आजकाल खाण्याच्या गोष्टींपासून प्रत्येक गोष्टीत आपल्या भेसळ नाही तर फसवणूक होताना दिसते. अगदी तेल, दूध, साबणापासून ते ब्रँड वस्तूमध्येही ग्राहकांना सर्रासपणे फसवले जाते. पदार्थामध्ये भेसळ करुन, वजनात घट करुन, कमी किंमतीची वस्तू जास्त विकून किंवा मोठ्या ब्रँडच्या नावाच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केले जाते. ज्यामुळे ग्राहकांचे काहीवेळी हजारो किंवा लाखोंचे आर्थिक नुकसान होते. अशातच आता फसवणूकीचा एक नवा प्रकार समोर आला आहे. जो पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांबरोबर होताना दिसत आहे. पेट्रोल पंपावर फ्यूल मीटरमध्ये छेडछाड करून शॉर्ट फ्युलिंगद्वारे लोकांबरोबर स्कॅम केल्याच्या अनेक घटना आत्तपर्यंत समोर आल्यात. त्यामुळे वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरताना जरा सावध रहा. तसेच खालील दिलेल्या गोष्टींची काळजी घ्या.

१) वाहनात इंधन भरताना मीटरकडे लक्ष द्या

पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरताना मीटरवर लक्ष ठेवा. जेव्हा तुम्ही पेट्रोल भरता तेव्हा २०० रुपये, ४०० रुपये किंवा १००० रुपये या राउंड फिगरच्या रकमेऐवजी पाच-दहा रुपये वाढवा किंवा कमी करा. यामागील कारण म्हणजे काही पंपावरील मशिन्स चुकीच्या पद्धतीने लावल्या जातात, ज्यामुळे तुमच्या वाहनात कमी इंधन भरले जाते आणि वाहन चालकांची फसवणूक केली जाते.

कार्तिक आर्यनच्या कारचे उंदरांमुळे करोडोंचे नुकसान; तुमची गाडी सुरक्षित ठेवायची तर आजच ‘हे’ करा

२) इंधनाच्या डेंसिटीवर लक्ष ठेवा

जेव्हा तुम्ही तुमच्या कार किंवा बाईकमध्ये पेट्रोल भरता तेव्हा मीटरमध्ये त्या इंधनाची डेंसिटी देखील तपासा. ही डेंसिटी पेट्रोलसाठी ७३० ते ८०० किलो प्रति क्यूबीक मीटर आणि डिझेलसाठी ८३० ते ९०० किलो क्यूबीक मीटर असावी. जर पेट्रोलची डेंसिटी ७३० युनिटपेक्षा कमी असेल तर याचा अर्थ पेट्रोलमध्ये भेसळ झाली आहे. त्याचवेळी डिझेलची डेंसिटी ८३० युनिटपेक्षा कमी असल्याचे दिसल्यास त्यात भेसळ असल्याचे निश्चित होते.

३) फ्यूल मीटरवर किंमत पाहा

फ्यूल मीटरमध्ये प्राइज सेक्शनकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. मीटरमध्ये इंधन भरताना किंमतीत ३ ते ४ रुपयांची वाढ झालेली दिसेल, पण ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्हाला किंमतीत १० किंवा २० रुपयांची वाढ दिसत असेल तर समजा मीटरमध्ये छेडछाड झाली आहे. अशी फसवणूक टाळण्यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे. तुम्ही सावध न राहिल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.