करोनामुळे गेल्या दीड वर्षात अर्थचक्राची गती मंदावली होती. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर सर्वकाही सुरळीत होण्याच्या मार्गावर होतं. मात्र दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लावावं लागलं. त्यामुळे त्याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. याची झळ ऑटो सेक्टरलाही जाणवली. ऑक्टोबर महिन्यात वाहनं विक्रीत घट झाल्याचं चित्र आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशननं (FADA) या दशकातील सर्वात वाईट हंगाम असल्याचं मत नोंदवलं आहे. “४२ दिवसांच्या सणासुदीच्या हंगामात दुचाकी विक्रीत १८ टक्के, प्रवासी वाहनांच्या विक्रीत २६ टक्के, तर ट्रॅक्टर विक्रीत २३ टक्के घट झाली आहे”, असं फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशननं सांगितलं आहे.

FADA मते ऑक्टोबर किरकोळ विक्री वर्ष दर वर्षाच्या तुलनेत ५ टक्क्यांनी कमी होती. तर ऑक्टोबर २०१९ च्या तुलनेत २७ टक्क्यांनी कमी होती. तर सणासुदीत तीनचाकी वाहनांची विक्री ५३ टक्क्यांनी आणि व्यावसायिक वाहनांची १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशननं सांगितलं आहे.

“गेल्या दशकातील सर्वात वाईट सणासुदीचा हंगाम आम्ही पाहिला आहे. आम्ही ग्राहकांच्या गरजा SUV, कॉम्पॅक्ट-SUV म्हणून पूर्ण करू शकलो नाही. तसेच लक्झरी श्रेणींमध्ये वाहनांची मोठी कमतरता होती. दुसरीकडे, एंट्री-लेव्हल कारची मागणी कमी झाली कारण या श्रेणीतील ग्राहक त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्य सेवेच्या गरजेमुळे पैसे वाचवत आहेत,” FADA अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितलं.