Night Driving Tips: अनेकदा दूरचा प्रवास करण्यासाठी आणि जास्त ट्रॅफिक लागू नये म्हणून लोक रात्रीच्या वेळी प्रवास करतात. पण, रात्रीच्या वेळी प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण यावेळी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास अपघात किंवा इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

रात्री ड्राइव्ह करताना अशी घ्या काळजी

हेही वाचा:  पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत

लाइट्सची काळजी

रात्रीच्या वेळी अनेक रस्यांवर दिवे नसतात, त्यामुळे कार चालवताना दिवे व्यवस्थित काम करणं खूप गरजेचं आहे. कारमधील कोणतेही दिवे नीट काम करत नसतील तर त्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रात्री प्रवास करण्याआधी गाडीचे सर्व दिवे सुरू आहेत का याची खात्री करा.

काचा स्वच्छ ठेवा

रात्री कारमधून प्रवास करताना गाडीची काच स्वच्छ असणे खूप आवश्यक आहे. गाडीची विंडशील्ड घाण असेल तर प्रवास करताना रस्ता नीट दिसत नाही. याशिवाय, विंडशील्डवर स्क्रॅच असल्यास, समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे सुरक्षितपणे वाहन चालवण्यात अडथळे निर्माण होतात.

इतर वाहनांपासून अंतर ठेवा

रात्री प्रवास करत असताना नेहमी इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा. यामुळे तुमच्यासह इतर वाहनंदेखील सुरक्षित राहतील. अनेकदा रात्री अचानक ब्रेक लावल्यास अपघाताचा धोकाही वाढतो.

कमी बीमवर गाडी चालवा

गाडी चालवताना नेहमी कारचे हेडलाइट कमी बीमवर ठेवा. यामुळे तुमच्यासह समोरून येणाऱ्या वाहनचालकालाही सोयीचे होईल. यामुळे तुम्ही पोलिसांच्या आदेशांचेही पालन कराल.

झोप पूर्ण करा

रात्री प्रवास करण्याआधी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने आपली झोप पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून रात्री गाडी चालवताना झोप येणार नाही.

हेही वाचा: ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने पावसाळ्यातही कार दिसेल नव्यासारखी

या गोष्टींचा वापर टाळा

गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे किंवा व्हिडीओ पाहणे टाळा. तसेच हल्ली अनेकजण गाडी चालवताना रील्सदेखील काढतात ज्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते.