CNG-PNG : बाजारात पेट्रोल कार, डिझेल कार, सीएनजी कार आणि इलेक्ट्रिक कार घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात पेट्रोल, डिझेल कार पेक्षा सीएनजी कार घेण्याकडे लोकांचा कल वाढल्याचं बोललं जातं. सीएनजी आणि पेट्रोलचा विचार केल्यास २०२५ या आर्थिक वर्षात पेट्रोलची लोकप्रियता कमी झाली असून सीएनजीचा बाजारातील वाटा पाच वर्षांत तिप्पट झाला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या लोकप्रियतेला ओहोटी आली असून सीएनजीचा बाजार हिस्सा तब्बल ५ वर्षांत तिप्पट झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारतातील कार खरेदीदार इंधनाच्या वाढत्या किमती आणि मंदावलेली बाजारपेठ पाहता व बाजारात मिळणारे अनेक पर्याय पाहता सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची निवड नागरिक मोठ्या प्रमाणात करत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षात एकूण प्रवासी वाहन विक्रीत सीएनजी मॉडेल्सचा वाटा तिप्पट वाढला असून १९.५ टक्के झाला आहे. तसेच २०१९ ते २० मध्ये हा वाटा फक्त ६.३ टक्के एवढा होता. या संदर्भातील वृत्त इकोनॉमिक्स टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, या कालावधीत पेट्रोल कारचा वाटा ७६.३ टक्क्यावरून ५७.७ टक्क्यांपर्यंत घसरल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या कालावधीत डिझेल कारची विक्री मोठ्या प्रमाणात स्थिर राहिल्याचंही उद्योग संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
तसेच या चालू आर्थिक वर्षात पहिल्यांदा दहा लाखांहून अधिक सीएनजी कार, सेडान आणि एसयूव्ही विकल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या वर्षांत आतापर्यंत विकल्या गेलेल्या युनिट्सपेक्षा सुमारे २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्या अंदाजानुसार २०२६ या आर्थिक वर्षांत एकूण कार विक्री १ ते २ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, याबाबत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवत्स यांनी म्हटंल की, “ही एक अशी आकडेवारी आहे त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.”
अंदाजानुसार आर्थिक वर्ष २०२१ मध्ये सीएनजी वाहनांची संख्या २०२५ या आर्थिक वर्षांत दुप्पट झाली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं होतं की, गेल्या दशकात सीएनजी रिटेल आउटलेटची संख्या २० पट वाढली आहे. त्यामुळे सरकार देशभरात सीएनजी वितरण केंद्रांची संख्या वाढवण्यावर काम करत आहे. २०३० पर्यंत १७,५०० सीएनजी पंप उभारण्याचे लक्ष्य असून त्यापैकी २०२५ मध्ये ७,४०० हे पंप पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सरकार इलेक्ट्रिक वाहने ग्राहकांनी खरेदी केले पाहिजेत यासाठी प्रोत्साहन देत देत आहे. मात्र, असं असलं तरी कार खरेदीदार बहुतेकदा सीएनजीला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतातील काही लोकप्रिय सीएनजी कारच्या मॉडेल्सचा विचार केल्यास त्यामध्ये मारुती वॅगनआर, ह्युंदाई एक्स्टर आणि टाटा पंच या सारख्या कारचा समावेश असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी नुकतंच सांगितलं की, “भारतात आमच्या सीएनजी कारची विक्री गेल्या वर्षी ६००,००० युनिट्सपेक्षा जास्त झाली होती. तसेच या वर्षी आम्हाला सुमारे ७००,००० युनिट्सपर्यंत पोहोचण्याची आशा आहे.