Upcoming Tata Motors CNG Car: टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कारची विक्री करते. टाटा मोटर्सच्या कार भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. दर महिन्याला सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत नेहमीच टाटाच्या कारचा समावेश असतो. सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जाते. आता बाजारपेठेत टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे. कारण टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार आता सीएनजी प्रकारात देशात दाखल होणार आहे.
बाजारपेठेत सीएनजी वाहनांची मागणी वाढत असून आता टाटा मोटर्सही या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहे कंपनीने आपले अनेक मॉडेल सीएनजीमध्ये सादर केले आहेत आणि आता नेक्सॉन सीएनजीचेही नाव लवकरच या यादीत समाविष्ट होणार आहे. टाटा मोटर्स नेक्सॉनचे सीएनजी प्रकार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या लाइनअपमध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक तसेच CNG व्हर्जनमध्ये पंच, टियागो आणि टिगोरची विक्री करत आहे. नेक्सॉन सीएनजी हे तीन प्रकारच्या इंजिन पर्यायांमध्ये येणारे चौथे मॉडेल असेल.
सध्या कंपनी पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनमध्ये नेक्सॉनची विक्री करत आहे. सीएनजी व्हेरियंट लाँच केल्यानंतर, बाजारात उपलब्ध असलेली ही पहिली कार असेल जी सीएनजीसह एकूण चार प्रकारच्या पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध असेल.
(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले! BMW चा देशातील बाजारपेठेत मोठा धमाका; ‘या’ नव्या कारसह इलेक्ट्रिक स्कूटर केली दाखल, पाहा किंमत)
Nexon CNG: पॉवर आणि ट्रान्समिशन
टाटाच्या इतर मॉडेलप्रमाणे नेक्सॉन सीएनजीमध्ये ट्विन सीएनजी सिलिंडर तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. पण इतर उत्पादनांप्रमाणे नेक्सॉनला टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह सीएनजी किट देण्यात येणार आहे. नेक्सॉनचे मानक १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन ११८ bhp पॉवर आणि १७० Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.
ट्रान्समिशन पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, Nexon CNG ला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे. कंपनी त्याच्या उच्च प्रकारांमध्ये CNG किटसह AMT गिअरबॉक्स देखील देऊ शकते. त्यामुळे, जर टाटा नेक्सॉनने CNG सह स्वयंचलित गिअरबॉक्स आणण्याचे व्यवस्थापन केले, तर ज्यांना CNG कारच्या परवडणाऱ्या किमतीसह स्वयंचलित ट्रान्समिशनची सुविधा हवी आहे त्यांना ते आकर्षित करू शकते.
Tata Nexon CNG: कधी लाँच होईल?
Tata Nexon CNG सप्टेंबर २०२४ मध्ये भारतीय बाजारात दाखल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. टाटा नेक्सॉन सीएनजी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीशी स्पर्धा करेल. CNG प्रकाराची किंमत त्याच्या मानक मॉडेलपेक्षा ६०,००० ते ८०,००० रुपये जास्त असण्याची शक्यता आहे. Nexon CNG चे मायलेज २०-२२ किमी प्रति किलो असू शकते.
© IE Online Media Services (P) Ltd