परिस्थिती कशीही असली तरीही लोकांना कारचे खूपच आकर्षण असते. रस्त्यावर आपण एका पेक्षा एक अनोख्या कार्स पाहत असतो. आज आपण जगातील सर्वांत लहान कारबद्दल जाणून घेऊया. ही कार चालवणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, कारचा आकार पाहून लोक त्याची चेष्टा करतात. मात्र या कारसाठी होणार पेट्रोलचा खर्च इतर गाड्यांपेक्षा खूपच कमी आहे. या अनोख्या कारचे नाव Peel P50 आहे जी फक्त १३४ सेमी लांब, ९८ सेमी रुंद आहे, तर तिची उंची फक्त १०० सेमी आहे. त्याच्या मालकाचे नाव अ‍ॅलेक्स ऑर्चिन आहे.

ससेक्स, यूकेमध्ये तो जवळजवळ दररोज ही कार वापरतो. अ‍ॅलेक्सची उंची सुमारे ६ फूट आहे, त्यामुळे त्याला एवढ्या लहान कारमध्ये बसताना किंवा कारमधून खाली उतरताना पाहून लोक थक्क होतात. बहुतेक लोक त्याच्या छोट्या कारची खिल्ली उडवतात, परंतु अ‍ॅलेक्स त्याच्या कारच्या मायलेजमुळे खूप खूश आहे. ही कार ४.५ हॉर्सपॉवर इंजिनने सुसज्ज आहे आणि ती एक लिटर पेट्रोलमध्ये ४२ किमी चालवली जाऊ शकते.

Twitter चं ‘Edit’ फीचर म्हणजे ‘एप्रिल फुल प्रॅन्क’ की…? ट्विटरच्या ‘या’ उत्तराने नेटकरीही गोंधळले

पील इंजिनिअरिंग नावाची कंपनी ही कार बनवते. प्रथम ही कार १९६२ ते १९६५ दरम्यान बनवण्यात आली होती, नंतर २०१० पासून तिचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आले. अ‍ॅलेक्स म्हणतो की तो ज्या मार्गावरून जातो, लोक त्याला पाहण्यासाठी मागे वळतात. यामागील कारण म्हणजे त्याची कार. २०१०मध्ये या कारला जगातील सर्वात लहान कार म्हणून घोषित करण्यात आले असून या कारचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

ही कार आकाराने इतकी छोटी असली तरी तिची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करेल. अ‍ॅलेक्सने सांगितले की नवीन पी५० ची किंमत ८४ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, म्हणूनच त्याने सेकंड हँड पी५० खरेदी केली. या कारचा कमाल वेग ३७ किमी प्रतितास आहे आणि या गतीने अ‍ॅलेक्सने गेल्या वर्षीच या कारने संपूर्ण ब्रिटनचा प्रवास केला आहे.