 3 पॉइंट सीट बेल्टसह अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळतील. स्विफ्ट सीएनजी कारची Hyundai Grand i10 Nios CNG आणि Tata Tiago CNG या कारशी स्पर्धा पाहायला मिळेल.

Hyundai च्या सीएनजी कारची किंमत आणि फीचर्स

अलीकडेच Hyundai Motor India ने आपली सेडान कार AURA CNG व्हर्जनमध्ये लाँच केली आहे. नवीन Hyundai AURA Hy-CNG च्या E व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ७, ४८,८०० रुपये आहे, त्यामुळे मारुती सुझुकी डिझायर सीएनजीबरोबर या कारची टक्कर पाहायला मिळेल. नवीन Hyundai AURA Hy-CNG E ट्रिममध्ये CNG सह 1.2L BI-Fuel पेट्रोल इंजिन आहे.

आता हे इंजिन ६९ पीएस पॉवर आणि ९५.२ एनएम टॉर्क देते. २८.४ किमी मायलेजमुळे ही कार रोजच्या प्रवासासाठी एक उत्तम कार सिद्ध होऊ शकते. AURA Hy-CNG E ट्रिममध्ये तुम्हाला शक्तीची कमतरता किंवा मायलेजमध्ये कोणतीही कमी जाणवणार नाही. दररोज कारने प्रवास करणाऱ्यांसाठी ही कार फायद्याची ठरेल.