Electric Car Sale: एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक असण्यासोबतच कमी खर्चिक असतात. भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी सतत वेगाने वाढत आहे. सहाजिकच अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. देशात आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. भारतात दर महिन्याला अनेक इलेक्ट्रिक कार्सच्या हजारो गाड्यांची विक्री होतेय. यातच आता एका इलेक्ट्रिक कारनं विक्रीच्या बाबतीत मोठा विक्रम केला आहे.

भारतीय बाजारात ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारला तुफान मागणी

भारतात अनेक स्वदेशी आणि विदेशी ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार्स ऑफर करत आहेत. यातही सर्वात जास्त मागणी ही MG Windsor EV ला आहे. सध्या, एमजी विंडसर ईव्ही ग्राहकांना खूप आवडत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांकडून खूप प्रेम मिळत आहे. एमजीने सांगितले की, सहा महिन्यांत विंडसर ईव्हीच्या २०,००० गाड्या विकल्या गेल्या आहेत. कंपनीसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.

MG Windsor EV लुक आणि डिझाइन

MG Windsor EV मध्ये केबिनची भरपूर स्पेस आहे. यात सिग्नेचर काउल आणि एलईडी हेडलॅम्प, कनेक्टिंग एलईडी लाइटिंग बार, कनेक्टेड टेललॅम्प, पॉप-अप डोअर हँडल, फ्लोटिंग रूफलाइन, १८-इंच क्रोम अलॉय व्हील यांसह अनेक एक्सटिरियर फीचर्स आहेत, जी या इलेक्ट्रिक कारला चांगले आणि आकर्षक बनवतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे Windsor EV मध्ये ६०० लिटरपेक्षा जास्त बूट स्पेस आहे. या कारमध्ये १५.६ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, यासोबतच फुल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस एंट्री, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग पोर्टसारखी वैशिष्ट्येदेखील देण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी त्यात एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमची सुविधा आहे.

MG Windsor EV बॅटरी

बॅटरी आणि रेंजबद्दल बोलायचे झाले तर एमजी विंडसर ईव्हीला ३८ किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो, जो ४५ किलोवॅट डीसी चार्जर आणि जलद चार्जिंगने सुसज्ज आहे. ही कार एका चार्जवर ३३२ किलोमीटरची रेंज देते. जलद चार्जिंग प्रणालीच्या मदतीने, बॅटरी फक्त ५५ मिनिटांत १०% ते ८०% पर्यंत चार्ज होते.

MG Windsor EV किंमत

एमजी विंडसर ईव्हीची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. परंतु, या किमतीत बॅटरीची किंमत समाविष्ट नाही. एमजीने त्यांच्या ईव्ही श्रेणीसाठी बाएस प्रोग्राम आणला आहे. याद्वारे, ग्राहक बॅटरी स्वतंत्रपणे भाड्याने घेऊ शकतात, ज्यासाठी तुम्हाला प्रति किलोमीटर ३.५० रुपये द्यावे लागतील. किमतीच्या बाबतीत ही एसयूव्ही एक चांगला पर्याय आहे. ही कार तिच्या डिझाइन, श्रेणी, जागा आणि किमतीच्या आधारे ग्राहकांना आकर्षित करत आहे.