स्वप्निल घंगाळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोविडकाळाच्या दु:स्वप्नानंतर समाजमन सावरते आहे. गणेशोत्सवापासून सुरू झालेल्या धामधुमीला आता वेध लागले आहेत दसरा -दिवाळीचे. त्याचे प्रत्यंतर बाजारपेठेतही दिसते आहे. त्यानिमित्त यंदाचा खरेदीचा कल कुठे आणि कसा झुकतो आहे याचा आढावा-

सणासुदीच्या कालावधीत बाजारपेठा फुलून गेलेल्या असतात. अगदी कपडय़ांपासून ते वाहन खरेदीपर्यंत अनेक गोष्टींची आकडेवारी सणासुदीच्या काळात फुगलेली दिसते. मात्र मागील काही वर्षांपासून प्रत्यक्षात वस्तू खरेदीबरोबरच ऑनलाइन खरेदीचा कलही वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मोबाइल, रोजच्या वापरातील बूट, पादत्राणे यांसारख्या गोष्टी ऑनलाइन माध्यमातून खरेदीचे नवे विक्रम नवरात्रीनिमित्त आयोजित विशेष सेल्सच्या पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये प्रस्थापित झाल्याचं दिसून येत आहे. करोना कालावधीमध्ये सणासुदीच्या काळात खरेदी झाली असली तरी यंदा मात्र या खरेदीचं प्रमाण फारच अधिक असल्याचं वेगवगेळय़ा अहवालांमधून दिसून आलं आहे. हजारो कोटींची उलाढाल या पहिल्या चार दिवसांमध्ये झाली असून नवरात्रीबरोबरच दिवाळी आणि त्यानंतर वर्ष संपतानाही अशाच पद्धतीची भरभराट ऑनलाइन बाजारपेठेत दिसण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

नवरात्र ते अगदी दिवाळी आणि त्यानंतर ‘इयर एण्ड सेल’च्या नावाखाली हल्ली ऑनलाइन फ्लॅटफॉर्म घसघशीत सवलती देतात. त्यात हप्त्यांची म्हणजेच ईएमआयची सवलत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरावर सवलती, कॅश बॅक यांसारख्या गोष्टींमुळे ग्राहकांना फायदा होतो. म्हणूनच प्रत्यक्षात खरेदीपेक्षा ऑनलाइन खरेदीला अनेक जण प्राधान्य देताना दिसतात. ऑनलाइन माध्यमातून खरेदी करण्यात आता टू टीयर आणि थ्री टीयर शहरेही मागे नाहीत. इंटरनेटचा वापर वाढल्याने आता देशातील चार प्रमुख उपनगरांसह  आजूबाजूच्या शहरांमधूनही ऑनलाइन खरेदी विक्रीला मोठी मागणी असल्याचं नवरात्रीनिमित्त सुरू असणाऱ्या खास सेलमध्ये दिसून आलं आहे. सध्या फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज आणि अ‍ॅमेझॉनवर ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ नावाने सेल सुरू आहेत.

मोबाइल फोन यंदाही सर्वाधिक खरेदी करण्यात येणाऱ्या गोष्टींमध्ये अव्वल स्थानी आहे. ‘फ्लिपकार्ट’ कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या सणासुदीला ‘बिग बिलियन डेज’ या सेलअंतर्गत २० हजार किंवा त्याहून अधिक महागडय़ा किमतीचे मोबाइल फोन घेणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांनी वाढली आहे. नवरात्रीनिमित्त सुरू असणाऱ्या ऑनलाइन सेलमध्ये फ्लिपकार्टवरुन विक्री झालेल्या मोबाइलपैकी ५० टक्क्यांहून अधिक विक्री ही २० हजारांहून महागडय़ा फोनची आहे. विशेष म्हणजे या मोबाइल विक्रीपैकी ४४ टक्के विक्री ही टू टीयर आणि थ्री टीयर शहरांमध्ये झाली आहे.

नवरात्रीनिमित्त वेगवगेळय़ा वेबसाइट्सवर सुरू असणाऱ्या ऑनलाइन सेलमध्ये पहिल्या चार दिवसांत मिनिटाला एक हजार १०० मोबाइल फोन विकले गेले आहेत. या ऑनलाइन सेलसंदर्भात ‘रेडसीर’च्या आकडेवारीनुसार पहिल्या चार दिवसांमध्येच ११ हजार कोटी रुपयांच्या मोबाइलची विक्री झाली आहे. पहिल्या चार दिवसांमध्ये भारतात ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून ६० ते ७० लाख मोबाइल फोन विकले गेलेत. यातही महागडय़ा फोनमध्ये आयफोन १२, आयफोन १३ आणि वन प्लसच्या फोनला चांगली मागणी आहे, तर परडवणाऱ्या म्हणजेच १० हजार ते २० हजारांदरम्यान विक्री होणाऱ्या मोबाइलमध्ये सॅमसंगबरोबरच चिनी कंपन्यांचा दबदबा आहे.

सॅमसंगने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन मुख्य वेबसाइट्सवर कंपनीने सेल सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी १२ लाखांहून अधिक गॅलेक्सी सीरिजमधील फोन विकले आहेत. पहिल्याच दिवशी विक्री झालेल्या फोन्सची एकूण किंमत ही एक हजार कोटी रुपये असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही विक्रमी विक्री असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने आपल्या फोनवर या सेलदरम्यान अगदी १७ टक्क्यांपासून ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिली आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी सीरिजमधील एस २० एफई ५जी, एस २२ अल्ट्रा, एस २२, एम ५३, एम ३३, एम २२ प्राइम एडिशन, एम १३ या फोनवर मोठी सवलत असल्याने या मॉडेलची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली आहे. एस २२ वर १७ ते ३८ टक्के सवलत आहे.

फॅशन म्हणजेच कपडे, बॅगा आणि इतर लाइफस्टाइलसंदर्भातील गोष्टींची विक्रीही यंदा साडेचार पटींनी वाढली आहे. पहिल्या चार दिवसांमध्ये चार प्रमुख साइटवर साडेपाच हजार कोटी रुपयांच्या कपडय़ांची आणि लाइफस्टाइल सेक्शनमधील गोष्टींची विक्री झाल्याचं रेडसीरचा अहवाल सांगतो. टू टीयर प्लस म्हणजेच महानगरांच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात खरेदी होत आहे.

मोठय़ा आकाराच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये टीव्ही, वॉशिंग मशिन्स आणि फ्रीज घेण्याला लोकांचं प्राधान्य आहे. अनेक जण एक्स्चेंज ऑफरअंतर्गत या जुन्या गोष्टी देऊन नव्या वस्तू घेताना दिसत आहेत. अगदी ट्रीमर, पॉवर बँकपासून स्पीकर्स, मिक्सर, ओव्हन यांसारख्या गोष्टींनाही चांगली मागणी असल्याचं दिसून येत आहे. घरगुती वापराच्या वस्तूंवर असणारी सवलत आणि ऑनलाइन खरेदीबद्दल हळूहळू निर्माण होत असणारी विश्वासार्हता याचा परिणाम म्हणूनच आता मोठय़ा वस्तू खरेदी करण्यासाठीही ऑनलाइन माध्यमांना पसंती दिली जात आहे. 

सणासुदीच्या कालावधीमधील या सेलमध्ये टू टीयर आणि थ्री टीयर शहरांमधून कपडे आणि लाइफस्टाइलसंदर्भातील गोष्टींनाही मोठी मागणी असल्याचं दिसतं. यामध्ये प्रामुख्याने मोठय़ा आकाराच्या बॅगा, बूट, जीन्स, पादत्राणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. ‘फ्लिपकार्ट’वर दर सेकंदाला तीन साडय़ा आणि दोन कुर्ती विकल्या जातात. तर दर मिनिटाला २५० जोडय़ा बूट, लहान मुलांची २०० कपडे, ७ टी शर्ट आणि ४ पॅण्ट प्रकारातील कपडय़ांची विक्री होते असं कंपनीने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New joy excitement mobile purchase market of purchase festival season ysh
First published on: 02-10-2022 at 00:02 IST