दगदग करणारे, धावपळ करणारे लोक पाहिले की माझ्या मनात विराट करुणा जागृत होते. रस्त्यावरून जात असताना मला शेजारच्या गाडय़ांमध्ये डोकवायचा छंद आहे. कोणी लॅपटॉप घेऊन काम करताहेत, कोणी तावातावाने फोनवर हातवारे करत बोलताहेत, तर कोणी या वेळात मेसेज पाठवून ठेवताहेत. ‘आम्हाला काम करायला दिवस पुरत नाही..’ ही तर सर्वाचीच तक्रार आहे. खूप बिझी असणारा माणूस हा खूप कार्यक्षम असतो, ही अफवा कोणी पसरवली त्याला एकदा शोधले पाहिजे. मी एक वाक्य वाचले होते.. ‘ढोरमेहनत हा जर यशस्वीतेचा निकष असता तर गाढव हा जगातला सर्वात यशस्वी प्राणी ठरला असता.’

मग हे धावपळ करणारे लोक कुठे निघालेत? कुठे पोचणार आहेत? का पळताहेत? या सगळ्याची मला भारीच उत्सुकता आहे. कारण मला अनुभवाला आले आहे की, हे धावपळ करणारे कार्यक्षम लोक खरं म्हणजे कोणत्याच गावाला पोहोचत नाहीत. बिचारे जागच्या जागीच फिरत असतात. खूप धावपळ करणे, कामासाठी दगदग करणे हे कमी फायद्याचे आणि मूलत: अडाणीपणाचे आहे हे माझ्या लक्षात आले आहे.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

माणूस जेव्हा शोध लावतो तेव्हा ते लावण्यामागची प्रेरणा काय, हा माझ्या चिरंतन चिंतनाचा विषय आहे. माझ्या संशोधनात असे लक्षात आले आहे की, दोन झोपेमधला वेळ कसा अधिकाधिक कमी करता येईल, हीच कोणत्याही संशोधनामागची मूळ प्रेरणा असते. पूर्वी एकमेकांच्या घरी जाऊन निरोप देण्यात बराच वेळ जायचा म्हणून फोन आले. जाण्या-येण्यात दमायला व्हायचे आणि वेळही जायचा म्हणून गाडय़ा, विमाने आली. तासन् तास बॅंकेच्या रांगेत उभे राहायला लागू नये म्हणून ऑनलाइन व्यवहार करायची सोय आली. या आणि अशा प्रत्येक नव्या शोधाने मुख्य काय साध्य केले असेल तर त्यामुळे दोन झोपेमधला वेळ कमी करण्याची सोय झाली. पुरुष, स्त्रिया, काळे, गोरे, लाल, तपकिरी, पिवळे अशा सगळ्यांचा जर जगण्याचा लसावि काढला तर आपल्या असे लक्षात येईल की, खूप दगदग करणे आणि त्याकरता स्वत:ला झोकून देणे याकरिता यांच्यापैकी कोणीच बनलेला नाही. पण मधल्या काळात कोणत्या तरी परकीय शक्तीने कुठला तरी व्हायरस पृथ्वीवर पसरवला आणि अचानक खूप काम करणे, खूप मेहनत घेणे याला अवास्तव प्रतिष्ठा प्राप्त झाली.

दगदग करणाऱ्या कार्यक्षम लोकांचे या पृथ्वीच्या विकासात काहीही योगदान नाही. झालेच तर त्यांच्यामुळे नुकसानच झाले आहे. पृथ्वीच्या विकासात योगदान देणारे लोक हे मूलत: आळशी होते. आणि कोणत्याही संशोधनामागे दोन झोपेतील तास कमी करणे हीच प्रेरणा असते, हे एकदा लक्षात घेतले की आपण काय चुका करत होतो, हे आपल्या लक्षात येईल.

ज्याला जास्त झोपावेसे वाटते त्याला ‘आळशी’ म्हणण्याकडे आपला कल असतो. हे जर खरे असेल तर मग हे आळशी लोक जिवाच्या कराराने उर्वरित क्षुद्र जनतेने सांभाळले पाहिजेत. आळशी लोक ही एक अतिशय मौल्यवान निर्मिती आहे. पट्टेरी वाघ वा रानडुकरांची संख्या कमी होत चालल्याबद्दल आपल्याला जशी काळजी वाटते तशी ती आळशी लोकांची संख्या कमी होत चालल्याबद्दल वाटत नाही, हे मोठेच दुर्दैव आहे. या पृथ्वीचे मूलनिवासी कोण? या प्रश्नाच्या मुळाशी गेलो तर आपल्या असे लक्षात येईल की, आळशी माणूस हा या पृथ्वीचा मूलनिवासी आहे. किंबहुना, तीच या पृथ्वीची ओळख आहे. दगदग करणारे, धावपळ करणारे महत्त्वाकांक्षी लोक ही पृथ्वीवरची प्लास्टिकसारखी अनावश्यक पैदास आहे. लवकर नष्टही होत नाही आणि उपयोगी व आकर्षक वाटत राहते. जगातला प्रत्येक महत्त्वाचा प्राणी हा झोपतो अधिक काळ आणि जागा कमी काळ असतो. भंपक कर्तबगारीच्या कथा ऐकून माणूस इतका केविलवाणा झालाय, की तो झोपतो कमी आणि जागतोच जास्त. काहीजण तर कर्तबगारीच्या भ्रामक गोष्टींमध्ये इतके गुरफटलेत, की त्यांना झोप हा प्रगतीतला अडथळाच वाटतो.

पाषाणयुगातून माणसाला बाहेर काढण्यात तत्कालीन आळशी माणसाचे योगदानच असणार यात मला जराही शंका नाही. सारखे काहीतरी कच्चे खायचे, त्यामुळे पोट बिघडायचे आणि वारंवार शौचाला जायला लागायचे आणि झोप डिस्टर्ब व्हायची. यामुळे करवादून पाषाणयुगातल्या आद्य आळशी माणसाने दगडावर दगड घासून अन्न शिजवण्यासाठी अग्नी शोधला असावा असे मानायला जागा आहे.

न्यूटन झाडाखाली झोपला होता. सफरचंद वरून पडले तेव्हा त्याच्या झोपेत व्यत्यय आला. त्याला गुरुत्वाकर्षणाबद्दल कुतूहल होते, या चारचौघांत सांगायच्या गोष्टी झाल्या. इतकी चांगली बाग. मस्त हवा वाहते आहे. अशा वातावरणात झोपही चांगली लागते. आणि एक क्षुद्र सफरचंद काय खाली पडते आणि आपली झोप मोडते, यानेच तो संतापला होता. न्यूटनची मुख्य तगमग झोप मोडायचे कारण शोधणे हीच होती. ओघाओघात गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. ज्याचे झोपेवर प्रेम असते अशा माणसाला नशीबही साथ देते आणि तो संकटातून तरूनही जातो असा माझा अनुभव आहे. सफरचंदाऐवजी नारळाच्या झाडाखाली न्यूटन झोपला असता तर गुरुत्वाकर्षण राहू दे बाजूला- काय अनावस्था प्रसंग ओढवला असता, या कल्पनेनेही माझा थरकाप उडतो. मानवाने आपल्या प्रज्ञेने अनेक शोध लावले. या शोधांनी माणसाचे जगणेच बदलून टाकले. या शोधांचे माणसाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका लेखात शरद जोशींनी असे म्हटले होते की, ‘मिक्सर, वॉशिंग मशिन यासारख्या यंत्रांनी स्त्रीला जितके स्वातंत्र्य मिळवून दिले, तितके अनेक स्त्रीवादी चळवळींनी मिळून मिळवून दिले नाही.’ कोणत्या शोधामुळे नक्की काय परिणाम होतील, हे अनेकदा शोध लावणाऱ्यालाही सांगता येत नाही. आग लावायला काडेपेटीचा शोध लागला. तर त्याच काडीचा उपयोग कान साफ करायला व्हायला लागला. नाव आणि पत्ता लक्षात ठेवायला किंवा लिहून ठेवायला लागू नये म्हणून व्हिजिटिंग कार्डचा शोध लागला. पण दात कोरायला व्हिजिटिंग कार्ड बरे पडते, हे मानवी प्रज्ञेने शोधून काढले. वाहतुकीचे साधन असलेले घोडे हे आज वाहतुकीसाठी कमी आणि जुगारासाठीच जास्त लोकप्रिय आहेत. तर ते असो.

‘तंगडय़ा वर करून पडणे, भिंतीला तुंबडय़ा लावून पडणे, ठार किंवा डाराडूर झोपणे’ हे शब्द ऐकले तरी आपल्या मनात उकळ्या फुटतात. पण आपण रूढी-परंपरेमध्ये इतके अडकून पडलो आहोत, की ‘मला जास्त झोप लागते’ हे आपण चारचौघांत मान्य करत नाही.

आळशी लोकांची वैशिष्टय़े बघितली तरी आपल्याला ही किती दिव्य निर्मिती आहे हे लक्षात येईल. कोणतेही काम कमीत कमी वेळात पूर्ण करण्याकडे अशा माणसांचा कल असतो. काम संपवायला जितका जास्त वेळ लागेल, तितके उशिरा आपल्याला झोपायला मिळेल, हे भय त्यांना असते. आळशी माणूस जग काय म्हणेल याची पर्वा करत नाही. आळशी माणसाला इगो नसतो आणि त्याचा उगाच्या उगाच अपमानही होत नाही. आळशी माणूस फार लोकांशी ओळख वाढवायला जात नाही. खूप लोक कशाला ओळखीचे असायला हवेत? उगा त्यांच्यामुळे आपला झोपेचा वेळ भविष्यात वाया जाईल अशी त्यांना भीती वाटते. आळशी माणसाला आपल्याला ढेरी सुटली आहे, किंवा आपण थोडे जाड तर झालो नाही, असले प्रश्न पडत नाहीत.

बाहेर पाऊस पडत असताना १००-२०० कि. मी. प्रवास करून कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पावसात भिजायचे, तिथे चष्म्यावरचे पाणी पुसत गळक्या टपरीवर चहा प्यायचा, कांदाभजी खायची आणि मग मित्र-मैत्रिणींबरोबर ओलेत्याने सेल्फी काढायची कल्पना बावनकशी आळशी माणसाला अघोरी वाटते. ज्या उत्कटतेने मोर पाऊस पडायला लागल्यावर पिसारा फुलवून नाचायला लागतो त्याच उत्कटतेने आळशी माणूस जरा पावसाचे चिन्ह दिसले की बिछाना पसरवून झोपायला जातो. रावणाच्या जागी त्याचा भाऊ  कुंभकर्ण लंकाधीश असता तर काय बिशाद आहे रामायण घडले असते?

आणि आता शेवटचे, पण महत्त्वाचे..

आळशी माणसाची अस्मिता दुखावली जात नाही. आळशी माणूस युद्धासाठी संघटन करत नाही. आळशी माणूस जिहाद करत नाही.

इथून पुढे कधी कुठून घोरण्याचा आवाज ऐकू आला तर तो आवाज ऐकून आनंदित व्हा. मोठा शुभशकुनी स्वर आहे तो! तुमच्या-माझ्या जगण्याला अभद्र उपद्रव पोहोचवण्याच्या ज्या करोडो जीवित शक्यता आहेत, त्यातली एक शक्यता दूर झाल्याची शुभंकर डाराडूर मंगल वार्ता त्या स्वराने आणली आहे.

mandarbharde@gmail.com