गावोगाव धुरळा उठला आणि डोळ्यातला कचरा निघून नीट दिसायला लागेपर्यंत आपण सगळेजण ग्लोबलायझेशनच्या दिशेने चालते झालो. आता ग्लोबलायझेशनला दुसरा कोणताही पर्याय नाही. आधी आपण कॉर्पोरेट व्हायचे आणि मग ग्लोबल व्हायचे. एखादे यान कसे, सुटले की थेट अंतराळात जाऊन पोहोचते, तशा आता आपल्या बायाबापडय़ा, बाजारबुणगे सगळ्यांना घेऊन आपल्याला थेट आधी कॉर्पोरेट आणि मग ग्लोबल व्हायला लागणार आहे. त्याला आता पर्याय नाही.

कुठे बोलू नका; पण मला एकूणच कॉर्पोरेट आणि पुन्हा ग्लोबल वगैरे ही सगळी दगदग नकोशी वाटते. आपल्या स्थानिक वाल्यात हवा भरली तरी त्याचा ग्लोबल वाल्मीकी होईलच याची मला जराही खात्री नाही. किंबहुना, सगळे ग्लोबल कॉर्पोरेट वाल्मीकी हे जुगाड करून बनलेले आहेत.. त्यांनी तर तपश्चर्या वगैरे पण काही केलेली नसावी असा मला वहीम आहे. पण सांगणार कोणाला? मागच्या वेळेला मी तुम्हाला ‘शेडय़ुल’ला आता ‘स्केडय़ुल’ म्हणायची कॉर्पोरेट भानगड सांगितली होती. मी एकाला ‘काय करतोस?’ असे विचारले. तो म्हणाला, ‘आपण शेडुल्ड कास्टचे आहोत. आपण आपल्या लोकांच्या हक्कासाठी आंदोलन करतो.’ मी त्याला म्हणालो, ‘अरे वेडय़ा, तुला कोणी सांगितले नाही का? कसा रे होणार तू ग्लोबल सिटीझन? तू आता शेडुल्ड नाही, स्केडय़ुल्ड कास्टचा आहेस असे सांगायचे.’ तो म्हणाला, ‘काय गंमत करता राव! आम्हाला अजून लोक गावचे सिटीझन म्हणूनदेखील मानत नाहीत, तर ग्लोबल सिटीझन काय मानणार? आम्ही कधी ग्लोबल सिटीझन बनणार या वेगाने?’ आता काय बोलणार यावर!

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही

बरं, कॉर्पोरेट लोक जसे उघडपणे सांगतात की, ग्लोबल गावाला जायला जे तयार नसतील तर असले ओझे उतरवून द्यायचे आणि गाडी हलकी झाली की सुसाट निघायचे. आता हेही आपल्या डोक्यात उतरत नाही. यांच्या न्यायाने शंभरातले नव्वद जर उतरवून द्यायच्याच लायकीचे असतील, तर उगा दहा लोकांसाठी गाडी भरावीच कशाला? बरंय की आपल्या गावात. कशाला जायचे ग्लोबल गावाला? असले काहीतरी मनात यायला लागते आणि जाम हताश वाटते. तरी सध्या हे बरंय की, असे हताश वाटायला लागले की प्रेरणा देणारे कोर्सेस आहेत. खूप सारे लोक मोटिव्हेशनल स्पीकर बनून तयार आहेत. त्यांच्याकडे लाख- दोन लाख भरले की ते तुमच्या मेंदूच्या टाकीत खचाखच प्रेरणा भरतात. आपल्याकडे पैसे आहेत, त्यामुळे भरपूर प्रेरणा आपल्याला विकत घेता येऊ  शकते- हा हिशोब केला आणि मग हायसे वाटले.

एका शहरात ज्यांचे पोट भरत नाही ते उगा गावगन्ना जगभर पोटाची खळगी भरायला फिरत असतात आणि मग उगा मिशांना तूप लावून आपण ग्लोबल सिटीझन झालो असा आव आणत असतात. मीही त्यातलाच एक आहे. युरोपातल्या बीचवर अंग चोरून फिरताना मी बिकिनीत आणि छोटय़ा कपडय़ांत पहुडलेल्या लोकांना पाहतो आणि आदिवासी पाडय़ांवर कंबरेला वीतभर कापड गुंडाळून फिरणाऱ्या बाया-बाप्यांनाही पाहतो. त्यांनी जग पाहिले म्हणून ते उघडे; आणि यांनी काहीच जग नाही पाहिले म्हणून हे उघडे. काहीतरी करून या पाडय़ावरच्या लोकांनाही ग्लोबल सिटीझन म्हणून घोषित करायला हवे! असले हताश विचार मनात यायला लागले की पैसे भरून मोटिव्हेशनचा डोस घेऊन येतो, म्हणजे परत कोठा साफ.

आपल्याला फाशीची शिक्षा झाली तर गळ्याभोवतीच्या टायचीच गाठ आवळतील आणि खटका ओढतील अशी मला आजकाल स्वप्ने पडतात. त्यामुळे होता होईल तो मी टाय लावतच नाही. गोऱ्याबरोबर एक व्यवहार करत होतो. व्यवहार पूर्ण झाला. मग कागदावर मी सही केली आणि गोऱ्याने पण केली. नंतर परंपरेप्रमाणे आम्ही एक सेल्फी घेतला. माझ्या एका निमगोऱ्या भारतीय मित्राने तो फोटो पाहिला आणि त्याला भयंकर संताप आला. ‘तू इतक्या महत्त्वाच्या मीटिंगला टाय का नाही लावलास?’ त्याने मला जाब विचारला. मी त्याला माझ्या स्वप्नाबद्दल काही बोललो नाही. (आपल्या स्वप्नाबद्दल जवळच्यांशी अजिबात बोलायचे नाही, हे इतक्या वर्षांच्या माझ्या कॉर्पोरेट अनुभवातून माझ्या लक्षात आले आहे.) मी त्याला माझ्या दुसऱ्या एका अडचणीबद्दल बोललो. मला अधूनमधून कॉलरमधून हात घालून पाठ खाजवायला आवडते, टायची गाठ आवळली की कॉलरमधून हात घालायची लक्झरी निघून जाते, त्यामुळे मी टाय घालायचे टाळतो, असे मी त्याला म्हणालो. तर तो जाम उखडला. शिष्टाचारापेक्षा कॉलरमधून हात घालून पाठ खाजवणे मला महत्त्वाचे वाटावे याचा त्याला संताप आला. पश्चिमेकडच्या शिष्टाचारांबद्दल पूर्वेकडचे लोक खतरनाक आग्रही असतात. आणि गोऱ्यांचे शिष्टाचार जर नीट पाळले गेले नाहीत तर गोऱ्यांना येत नाही इतका राग निमगोऱ्यांना येतो असा माझा अनुभव आहे.

पाठ खाजवण्याच्या सोयीपेक्षा जागतिकीकरणात शोभून दिसणे जास्त महत्त्वाचे आहे, यावर माझ्या निमगोऱ्या मित्राचा विश्वास होता. मी किमान टायची  ‘विंडसर नॉट’ तरी बांधायला शिकले पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. मला ‘वेडसर नॉट’ ऐकायला आले. पण मी गप्प बसलो. मी मराठी शाळेत शिकलेलो असल्याने माझ्या जवळजवळ सगळ्या मित्रांना टायची नॉट बांधता येते. कशामुळे माहीत नाही, पण मला कधीही टायची नॉट बांधता आली नाही. गळ्यापासून सुरू होऊन साधारण बेंबीपर्यंत टाय संपवा, असे म्हणतात. मी टायची गाठ बांधली तर माझा टाय बेंबीच्या सुमारे सहा बोटे वर किंवा सहा बोटे खाली संपतो आणि मग मी इतर सहकाऱ्यांमध्ये अगदीच शोभेनासा होतो. टाय कसा बांधावा, याचे एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशनही आहे. त्यानुसार मी टाय बांधायचा प्रयत्नदेखील केला. टायचा डाव्या बाजूचा तुकडा उजव्या बाजूने मागून टाकून टायच्या गाठीच्या पुढून काढावा, अशा त्यात सूचना होत्या. आता माझ्या डावीकडून की प्रतिमेत दिसणाऱ्या माझ्या डावीकडून, यावर माझा खूपच गोंधळ उडाला. शेवटी मी मला समजले तसे केले, तेव्हा आधी टायचा बो होऊन तो गळ्यापर्यंत वर आला आणि नंतर तो पायघोळ झाला.

कुठल्यातरी अतक्र्य कारणाने त्यांना जराही गरज नसताना माझी बायको, बहीण आणि मुलगी यांना टायची गाठ व्यवस्थित बांधता येते. पण त्यांची इच्छा असेल आणि मी मागच्या आठवडय़ात विनम्रतेने वागलेलो असेन तरच त्या मला गाठ बांधून देतात. प्रत्येक स्त्रीत एक कैकयी दडलेली असते आणि खिंडीत गाठून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायची कला तिला अवगत असतेच! तर ते असो.

मी माझ्या निमगोऱ्या मित्राला म्हणालो, ‘मित्रा, जागतिकीकरण झालेले असले तरी व्यापार तोच आहे. वस्तू किंवा सेवा चोख वाजवून आणि दर्जेदार द्यायची व त्या बदल्यात पैसे ठरल्याप्रमाणे घ्यायचे किंवा द्यायचे. जोपर्यंत मी सही केलेला चेक बँकेत वठतो तोपर्यंत तो चेक मी कोट-टाय घालून सही केला, की बनियनवर बसून सही केला, याने काय फरक पडतो? मला टाय बांधता येत नाही, तुला धोतर नेसता येत नाही.. झाली की नाही फिट्टमफाट?’ असा रोकडा सवाल मी निमगोऱ्याला केला. सगळ्यांची उत्क्रांती झाल्यावरही जर एखादा माकडच राहून गेला तर उरलेले ‘उत्क्रांत’ त्याच्याकडे ज्या नजरेने पाहतील, त्या नजरेने त्याने माझ्याकडे पाहिले. त्याचेही बरोबरच आहे म्हणा! ग्लोबलायझेशनच्या धबडग्यात सहभागी होतोस की नाही, असा पर्याय दिला तर माझ्यासारखे काही नतद्रष्ट ‘नाही’ म्हणून बसतील. आता सगळा देश चकाचक ग्लोबल झाल्यावर काही खुळे जर लोकलच राहिले तर ग्लोबलायझेशनला त्यांचा विटाळ नाही होणार?

अशा खुळ्यांचे काय करायचे, हा ग्लोबलायझेशनपुढचा मोठाच प्रश्न आहे असे मला वाटते. खुळे, भांबावलेले, गोंधळलेले किती लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. त्यांच्यातून ग्लोबल नागरिक कसा घडवायचा? रोज लोकलने प्रवास करणारे कितीतरी लोक आहेत. त्यांच्यातल्या अनेकांचा- गोरेगाव स्टेशनसाठी डावीकडे उतरायचे की उजवीकडे, याबद्दल अजूनही गोंधळ होतो. आता हे असले भांबावलेले लोक ग्लोबल गाडीत बसले तर आपल्या स्टेशनवर उतरतील का? की डावीकडे जाऊ  की उजवीकडे, या गोंधळात ते ट्रॅकवर उताणे पडतील? असे माझे काही स्थानिक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे कोण देणार?

चिखलात माखलेल्या बुटाला पॉलिश करून चकचकीत करता येते, तसे लोकांना घासूनपुसून तुळतुळीत करायचा काहीतरी फॉम्र्युला ग्लोबलायझेशनला शोधावा लागेल. नाहीतर तुळतुळीत ग्लोबल गावात हे खुरटय़ा दाढय़ा वाढवून फिरणारे किती बेंगरूळ दिसतील! आपल्याकडे अजून ‘एम. ए. विथ ग्लोबलायझेशन’चा सिलॅबसदेखील नाही. मग लोकांना कसे कळणार- ग्लोबल कसे व्हायचे ते? आता असल्या अगतिक लोकांना घेऊन आपण कसे पोहोचणार जागतिक गावाला?

ग्लोबल गावातले लोक प्रदूषणमुक्त आयुष्य जगायची भाषा करताहेत. त्यांना प्लॅस्टिकपासून मुक्ती हवी आहे. त्यांना रासायनिक अन्नापासून मुक्ती हवी आहे. त्यांची पोटे सुटली आहेत. आणि त्यांना ताणतणावापासून मुक्ती हवी आहे. व शक्य झाल्यास ब्लड प्रेशर आणि शुगर पण सुटायला हवी आहे. आपल्याकडच्या कितीतरी खुळ्यांना या प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचायला खूपच प्रयत्न करावे लागतील. ते प्लॅस्टिक वापरतच नाहीत. ते शिडशिडीत आहेत. त्यांना रात्री एका मिनिटात झोप लागते. आणि ते इतके मागास आहेत, की रसायनयुक्त अन्न अजून खायलादेखील शिकलेले नाहीत. त्यांच्यासाठी कधी घेऊन येताय ग्लोबलायझेशनची बस?

मंदार भारदे mandarbharde@gmail.com