12 November 2019

News Flash

गर्भसंस्कार

कवी अशोक नायगावकर एका कवितेत त्यांच्या पद्धतीने फार मस्त वर्णन करतात..

कवी अशोक नायगावकर एका कवितेत त्यांच्या पद्धतीने फार मस्त वर्णन करतात.. एकदा एका पोलीस स्टेशनमध्ये त्यांना पाच-सहा गरोदर बायका दिसतात. अरे, यांना काय झाले? यांच्या बाबतीत काही बरे-वाईट तर घडले नाही ना, याची चौकशी करायला ते पोलीस स्टेशनमध्ये जातात तेव्हा त्यांना कळते की, तसे काही घडलेले नाही. जन्माला येणाऱ्या आपल्या मुलांचा अटकपूर्व जामीन घ्यायला त्या सगळ्या जणी तिथे आल्या होत्या. नायगावकरांनी या कवितेचा शेवट केला की मोठाच हशा पिकतो. भविष्यात गुन्हेगारी कुठल्या थरापर्यंत पोहोचेल याबद्दलचे उपहासात्मक वास्तव नायगावकरांनी या कवितेत मांडले आहे. मला मात्र कायमच मुलांचे करिअर प्लॅनिंग पालकांना कोणत्या थरापर्यंत घेऊन जाईल याची गोष्ट म्हणजे ही कविता आहे असे वाटते.

एकदा मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. तिला तिच्या मुलीच्या करिअरबद्दल फार काळजी वाटते, म्हणाली. हे असेच चालू राहिले तर भविष्यात तिच्या करिअरचे काय होणार, याने ती चिंतित होती. तिच्या करिअरसंदर्भात मार्गदर्शन करणारे कोणी माझ्या माहितीत आहे का, हे विचारायला तिने फोन केला होता. ज्या लेकीच्या करिअरबद्दल तिला चिंता वाटत होती ती तिची लेक अवघी तीन वर्षांची होती, हेही मला येथे सांगितले पाहिजे. मागे एकदा एका आजींना मी हे म्हणताना ऐकले होते की, ‘आजकाल तुमची नाटकंच फार! आम्हाला काय कधी मुलं झाली नाहीत? पण आजकालचे पालक मुलांशी असे वागतात- जणू काही मुले जन्माला घालून त्यांना वाढवायची वेळ आजवरच्या इतिहासात फक्त त्यांच्यावरच आलीये!’

मला अशा एका घाऊक गर्भसंस्कारांच्या क्लासबद्दल कळले आहे. तिथे जन्माला येणाऱ्या मुलांच्या करिअरचे गर्भावस्थेत असल्यापासूनच प्लॅनिंग केले जाते. मूल सनदी सेवेत जायला हवे असेल तर आईने कोणते संगीत ऐकायला हवे, किंवा मूल जर डॉक्टर व्हायला हवे असेल तर कोबीच्या भाजीचे मुलाच्या मावशीच्या अन्नात किती प्रमाण असायला हवे, याचे बारकाईने प्लॅनिंग या संस्कार वर्गात केले जाते. मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये गर्भसंस्काराचे विशेष वर्ग चालतात असेही मी ऐकले आहे. तिथे नेम धरून गर्भावर असे संस्कार केले जातात- की मुलगा झाला तर तो रणवीर कपूरसारखा आणि मुलगी झाली तर ती दीपिका पदुकोणसारखीच जन्माला येते. एका कामचुकार मुलीने अध्र्यात फिल्मसिटीतला कोर्स सोडला. तिला ‘कोर्सवर विश्वास ठेव, अध्र्यात सोडू नकोस,’ म्हणून तिचे गुरुजी सांगत होते. पण तिने गर्भसंस्कारांची ‘रणवीर बॅच’ अध्र्यात सोडली, त्यामुळे तिला शक्ती कपूरसारखा मुलगा झाला. आता ही माहिती पसरल्यावर सगळेच जण गर्भसंस्कार करणाऱ्या त्या गुरुजींना जाम वचकून असतात.

गर्भावर सभोवतालच्या वातावरणाचा फार परिणाम होतो म्हणे! त्यामुळे आपल्याला ज्या करिअरमधले मूल जन्माला घालायचे आहे त्या वातावरणात आईने जास्तीत जास्त काळ राहायला हवे असे म्हणतात. त्यामुळे पार्लमेंट, कलेक्टर कचेरी, मोठमोठय़ा उद्योजकांची कार्यालये, विमानतळ, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांची कार्यालये, शूटिंगचे सेट, स्टॉक मार्केट या आणि अशा ठिकाणांच्या आवारात गर्भारशी स्त्रियांची राहायची सोय करावी, म्हणजे त्यांच्या गर्भावर तिथल्या वातावरणाचा प्रभाव पडू शकेल, असाही एक प्रस्ताव आहे. एका जेलर बाईंच्या व्यक्तिमत्त्वासारखं मूल मला झालं पाहिजे म्हणून आपल्याला त्यांच्या सहवासात जेलमध्ये ठेवावे म्हणून एक मुलगी हटूनच बसली होती. काही केल्या ऐकेचना. शेवटी कोणीतरी तिला सांगितले की, आपण समजतो तितका संस्कारांचा नेम दर वेळेला लागतोच असे नाही. तू जेलर बाईंचे संस्कार व्हावेत म्हणून तिकडे जायचीस आणि चुकून आजूबाजूच्या गुंडांचेच संस्कार बाळावर व्हायचे. आणि मग जन्मल्या जन्मल्या त्याने नर्सचेच मंगळसूत्र मारले तर काय करशील? हे जेव्हा त्या व्यक्तीने तिला सांगितले तेव्हा कुठे तिने जेलमध्ये काही दिवस संस्कार मिळवायला जायचा नाद सोडला.

संस्कारांचा नेम चुकल्याची अशी अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. गर्भारशी बाईच्या धांदरटपणामुळे मूल कन्फ्यूज झाल्याचीही उदाहरणे आहेत. गर्भारशी बाईच्या कानावर काय पडायला हवे याबद्दल तर पूर्वीपासूनच लोक फार सजग आहेत. अभिमन्यूची आई हे तर गर्भसंस्कार सुरू असताना आई कन्फ्यूज झाली तर काय होते याचे आद्य उदाहरण म्हणून वानगीदाखल देता येईल. मुलाच्या करिअरबाबत आई विनाकारणच महत्त्वाकांशी असेल तर काय होते याचे अभिमन्यूची आई हे बेस्ट उदाहरण आहे. मुळात आपल्या असल्या अवघडलेल्या अवस्थेत आपण काहीतरी हलकेफुलके ऐकायचे सोडून ‘युद्धाच्या वेळी चक्रव्यूह भेदायचे रहस्य’ असले विषय ऐकायला तिने जावेच का? ‘काय वाट्टेल ते झाले तरी चालेल, पण आपला मुलगा जगज्जेता योद्धा व्हायलाच हवा’ असलेच डोहाळे तिला लागले असतील तर त्याला कोण काय करणार? अहो, वर्गातही पोरं झोपतात; अभिमन्यू तर गर्भातच होता. लागला असेल त्याचा डोळा! चक्रव्यूह कसे भेदायचे इतकेच त्याने ऐकले, बाहेर कसे यायचे हे सांगितले तेव्हा तो झोपी गेला होता. वाट्टेल त्या अपेक्षा पोरांकडून पालक करायला लागले की पोरांचे ‘अभिमन्यू’ होतात, ते असे.

गर्भारशी बाईच्या आजूबाजूचे वातावरण गर्भावर संस्कार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने आजूबाजूच्या लोकांचे वागणेही यासंदर्भात महत्त्वाचे ठरते. माझ्या माहेरी संस्कारी लोक आहेत, त्यामुळे होता होईल तो मी डिलिव्हरीपर्यंत माहेरीच राहीन, असे एकीने म्हटल्यावर मोठा अनावस्था प्रसंग ओढवला होता! एका घरात जन्माला येणाऱ्या बाळाच्या आजोबांना तंबाखू खायचे व्यसन होते. घरात मूल जन्माला यायचेय म्हटल्यावर घरातल्या लोकांनी ‘बाळावर चांगले संस्कार व्हायला हवे असतील तर तुम्ही तंबाखू सोडा,’ म्हणून आजोबांनाच दाबात घ्यायला सुरुवात केली. मग त्यांनीही युक्तिवाद केला. ‘घरातल्या गर्भभारल्या वातावरणात बाळाच्या आजोबांनी तंबाखू मळली तर बाळाचे हाताचे तळवे आणि हाताचा अंगठा मजबूत होतात,’ असा युक्तिवाद त्या आजोबांनी केला तेव्हा कुठे तो सर्वाना पटला आणि आजोबा तंबाखू मळायला मोकळे झाले.

येत्या काळात दोन व्यक्ती परस्परांशी बोलणार नाहीत तर दोन गर्भसंस्कार एकमेकांशी बोलतील की काय असे मला वाटू लागले आहे. बाळाच्या आईचे सगळ्या नऊ  महिन्यांचे रेकॉर्ड ठेवले जातील. ज्या आईने नऊ  महिने शास्त्रीय संगीत ऐकले असेल तिची मुले ज्यांच्या आईने नऊ  महिने लावणी ऐकली  त्यांच्याशी बोलणार नाहीत. गर्भारपणात ट्विटरवर अपडेट टाकणाऱ्या आईवर ‘तू तेव्हा फेसबुकवर सविस्तर पोस्ट का टाकल्या नाहीत?’ म्हणून पोरं डाफरतील. ‘तेव्हाच जर तू फेसबुकवर सविस्तर लिहिती झाली असतीस तर माझ्यावरही छान सविस्तर वर्णन करायचे संस्कार झाले असते. तुझ्यामुळे आता मला १४० शब्दांच्या पलीकडे काहीच बोलता येत नाही,’ अशी तक्रारही ती करतील.

पूर्वी ज्यांनी आपल्याला जन्माला घातले त्या आई-बापाबद्दल मुलांनी कृतज्ञ असावे अशी सरसकट पद्धत होती. आता तुम्ही त्यांना जन्माला घातले म्हणून तुम्हाला त्यांनी आई-बाप मानून कृतज्ञ राहायचे दिवस गेले. आता मुले गर्भात असताना तुम्ही त्यांच्यावर कसे संस्कार केले यावर तुमच्याप्रती कृतज्ञ राहायचे की नाही, हे ठरवणार आहेत. लग्न ठरवताना पूर्वी एकमेकांना कुंडल्या पाठवल्या जायच्या. आता त्याबरोबरच चि. सौ. कां. आणि चि. श्री.च्या आईचे डिलिव्हरीच्या वेळी तिने काय काय केले, काय काय ऐकले, काय काय खाल्ले, तिच्या आजूबाजूला कोणत्या प्रोफाइलची माणसे होती, याचे अ‍ॅटेस्टेड रेकॉर्डही पाठवावे लागतील आणि ते जुळताहेत का, तेही बघावे लागेल. शाळेत अ‍ॅडमिशन देतानाही हा रेकॉर्ड महत्त्वाचा ठरेल. गझलचे गर्भसंस्कार झालेल्याच्या शेजारी कुस्तीचे गर्भसंस्कार झालेला येऊ  नये म्हणून शिक्षकांना विशेष काळजी घ्यावी लागेल.

आपल्या दिवटय़ाने किंवा दिवटीने काय करायला हवे, हे ज्याने त्याने ठरवलेय. त्याला किंवा तिला तसे व्हायचेय की नाही, याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मुलांनी काय बनायला हवे याचे प्रेझेंटेशन प्रत्येकाने तयार केलेले आहे. आता स्लाइड जशा बदलतील तसे त्याने बनत जायचे. गर्भात असताना काय, दुपटय़ात काय, शाळेत काय, कॉलेजात काय, करिअरमध्ये काय.. सारे काही आम्ही ठरवले आहे. त्यासाठी आम्ही वेळ आणि पैसा खर्च केलाय. आम्ही ठरवलेले सारे मुलांनी फक्त ‘फॉलो’ करायचे. मुलांना स्वतंत्र मेंदू असेल आणि त्यांना स्वतंत्र चॉइस असतील, हे आम्हाला मान्य नाही. त्यांचे प्रोग्रामिंग आम्ही केलेय. त्यांना प्रोग्रामिंगबाहेर जायचा अधिकारच नाही. आम्ही गर्भापासून प्रोग्रामिंग करायला सुरुवात केलीय. मुलांकडे असणारे विविध पर्याय, त्यांच्या आवडीनिवडी हे आम्हाला काहीही मान्य नाही. आम्हाला फक्त आमच्या प्रोग्रामिंगवर विश्वास आहे. जगात कोणतेही झाड आपल्याला येणारी फुले ही दुसऱ्या झाडावरील फुलांसारखी असावीत अशी इच्छा बाळगत नाही. झेंडू झेंडूसारखा वाढतो. गुलाब गुलाबासारखा वाढतो. माणसालाच त्याची मुले स्वत:सारखी वाढायला नको आहेत; त्याला ती दुसऱ्यासारखी वाढायला हवी आहेत. प्रत्येक आई-बापाच्या काही अधुऱ्या इच्छा आणि अधुरी स्वप्ने आहेत. मुलांना ती पूर्ण करावीच लागतील. त्यांना स्वतंत्र स्वप्न पाहताच येऊ नये याची आम्ही गर्भसंस्कार करतानाच काळजी घेतलीय. मुले ही आमची अशी ‘इन्व्हेस्टमेंट’ आहे, की जिने आम्हाला आम्ही ठरवले आहेत तसे ‘रिटर्न्‍स’ द्यायलाच हवेत. मला भीती वाटते की आजकालची छोटी छोटी मुलेही ‘बनेल’ दिसायला लागली आहेत की काय! त्यांच्याबाबतीत निरागसतेचे कोणतेही प्रोग्रामिंग कोणीही केलेले नाही. परेड करणाऱ्या सैनिकांसारखी ती शिस्तबद्ध आहेत. त्यामुळे हल्लीची पोरं कमी निरागस दिसतात. स्वत:च्या स्वप्नांच्या पाठी धावत असती तर कदाचित दिसलीही असती निरागस; पण जे आई-बापाच्या स्वप्नांचा पाठलाग करताहेत आणि ज्यांना ते ‘टार्गेट’ गाठायचे आहे, त्यांना निरागस दिसायची ‘लक्झरी’ कशी परवडणार?

लहान लहान मुलांना हृदयविकाराचे धक्के येताहेत, ती तणावाखाली आहेत. एखाद्या जराजर्जर वृद्धास उगवणारा प्रत्येक दिवस ओझे वाटावा तसा उगवणारा प्रत्येक दिवस छोटय़ा छोटय़ा मुलांना ओझे वाटतोय. मुले पाठीत पोक काढून चालताहेत. ती थकलीयत. आपल्या प्रोग्रामिंगचे तीन-तेरा वाजलेत. किंबहुना, जित्याजागत्या माणसांना- जे स्वत: विचार करू शकतात, ज्यांना इच्छा-आकांक्षा असतात, भावना असतात त्यांना- आपण प्रोग्रामिंग करायला काढले, इथेच सारे चुकलेय. माझे आजोबा कायम म्हणायचे- की मुले नाही बिघडली, त्यांचे पालक बिघडलेत. दुरूस्त पालकांना करायला हवे, मुलांना नाही. मोठे होऊन मुलाने अमुक बनले पाहिजे, तमुक बनले पाहिजे, या किती फुटकळ आकांक्षा आहेत. कल्पनेत रमायला मलाही खूप आवडते. अटळच असेल प्रोग्रामिंग केलेली मुले वाढवणे, तर मग जिथे अजान ऐकायला येते तिथे हिंदू गर्भारशी पाठवा, आणि मंदिराच्या परिसरात मुस्लीम गर्भारशीला ऐकूदेत आरती.

असेल धमक तर करा की- माणूस बनायचा गर्भसंस्कार!

मंदार भारदे

mandarbharde@gmail.com

First Published on December 17, 2017 1:24 am

Web Title: articles in marathi on pregnancy