वाहनांना आग लागण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ओला इलेक्ट्रिक त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींचे १,४४१ युनिट्स परत मागवत आहे. पुण्यात २६ मार्चला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्राथमिक मूल्यांकनात ही एक वेगळी घटना असल्याचे आढळले. तथापि, कंपनी त्या बॅचच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची परत तपासणी करण्यास सांगत आहे. आरोग्य तपासणीसाठी कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर परत मागवत आहे.

२६ मार्च रोजी पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच, ओला इलेक्ट्रिकने एक निवेदन जारी केले की योग्य कारवाई केली जाईल. यापूर्वी अनेक ब्रँडच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या.

UPI Fraud : सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी पाच सोप्या स्टेप्स; आजच करा फॉलो

ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, या स्कूटर्सची आमच्या सेवा अभियंत्यांकडून तपासणी केली जाईल. सर्व बॅटरी सिस्टीम, थर्मल सिस्टीम तसेच प्रोटेक्शन सिस्टीम सखोल निदानातून जातील. ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, त्यांची बॅटरी सिस्टम आधीपासूनच सुसंगत आहे आणि युरोपियन मानक ईसीई १३६ चे पालन करण्याव्यतिरिक्त भारतासाठी नवीन प्रस्तावित मानक एआयएस १५६ साठी चाचणी केली गेली आहे.

अलीकडे, देशातील विविध भागांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत, ज्यामुळे उत्पादकांना त्यांची वाहने परत मागवायला भाग पाडले जात आहे. ओकिनावा ऑटोटेकने ३,००० पेक्षा जास्त युनिट्स परत मागवल्या होत्या, तर प्युअर ईव्हीने सुमारे २,००० युनिट्स परत मागवल्या होत्या.