News Flash

मल्टिलेव्हल मर्कटलीला!

ठरलेल्या वेळी तो आला आणि आल्या आल्या त्याने मला प्रचंड उत्साहात ‘गुड मॉर्निंग’ केले.

नुसते मेंबर गोळा केले तर आपल्याला काहीही न करता पैसे मिळणार, हे फारच थरारक होते.

खूप जणांना माझ्याशी ओळख असावी असे वाटते. पण खूप जणांशी ओळख असायला मुळातच माझा विरोध आहे. माणूसघाणे लोक दीर्घकाळ जगतात. लोकांना भेटून भेटून जे मेंदूचे घर्षण होते, त्यामुळे आयुष्य कमी होते. त्यामुळे मी हल्ली असे घर्षण होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय. अचानक एकाचा फोन आला. मला त्याचे नावदेखील आठवत नव्हते. त्याने ‘ओळखले काय?’ असे विचारले. मला असली कोडी घालणारे लोक अजिबात आवडत नाहीत. मग मी ‘मागच्या वेळेला भेटलास तेव्हा तू मला इतका बिनमहत्त्वाचा वाटलास, की तुझे नाव किंवा चेहरा लक्षात ठेवणे मला गरजेचे वाटले नाही,’ असे सरळ सांगतो. कधी कधी मात्र मी ‘अरे, सॉरी. मला नाही आठवत..’ असे म्हणून शरिमदा होऊन दाखवतो. आणि यावेळी मी नेमका शरिमदा व्हायच्या मूडमध्ये होतो. तो गेल्या दोन वर्षांत अचानक खूप यशस्वी झालाय आणि त्यासंदर्भात त्याला मला भेटायचंय, असे त्याने सांगितले. मी ‘हो’ म्हणून बसलो. ‘तू तुझ्या जवळच्यांना बोलावून ठेव. त्यांचेही आयुष्य यशस्वी करायला मी मदत करीन,’ असे तो म्हणाला. ठरलेल्या वेळी तो आला आणि आल्या आल्या त्याने मला प्रचंड उत्साहात ‘गुड मॉर्निंग’ केले. खूप यशस्वी माणसे दुपारी दोनला ‘गुड मॉर्निंग’ करत असावीत. त्याचा पेहराव मला मजेदार वाटला. त्याने हिरव्या रंगाचा टाय लावला होता. तो खूप यशस्वी झालाय असा बिल्ला त्याने छातीवर लावला होता. आणि ‘तुला विजयी व्हायचंय का? कसे, ते मला विचार,’ अशी टोपीही घातली होती. मी एकटाच का, याचा त्याने मला जाब विचारला. बाकी सगळे कामात होते, म्हणून मी त्यावेळी रिकाम्या असलेल्या माझ्या ड्रायव्हर आणि वॉचमनला बोलावून घेतले. काय काम आहे, असे त्यांनी विचारल्यावर ‘या साहेबांना तुम्हाला यशस्वी करायचंय,’ असे सांगितले. त्याने त्याच्या डायरीतून चार-पाच लाख रुपयांचा चेक काढून माझ्या ड्रायव्हरला दाखवला. त्याने ‘बँकेत टाकून येऊ का?’ म्हणून विचारले, तर तो ‘नाही’ म्हणाला. हे असे चेक हल्ली त्याला दर आठवडय़ाला मिळतात, बँकेत टाकायलाही वेळ मिळत नाही, म्हणाला. ते पाहून आमचा वॉचमन फारच प्रभावित झाला.

त्याने ‘तू सध्या काय करतोस?’ असे मला विचारले. मी म्हणालो, ‘व्यवसाय करतो.’

‘नाही. पण यानिमित्ताने तुझ्या खूप ओळखी होत असतील ना?

‘हो, खूप होतात आणि त्याने फार घर्षण होते.’

‘त्याचाच तू फायदा करून घेतला पाहिजे. आपण सहज एखाद्याला एखादी वस्तू सुचवतो. आपण सुचवली म्हणून तो ती वस्तू विकत घेतो. त्याला चांगली वस्तू मिळते. कंपनीला फायदा होतो. पण आपल्याला काय मिळते? तेव्हा आपण एखाद्याला एखादी वस्तू विकत घे असे सांगितले तर त्याचे आपल्याला कमिशन मिळायला हवे.’ तो एक वस्तू विकतो आणि त्यातून त्याचे भविष्य आकाराला आले, असे त्याने सांगितले. जाहिरात, वितरण, होलसेलर, रिटेलर अशा सर्वाचे पैसे वाढत जाऊन आपल्याला जी वस्तू मिळते ती मूळ किमतीपेक्षा खूपच जास्त किमतीला विकत घ्यावी लागते. त्याच्या क्रांतिकारक कंपनीने ही साखळीच नष्ट केलीये आणि डायरेक्ट मार्केटिंगचा अभिनव फंडा काढलाय; ज्यामुळे या मधल्या लोकांचे पैसे थेट विक्रेत्याला मिळतात. आता या केसमध्ये मी मुख्य विक्रेता बनणार. मला तो ‘गोल्डन अचिव्हर’ म्हणणार. माझा ड्रायव्हर आणि वॉचमन म्हणजे माझी डाऊनिलक. ते मेंबर झाले की मला प्रत्येकी पाचशे रुपये मिळणार. त्यांनी प्रत्येकी दोन मेंबर केले की त्यांना ५०० आणि मला २५० रुपये मिळणार. जो जितके जास्त मेंबर करेल त्याला तितके जास्त पैसे मिळत जाणार. सुरुवातीचे मेंबर गोळा करायला थोडी मेहनत लागते; पण नंतर आपोआप पैसे वाढत जातात. एक वर्ष काम केले तर नंतर आयुष्यभर कामच करायची गरज नाही, असे तो म्हणाला.

नुसते मेंबर गोळा केले तर आपल्याला काहीही न करता पैसे मिळणार, हे फारच थरारक होते. मी त्याला चहा पाजला आणि ‘नंतर सांगतो,’ असे सांगून वेळ मागून घेतली. आणि तो बाहेर गेल्या गेल्या त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला. एक रुपयाही या माणसाच्या कंपनीत टाकायचा नाही म्हणून वॉचमन आणि ड्रायव्हरला तंबी दिली. मात्र, तरीही माझा वॉचमन चोरून त्या  कंपनीचा मेंबर बनला आहे असा मला संशय होता. कारण तो दुसऱ्या वॉचमनला सांगत होता, की आपल्या साहेबांना धंदा कळत नाही आणि ते त्यांच्या मित्रावर जळतात म्हणून त्याच्या कंपनीचे मेंबर होत नाहीत.

माझा संशय खरा ठरला. एकदा खूप लोक वॉचमनची चौकशी करत आले. त्याने त्यांना गोल्डन अचिव्हर, डायमंड अचिव्हर वगरे वगरे काय काय सांगून मित्राच्या कंपनीचे मेंबर बनवले होते. सुरुवातीला काही दिवस त्यांना पैसे मिळाले. पण नंतर कंपनीने दिलेले चेक बाऊन्स झाले. त्या मित्राला परागंदा व्हावे लागले. नंतर कुठूनतरी पोलिसांनी त्याला शोधलेच आणि तुरुंगात डांबले. भारतात मल्टिलेव्हल मार्केटिंगवाल्यांनी पहिला माणूस फसवला त्यालाही आता चाळीसहून अधिक वष्रे झाली. परंतु अजूनही लोक पुन्हा पुन्हा कसे काय फसतात, कुणास ठाऊक.

हा मला भेटायला आलेला बिल्लेवाला काहीच नाही असे महान लोक त्यांच्या सेमिनारमध्ये भेटतात. या सेमिनारचा नियम असतो- टाय लावूनच यायचे. एखाद्या चांगल्या हॉलमध्ये सेमिनार नावाचा हा सापळा लावलेला असतो. तिथे जितके खुळे गोळा केले असतील ते सगळे टाय लावून बसवलेले असतात. सर्वत्र पोस्टर, बॅनर लावलेले असतात. मग घोषणा होते- कोणीतरी डायमंड वा प्लॅटिनम अचिव्हर थोडय़ाच वेळात तिथे येईल म्हणून. तो दोन वर्षांपूर्वी कसा परिस्थितीने गांजला होता, अचानक कोणीतरी त्याला या कंपनीबद्दल सांगितले व त्याचे भविष्य कसे बदलले.. वगैरे.  हे सगळेजण त्यांच्या या उद्योगाला कंपनी किंवा व्यवसाय म्हणत नाहीत, तर ‘फॅमिली’ म्हणतात. ‘तुम्ही या कंपनीचे नाही, तर फॅमिलीचे मेंबर बनता आहात,’ असे सांगतात. आणि मग हा डायमंड अचिव्हर पद धारण करणारा नरश्रेष्ठ एखाद्या राजासारखा प्रकट होतो. लोक त्याला स्टेजवर जाऊन मिठी मारतात. मग तो फसफसत्या उत्साहाने बोलायला लागतो. या परिवाराचे माझ्यावर कसे उपकार आहेत, वगरे टेप पुन: पुन्हा लावतो. मला या खोलीत बसलेल्या प्रत्येकाला श्रीमंत झालेले पाहायचंय. एक वर्षांने जेव्हा आपण सगळे भेटू तेव्हा या हॉटेलच्या बाहेर आपल्या सगळ्यांची एकेक मर्सिडिझ उभी राहिलेली मला पाहायचीय, वगरे काय काय बोलतो. आणि लोक लगेच स्वतला गाडीच्या स्टीअिरगवर बघायला लागतात.

टाटा, एचडीएफसी, अ‍ॅपल, इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट अशा फुटकळ कंपन्यांनी आपला धंदा वाढवायला एकदाही मेंबर बनवायच्या स्कीम का काढल्या नसतील? अझीम प्रेमजी, रतन टाटा किंवा नारायण मूर्ती यांची प्रतिभाच कमी पडते. ते थोडे जरी हुशार असते तर कोणत्या तरी मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीला जॉइन झाले असते आणि मग त्यांनीसुद्धा मेंबर गोळा करायला सुरुवात केली असती. या कंपन्यांच्या सेमिनारमध्ये त्यांचे महान डायमंड वा प्लॅटिनम अचिव्हर ज्या उत्साहाने व आत्मविश्वासाने वावरत असतात ते पाहिल्यावर या मंडळींना घाम फुटल्याशिवाय राहिला नसता. सरकारला या कंपन्यांचे महत्त्वच अजून कळलेले नाही. त्यामुळेच त्यांनी या कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचे सोडून हा व्यवसाय कोणत्याही स्वरूपात करायला बंदी आणलीय. जगातल्या सर्व प्रगत देशांमध्ये चेन मार्केटिंगचा व्यवसाय करायला बंदी आहे. कितीतरी मल्टिनॅशनल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबलंय. आणि कितीतरी माजी डायमंड व प्लॅटिनम अचिव्हर, मोटिव्हेटर तुरुंगात खितपत पडले आहेत. हल्ली तर जे इतरांना मेंबर बनवायचा प्रयत्न करतात त्यांनाही उचलून तुरुंगात टाकतात. आपल्या सरकारला या असल्या उत्साही लोकांचा त्रास का होतो, तेच कळत नाही. हे लोक आधी स्वतचे पैसे जाळून मेंबर होतात. मग आपल्या नात्यातल्यांना, ऑफिसमधल्या लोकांना मेंबर करतात. बऱ्याचदा असे मेंबर करायला बाहेर पडलेल्या लोकांना जवळचे लोक टाळायला लागतात. हे लोक स्वतचे नातलग गमावून बसतात. जवळचे लोक गमावून बसतात. प्रतिष्ठा गमावून बसतात. तरीही ते प्रयत्न करणे सोडत नाहीत. पुढे पुढे तर जो दिसेल त्याला मेंबर करायची चढाओढ लागते. एकजण एकदा मेंबर झाला की त्याला त्याची मान सोडवायची असेल तर दुसऱ्यांना मेंबर बनवावेच लागते. कधीतरी ही चेन तुटते आणि लोकांना पैसे मिळणे बंद होते. कोणीतरी माथेफिरू केस दाखल करतो आणि मग कंपनीला टाळे लागते आणि कंपनीचे महत्त्वाचे लोक, मेंबर तुरुंगात जातात. अनेकदा कंपनीचा मालक कुठेतरी परदेशात पळून गेलेला असतो आणि आपले स्थानिक खुळे त्याचे कुंकू लावून सेमिनार घेत फिरत असतात. त्यामुळे कंपनी बोंबलली की मालक फरार आणि स्थानिक खुळे तुरुंगात अशी परिस्थिती होते. पण तरीही हे मेंबर बनवणारे लोक हटत नाहीत. दरवेळी त्यांना वाटते की, मागची कंपनी फ्रॉड होती; नवीन कंपनी चांगली आहे. परत नव्या नावाने नवे सेमिनार सुरू होतात आणि नवे, ताजे मेंबर बनतात. अशा या मेहनती लोकांना प्रोत्साहन द्यायचे सोडून सरकारने हा धंदा अवैध घोषित केलाय.

मलाही नेहमी वाटते, की मला माझ्या मेहनतीच्या मानाने पुरेसे पैसे मिळत नाहीत. रातोरात फ्लॅट आणि गाडी मिळाली तर मलाही आनंद होईल. पण मी इतका बिनडोक आहे, की अजूनही मला टाटा, मूर्ती, प्रेमजी यांचाच मार्ग भला वाटतो. काय वाट्टेल ते झाले तरी मेंबर बनवून व्यवसाय करता येतो, हे मला पटतच नाहीये. मला मेंबर बनवण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनो, माझ्याकडे येणार असाल तर मी दारातच सोटा आणून ठेवलाय हे लक्षात असू द्यावे, ही विनंती!

मंदार भारदे mandarbharde@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2017 3:00 am

Web Title: author mandar bharde article on chain marketing business
Next Stories
1 उधारउसनवारीकर!
2 ‘सेल्फी’श!
3 अहं ब्रह्मास्मि
Just Now!
X