बापू बैलकर
करोना टाळेबंदीतील काही दिवस वगळता वाहन उद्योगाची चक्रे कधीही थांबलेली नाहीत. करोना संकटानंतर इंधन दरवाढ व सेमी कंडक्टरचा तुटवडा ही संकटे वाहन उद्योगासमोर उभी राहिली, पण वाहन उत्पादक कंपन्यांनी नवे पर्याय बाजारात आणत उत्साह कायम ठेवला आहे. मागणी कायम ठेवण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. करोनाकाळापासून आतापर्यंत अनेक नव्या कार बाजारात आल्या. तसेच कंपन्यांनी त्यांच्या जुन्या वाहनांना नवी झळाळी देत, आधुनिक तंत्राचा वापर करत ती बाजारात आणली आहेत. त्यामुळे वाहन खरेदीसाठी महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या दिवाळीत वाहन बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे.
ग्राहकांसाठी वाहन उत्पादक कंपन्यांनी या वर्षांत अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यात टाटा मोटर्सने त्यांची पंच ही एसयूव्ही बाजारात आणली असून ती ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. टाटाने त्यांची ‘नेक्सॉन’ ही ईव्ही कार अधिक लांबचा पल्ला गाठू शकेल, अशा प्रकारे अपडेट करत बाजारात आणली आहे. तर अल्ट्रोज या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या कारची डीसीए आवृत्ती उपलब्ध झाली आहे. टाटाने सीएनजी कारच्या निर्मिती क्षेत्रात दमदार प्रवेश करतानाच टिगोर आणि टियागो या कार ईव्ही स्वरूपात बाजारात आणल्या आहेत. तर नुकतीच टिगोर इव्ही ही कार बाजारात आणून एक परवडणारा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुतीने करोनाकाळात नवीन वाहनांकडे थोडे दुर्लक्ष केले होते. मात्र त्यांनीही आता नवनवे पर्याय देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने त्यांची सीएनजीवर चालणारी सेलेरिओ ही कार काही महिन्यांपूर्वी अपडेट करत बाजारात आणली असून, ही सर्वाधिक मायलेज देणारी कार असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर अर्टिगा, वॅगनआर या कारही नव्या रूपात बाजारात आणल्या आहेत. मारुतीने त्यांची ‘एक्सएल ६’ ही सहा आसनी नवीकोरी बाजारात आणली. मारुतीने पुढील काळातील संभाव्य इंधन दरवाढीचा विचार करता हायब्रिडचा पर्याय देण्याचा मानसही व्यक्त केला आहे.
किआ मोटर्सने आपला दर्जा कायम ठेवत सोनेट या एसयूव्हीनंतर सात आसनी पर्याय म्हणून किआ कॅरेन्स ही बाजारात आणली आहे. तिला ग्राहकांनी पसंती दिली आहे. ही कार अतिशय आरामदायी असून त्यात कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे हे वाहन कुटुंबासाठी सुरक्षित पर्याय असल्याचे मानले जात आहे. एमजी मोटर्सने हेक्टर ग्लोस्टरनंतर अॅस्टर ही बोलकी कार बाजारात आणली आहे. तंत्रस्नेही ग्राहक या कारच्या प्रेमात आहेत. स्कोडाने नुकतीच स्लाव्हिया ही कार बाजारात आणली असून, तिचीही चर्चा आहे. टोयोटा मोटर्सने काही महिन्यांपूर्वी त्यांची कॅमरी ही मिनी हायब्रिड कार प्युअर हायब्रिड प्रकारात बाजारात आणली. या कारच्या माध्यमातून कंपनीने इंधन दरवाढीच्या काळात पर्यावरणपूरक पर्याय दिला आहे. ही कार बॅटरी व इंधन या दोन्ही प्रकारांवर चालते आणि अधिक मायलेज देते. यासह टोयोटाने अर्बन क्रुझर व ग्लान्झा या दोन कार उपलब्ध करून दिल्या आहेत. रेनोने कायगर ही एसयूव्ही गेल्या वर्षी आणली असून तिलाही चांगली मागणी आहे. कंपनीने त्यांची क्वीड ही कार नुकतीच अपडेट करत बाजारात आणली आहे. सीट्रॉन मोटर्सने सीट्रॉन सी ५ नंतर आता सीट्रॉन सी ३ ही कार बाजारात आणली आहे. हॅचबॅक आणि मिनी एसयूव्ही यात पर्याय शोधणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.
एसयूव्हींचा मोठा आधार
‘एसयूव्ही’ घ्यायची आहे, पण बजेट कमी आहे, अशा ग्राहकांसाठी कार उत्पादक कंपन्यांनी नॅनो आणि परवडणाऱ्या ‘एसयूव्ही’चे अनेक पर्याय दिले. एसयूव्ही प्रकारातील १० लाखांच्या आतील अनेक मोटारी बाजारात येत आहेत. या वाहनांचे रूप आकर्षक असून इंजिन शक्तिशाली आहे. यात प्रवाशांच्या सुरक्षेचीही काळजी घेतलेली असल्याने एसयूव्हीना पसंती मिळत आहे.
‘ईव्ही’ : प्रतीक्षा कायम
विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी मागणी वाढवण्यात अद्याप यश आलेले नाही. ईव्ही कारचा विचार करता काही मोजकेच पर्याय बाजारात असून परवडणाऱ्या पर्यायांत ३०० ते ४०० किमीपर्यंतची रेंज आहे. त्यात चार्जिग सुविधा उपलब्ध नसल्याने ईव्ही खरेदी करायची आहे, पण जरा थांबू, असा विचार अनेक ग्राहक करत आहेत. फक्त कारनिर्मिती करून चालणार नाही, पायाभूत सुविधाही दिल्या पाहिजेत याची जाणीव असल्याने टाटा मोटर्स, एमजी मोटर्स या कार उत्पादक कंपन्यांनी पायाभूत सुविधांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. पुढील काळात विद्युत वाहनांची मागणी वाढेल, असे दिसते.
हायब्रिड कारचे नवे पर्व
परवडणाऱ्या वाहनांमध्ये पर्याय आहे हायब्रिड कारचा. यापूर्वीही अशा कार बाजारात होत्याच; पण त्या मायक्रो किंवा माइल्ड हायब्रिड होत्या. त्यातील बॅटरीचा उपयोग कार सुरू किंवा बंद करण्यापुरता होता. पिकअप व टॉर्क जनरेट करण्यापुरता होता. मात्र आता प्युअर हायब्रिड कार बाजारात येत, असून त्या बॅटरी व इंजिन दोन्हीवर चालत आहेत. बॅटरी म्हणजे ईव्ही मोडवर काही मर्यादा आहेत, पण पूरक म्हणून त्या चांगले काम करतात आणि चांगले मायलेज देतात. टोयोटा मोटर्सने त्यांची कॅमरी ही कार काही महिन्यांपूर्वी प्युअर हायब्रिड स्वरूपात बाजारात आणली असून आता होंडानेही त्यांची वेगवान कार होंडा सीटी प्युअर हायब्रिड बाजारात आणली आहे. तर टोयाटो मोटर्सने अर्बन क्रुझर ही कार हायरायटर म्हणून हायब्रिड कार बाजारात आणली आहे. या कारची कंपनीने दिवाळीच्या तोंडावर किंमत जाहीर केली असून ही कार साडेदहा लाख ते १७ लाखांपर्यंत बाजारात उपलब्ध करून दिली आहे. तर २८ सप्टेंबर रोजी फ्लेक्स फ्यूएलवर चालणारी टोयोटाची कोरोला ही भारतातील पहिली हायब्रिड कार बाजारात आली आहे. इंधन म्हणून या कारमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करता येईल व त्यामुळे इंधनावर होणारा वाहनचालकांचा खर्च कमी होईल व प्रदूषणाची मात्राही संपेल, असा दावा करण्यात येत आहे.
एकूणच वाहनांची बाजारपेठ आता कोविडसाथीमुळे बसलेल्या धक्क्यातून सावरत आहे. सर्वसामान्यांचे वाहनस्वप्न पूर्ण करण्यासाठी, ज्यांना अधिक सक्षम आणि आलिशान वाहन हवे आहे, अशांच्याही मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि इंधन दरवाढीच्या आव्हानालाही तोंड देण्यासाठी ही बाजारपेठ सज्ज झाली आहे.
नवे कोरे पर्याय
किंमत सुरुवातीपासून एक्स शोरूम (दिल्ली)
कार (किंमत लाखांमध्ये)
टाटा टिगोर ईव्ही ८.४९
ह्युंदाई व्हेन्यू एन लाइन १२.१६
मिहद्रा स्कॉर्पिओ क्लासिक ११.९९
ह्युंदाई टूस्कॉन २७.७०
सीट्रॉन सी ५.७१
टोयाटो हायरायडर १०.४८
मारुती सुझुकी ब्रीझा ७.९९