भारत सरकार सातत्याने पेट्रोल-डिझेलला पर्याय ठरू पाहणाऱ्या इंधनांना प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच टोयोटाची फ्लेक्स फ्यूल कार लाँच केली आहे. आता त्याच धर्तीवर मारुती सुझुकी कंपनीही फ्लेक्स इंधनावर चालणारी कार आणणार असल्याची माहिती आहे.

काय आहे कंपनीची योजना ?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी कंपनी २०२३ पर्यंत इथेनॉलवर चालणारे इंजिन तयार करू शकते. इंजिन तयार झाल्यानंतर कंपनीच्या सर्व गाड्यांमध्ये अशा तंत्रज्ञानाची इंजिने दिली जाणार असून कंपनीच्या सर्व गाड्या २० टक्के इथेनॉल इंधनावर धावू शकतील.

आणखी वाचा : ‘ही’ कंपनी देतेय इलेक्ट्रिक स्कूटरवर भरघोस सूट; फक्त ५३ हजार रुपयांमध्ये घरी आणा नवीन स्कूटर! जाणून घ्या जबरदस्त ऑफर

ग्राहकांना होणार फायदा

कंपनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ग्राहकांना होणार आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार या मारुती सुझुकी कंपनीच्या आहेत. अशा परिस्थितीत कंपनीच्या इथेनॉलवर चालणाऱ्या इंजिनच्या गाड्या बाजारात आल्यास त्यामुळे ग्राहकांना महागडे पेट्रोल आणि सीएनजीपासून दिलासा मिळणार आहे. कारण पेट्रोल आणि सीएनजीपेक्षा इथेनॉलवर कार चालवणे स्वस्त होईल. त्याचबरोबर पर्यावरणाचे होणारे नुकसानही कमी होईल. कारण इथेनॉलपासून बनवलेल्या इंधनामुळे वाहन चालवताना प्रदूषण होत नाही, त्यामुळे फ्लेक्स इंधन असलेल्या कारचाही पर्यावरणाला फायदा होईल.

काय आहे सरकारची योजना ?

केंद्र सरकार भारतात फ्लेक्स इंजिनवाल्या वाहनांची निर्मिती सुरू करण्यासाठी धोरण तयार करत आहे. या धोरणानंतर वाहन कंपन्यांनी भारतात फ्लेक्स इंजिनवाली वाहनं बनवणं बंधनकारक असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील ऑटोमेकर्सना एप्रिल २०२३ पर्यंत २० टक्के मिश्रणासह E20 इंधनावर चालणाऱ्या कार बनवण्याचे पालन करावे लागेल.