Nitin gadkari Central Government plans new rule of mandatory rear seat belt alarm | कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांनी सीटबेल्ट लावला नाही तर वाजणार अलार्म; केंद्र सरकार आणणार नवा नियम | Loksatta

कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांनी सीटबेल्ट लावला नाही तर वाजणार अलार्म; केंद्र सरकार आणणार नवा नियम

काही आठवड्यांपूर्वीच टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला, या घटनेमुळे गेले अनेक दिवस कार प्रवासामधील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आहे.

कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांनी सीटबेल्ट लावला नाही तर वाजणार अलार्म; केंद्र सरकार आणणार नवा नियम
(फोटो : पीटीआय, प्रातिनिधिक)

काही आठवड्यांपूर्वीच टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांचा मुंबई अहमदाबाद मार्गावरील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेवरून अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. या घटनेतील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे मागील सीटवर बसलेल्या व्यक्तींनी सीटबेल्ट वापरणे. कारण सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला त्यावेळी त्यांनी सीटबेल्ट लावला नव्हता. यावरूनच केंद्र सरकार आता नवा नियम आणणार आहे. काय असणार आहे हा नियम आणि याची अंमलबजावणी कधीपासून होणार जाणून घ्या.

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मागच्या सीटवर बसलेल्यांना सीटबेल्टसाठी अलार्म लावणे अनिवार्य करण्याबाबत एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. या ड्राफ्टनुसार सरकार लवकरच रियर सीटबेल्टच्या अनिवार्य नियमाबाबत विचार करत आहे. या नव्या नियमावर ५ ऑक्टोबरपर्यंत जनसामान्यांचे मत नोंदवले जाणार आहे.

आणखी वाचा : २० लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या पाच आकर्षक कार लवकरच होणार लाँच; पाहा यादी

सीट बेल्ट न लावल्यास आकारला जाईल दंड
जागतिक बँकेने गेल्या वर्षी भारतात दर चार मिनिटाला एका व्यक्तीचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू होतो अशी माहिती दिली होती. परिवहन मंत्रालयाच्या अहवालानुसार, सीट बेल्ट न लावल्यामुळे २०२० मध्ये मृत्यू झालेल्या लोकांची संख्या १५,१४६ होती आणि जखमींची संख्या ३९,१०२ होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू आहे, या नियमाची अंमलबजावणी न केल्यास दंड आकारला जाईल.

सीट बेल्ट अलार्म स्टॉपरवर बंदी
या महिन्याच्या सुरुवातीला नितीन गडकरींनी ई-कॉमर्स कंपन्यांना कार सीट बेल्ट स्टॉपर डिवाइसची विक्री थांबविण्याचे निर्देश दिले होते. या डिवाइसमुळे सीटबेल्ट अलार्म बंद करण्याची सुविधा मिळत होती. नितीन गडकरी म्हणाले की, “२०२४ वर्ष संपेपर्यंत रस्ते अपघात आणि त्यासंबंधित मृत्यू निम्मे करण्याचे केंद्रीय परिवहन मंत्रालयाचे लक्ष्य आहे.” त्यांनी असेही सांगितले की, “सरकार यावर्षी सर्व कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य असण्याचा नियम आणू शकते.”

आणखी वाचा : पेट्रोल की डिझेल कोणती कार विकत घ्यावी? जाणून घ्या कोणता पर्याय आहे उत्तम

आता नियम काय आहे?
सध्या सर्व वाहन उत्पादकांना पुढील सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्टचे रीमाइंडर देणे बंधनकारक आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम १३८(३) अंतर्गत मागील सीटवरील प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यास त्यांना १,००० रुपयांचा दंड ठोठावला जातो, पण बहुतेक लोकांना या नियमाबद्दल माहिती नसते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-09-2022 at 10:00 IST
Next Story
Petrol-Diesel Price on 22 September 2022: पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये आजही चढ उतार; जाणून घ्या नवी किंमत