जवळचे मित्र हे जुनाट आजारासारखे असतात. त्यांना आपण आयुष्यातून घालवू पण शकत नाही, त्यांच्यावर काही इलाजही करू शकत नाही. आणि नंतर नंतर तर होणारा त्रासही सवयीचा होऊन जातो. हे जेव्हा मी माझ्या मित्रांना म्हणालो तेव्हा त्यांनी माझ्याकडे अशा काही कौतुकभरल्या नजरेने पाहिले, की जणू काही मी प्रांजळपणे माझा स्वत:चा उल्लेखच जुनाट आजार म्हणून केला असावा. जगन्मित्र म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख केला जातो तेव्हा मी अचंबित होतो. आहे ते मित्र सांभाळताना जिथे दमछाक होते, तिथे हे जगन्मित्र गावभरचा पसारा कसा सांभाळत असतील? या कल्पनेनेच मला दमायला होते.

जगात सर्वात कठीण गोष्ट जर कोणती असेल तर- आपले जवळचे मित्र किती चांगले, गुणवान व सर्वगुणसंपन्न आहेत, हे आपल्या बायकोला पटवून देण्यासाठीचे मार्केटिंग! तुम्ही कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे ७५ टक्के मित्र हे बायकोला टाडा वा मोक्काखाली जेलमध्ये टाकायच्या लायकीचे वाटतात आणि उर्वरित मित्रांबद्दल ‘मला पुरेशी माहिती नाही, पण तेही तसलेच असणार’ याबद्दल तिला खात्रीच असते. नवऱ्याचे मित्र हे या देशातले प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांना सन्मानाने या देशात आणि नवऱ्याच्या आयुष्यात राहण्याचा अधिकार आहे, हे तमाम बायकांना पटवून देण्यासाठी काय करायला हवे, यासाठी देशपातळीवर कमिटी बसवावी अशी माझी सूचना आहे.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

माझे लग्न झाल्यावर आपल्या मित्रांबद्दल बायकोच्या मनात किती गैरसमज भरले आहेत हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा लग्न ठरवताना जसे मुलगी दाखवायचा कार्यक्रम असतो तसा एक मित्र दाखवायचा कार्यक्रम करावा असे माझ्या मनात आले. आणि प्रत्येक दिवशी एकेका मित्राला घरी बोलावून- मुला जा, पोहे करून आण, तुला काय काय आवडते, जीवनाबद्दल तुझे काय विचार आहेत, वगैरे प्रश्न त्याला विचारावेत आणि तो किती मौल्यवान मनुष्य आहे हे बायकोला पटवून द्यावे असा माझा विचार होता. आपल्या एका तरी मित्राच्या बायकोच्या मनात आपल्याबद्दल चांगले मत निर्माण होण्याची पुसटशी शक्यता निर्माण झालीये, या आनंदात माझ्या मित्रांनी रांगा लावून पोहे बनवले असते आणि ‘मित्रपरीक्षा’ दिली असती याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाहीये.

आपल्या नवऱ्याला किंवा लग्नाआधी आपल्या मुलाला कसे मित्र असायला हवेत याबद्दलच्या ज्या अपेक्षा वेळोवेळी व्यक्त केल्या गेल्या होत्या, तसे मित्र बरोबर बाळगणे हे जाम कंटाळवाणे झाले असते. घरातल्या स्त्रियांना पसंत पडतील आणि त्यांच्याशी आपण संबंध ठेवले तर हरकत असणार नाही असे मित्र कोणत्या खाणीत सापडतात हे एकदा शोधायलाच हवे. माझ्या वाटय़ाला आलेले मित्र ही विधात्याची एक सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे असेच माझे मत आहे. एखाद्याला मित्र कसे मिळतात, नक्की काय घटना घडते आणि मित्र नावाचा समूह बनतो, हे जाणून घ्यायला मला नेहमीच आवडते. माझ्या असे लक्षात आलेय, की संकट आणि चांगले मित्र हे आपोआप तुम्हाला शोधत येतात. मित्र आपल्या आयुष्यात कधी आले, कसे आले, याच्या फारशा नोंदीही ठेवल्या जात नाहीत. प्रेयसीच्या बाबतीत ते हिशेब अगदी कडक असतात. या दिवशी पहिल्यांदा पाहिले, या दिवशी पहिल्यांदा बोललो, वगैरे वगैरे. मित्रांच्या बाबतीत ते बिचारे कधी आयुष्यात आले आणि आपल्याबरोबर वावरायला लागले याचे हिशेब कोण ठेवतो? कोणतेही हिशेब ठेवणे बंद झाले आणि वागण्यातले सावध आडाखे निघून गेले की माणसं एकमेकांची जवळची मित्र बनत असावीत. माझ्या एका मित्राने मला सांगितले होते की, व्यवसायानिमित्त जर आपण वेगवेगळ्या शहरांत राहायला गेलो तर मला भेटायला येताना फाटक्या कपडय़ात पोहे बांधून आणू नकोस, मला पोहे अजिबात आवडत नाहीत. पुढे जाऊन तो श्रीमंत श्रीकृष्ण होणार आणि मी दरिद्री सुदामा होणार याबद्दल त्याची जी निरागस खात्री होती त्याची मला आजही ठसठशीत आठवण आहे.

मित्रांच्या अशा कितीतरी आठवणी जाग्या व्हायला लागल्या की मग थांबतच नाहीत. काळाचा केवढा तरी मोठा तुकडा मित्रांनी व्यापलेला असतो. माझा एक मित्र मोठा अधिकारी झाला म्हणून त्याचा सत्कार ठेवला होता. त्या सत्कारात लोक त्याच्याबद्दल काहीबाही चांगलं बोलत होते आणि माझ्या कानात मात्र ‘अरे, हा ठोंब्या आहे.. खायला काळ आणि भुईला भार आहे,’ हे त्याच्या वडिलांचे शब्द घुमत होते. सतत माझ्या अवतीभोवती असणाऱ्या माझ्या मित्राबद्दल माझ्या बायकोने लग्नाच्या भरमंडपात ‘याला आपल्याबरोबर हनिमूनला पण न्यायचंय का?’ असं उपहासानं विचारलं होतं. आणि तेव्हा काय मस्त आयडिया आहे असे भाव एकाच वेळी माझ्या आणि मित्राच्याही चेहऱ्यावर तरळून गेले होते. आणि आमच्याबरोबर येण्यात मित्राला काहीच गैर वाटले नसते याची मला खात्री आहे. आपले मित्र किती महत्त्वाचे आणि मौल्यवान आहेत, हे कधीच घरच्यांना समजावून सांगता येत नाही, यापेक्षा मोठा दैवदुर्विलास तो काय?

‘काम झाले की सरळ घरीच ये. उगाच या मित्राकडे, त्या मित्राकडे उकिरडे फुंकत हिंडू नकोस..’ ही भाषा तर नित्याचीच. आपल्या मित्रांबरोबर फिरण्याला उकिरडे फुंकणे म्हणतात, हे माहीत असतानाही आपण किंवा मित्र एकमेकांना उकिरडे समजत नाही, ही मला कायमच मानवी नातेसंबंधांची विराट अभिव्यक्ती वाटत आलेली आहे. ‘रोज रोज काय त्याच त्या मित्रांना भेटतोस?’ हा मला एक अनाकलनीय प्रश्न वाटत आलेला आहे. त्याच त्याच मित्रांना परत परत भेटले की नव्याने परत उगवल्यासारखे वाटते, हे यांना कसे समजावून देणार? अन्यथा दिवसभर टेनिसच्या चेंडूचे भाग्य वाटय़ाला येते. या कोर्टात पडलो तरी टोलवतात आणि त्या कोर्टात पडलो तरी टोलवतात. आपण कोणत्याही बाजूला पडलो तरी सारखे स्पष्टीकरणे देत फिरण्यात, स्वत:ला कोर्टाच्या आत ठेवण्यासाठी धडपड करण्यातच दिवस निघून जातो. मित्रांची सगळ्यात मोठी गंमत म्हणजे तिथे स्पष्टीकरणे देत बसावे लागत नाही. आणि कोणी कसेही फटके मारले तरी आपण कोर्टाबाहेर भिरकावले जाणार नाही, हा दिलासा असतो.

आयुष्यातला फार थोडा काळ हा प्रेयसीला चोरून भेटण्याचा काळ असतो. तर उर्वरित बहुतांश काळ हा मित्रांना चोरून भेटण्यात जातो, हे आयुष्यातले एक विदारक सत्य आहे. एखाद्या प्रेमात पडलेल्याला जसे ‘काय पाहिलेस त्या सटवीत?’ या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही, तसे रोज रोज कशाला भेटायला जातोस मित्रांना, याही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. बायकोने कितीही मैत्रिणी बनवल्या, त्यांना घरी बोलावले तरी त्यांचे स्वागत करायला, त्यांच्याशी ओळख करून घ्यायला, त्यांच्याशी विनम्रतेने वागायला नकार देणारा नवरा माझ्या तरी पाहण्यात नाही. पण जेव्हा तो या सगळ्याची आपल्या बायकोकडून अपेक्षा धरतो तेव्हा तो अधिकार त्याला सपशेल नाकारला जातो.

‘तुला मी किंवा मित्र यातल्या एकाची निवड करावी लागेल..’ असा तिढा बायकोने टाकला तर दरवेळी आपण खरं बोलू शकूच असे नाही. पण आपली निवड काय असेल, याचा साऱ्यांनाच अंदाज आहे. माझ्या मुलाला तो दंगा करतो म्हणून त्याच्या मित्राच्या आईने हाकलून दिले आणि आता अजिबात परीक्षा झाल्याशिवाय आमच्या घरी पाऊल ठेवू नकोस असे सांगितले. त्याच्या मित्राच्या आईचा डोळा लागलाय असे पाहून तो मित्र घराबाहेर पडला आणि पार्किंगमध्ये माझ्या मुलाला गुपचूप चोरून भेटायला आला. आज आईचा डोळा चुकवून तो माझ्या मुलाला भेटायला आलाय, उद्या पुढे जाऊन तो बायकोचा डोळा चुकवून माझ्या मुलाला भेटायला यायची कला शिकेल!

मैत्रीचा हा प्रवाह असाच वाहत राहणार आहे, हे जाणवल्यावर काय भारी वाटतेय मला!

mandarbharde@gmail.com