25 February 2021

News Flash

विवेकवाद्यांसमोरचे संभ्रमित प्रश्न

दुसऱ्या एकाने सांगितले की, ज्याची बेरीज सहा आहे त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नकोस

खोटं का बोलू? पण हा सगळा प्रवास अतीव गोंधळाचा आणि पुन्हा पुन्हा स्वत:शी हरण्याचाच होता.

मी नास्तिक होऊनही आता बरीच वर्ष झाली. ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर’ ही म्हण मी पहिल्यांदा ऐकली आणि मग मी नास्तिक बनायच्या वाटेवर चालायला लागलो. आपल्याकडे माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला काही कळायच्या आतच आस्तिक करून टाकतात. जन्माने त्याला जात, धर्म आणि त्या अनुषंगाने श्रद्धास्थान मिळूनच जाते. त्यामुळे मी अनेक धर्माचा अभ्यास केला, अनेक देवदेवतांची चरित्रे तपासली, त्यांच्या शिकवणीचा अभ्यास केला आणि मगच माझा धर्म आणि इष्टदेवता निवडली. असे जवळजवळ कधीच कोणाच्याही बाबतीत होत नाही. जराही विचार न करता जन्माने वाटय़ाला आलेला धर्म आणि देवता यांच्यावर श्रद्धा ठेवून आयुष्यभर त्यांचीच उपासना करत राहणे, हे बहुतांश आस्तिकांच्या बाबतीत घडते. त्यामुळे ‘अमुक एका देवतेची उपासना तू का करतोस?’ या प्रश्नाचे उत्तर- ‘त्या देवतेवर माझी श्रद्धा आहे,’ यापलीकडे देता येत नाही. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक जण हा आस्तिक असतोच. नास्तिकाला आस्तिकतेतून बाहेर पडण्याचा आधी प्रयत्न करायला लागतो आणि मगच त्याचा नास्तिकतेच्या, विवेकवादाच्या वाटेवरचा प्रवास सुरू होतो. आस्तिकतेला प्रदीर्घ परंपरा आहे. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवायला आस्तिकतेने आपले युक्तिवाद वर्षांनुवर्षे बनवलेत. म्हणजे मी जेव्हा नास्तिकतेच्या वाटेवर चालायला लागलो तेव्हा मला एका श्रद्धाळू माणसाने विचारले की, ‘तू देवावर विश्वास का ठेवत नाहीस?’ मी म्हणालो, ‘मी त्याला पाहिलेले नाही. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. माझी एकदा देवाशी भेट झाली तर मी त्याच्यावर विश्वास ठेवीन.’ मग तो म्हणाला, ‘तू कधी हवा पाहिली आहेस का? आपल्याला हवा दिसत नाही, पण ती असतेच ना? तसाच देव दिसत नाही, पण तो असतोच.’ आता हा युक्तिवाद तर बिनतोड वाटतो. मग मला बरेच दिवस गोंधळलेल्या परिस्थितीत काढावे लागले. हवा दिसत नाही, पण जर ती असते; तसाच देव दिसत नसला तरी तो असतोच. आस्तिक माणसे ही फार सहृदयी असतात आणि समोरच्याला त्यांना समजलेल्या धार्मिक तोडग्यांचा उपयोग व्हावा म्हणून ती मनापासून प्रयत्न करीत असतात.

अचानक एकाने येऊन मला सांगितले की, माझ्या नशिबात भाग्ययोग लिहिला आहे. फक्त मी ज्यांच्या नावात अनुस्वार आहे त्यांच्यापासून थोडे दूर राहायला हवे. आता मी त्याच्याकडे काही समस्येवर तोडगा मागायला गेलो नव्हतो; पण मी नास्तिक आणि विवेकवादी बनायचा प्रयत्न करतोय, हे कळल्याने तो मोठय़ा काळजीने आला आणि मला मोठय़ा समजूतदारपणे म्हणाला, ‘तुम्ही विश्वास ठेवू नका, तुम्हीच अनुभव घ्या आणि मला सांगा.’ आता काय सांगणार? मी आस्तिकतेचा हात नुकताच सोडला होता आणि विवेकवादाचा हात अजून घट्ट हातात आलेला नव्हता. मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, आणि जोपर्यंत मी परीक्षा घेत नाही तोपर्यंत ते खोटे आहे असेही म्हणू शकत नाही. ‘माझा तसा विश्वास नाहीये, पण उगाच रिस्क कशाला घ्या?’ असा विचार मनात आलाच नाही असे उगाच खोटे कशाला बोलू?

जगात नावात मात्रा असलेले लोक आहेत, काना असलेले आहेत, वेलांटी असलेले आहेत; पण मी मात्र अनुस्वारवाल्यांवर लक्ष ठेवायला लागलो. एकदा डोक्यात व्हायरस सोडला की तो बरोबर काम करत राहतो. आत्तापर्यंतच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची नावे स्कॅन केली. नावावर अनुस्वार असलेले आणि त्रास दिलेले दोन-चारजण सहज समोर आले. बाप रे! आपण तर या गोष्टी मानत नाही. आपल्याला खरंच नावावर अनुस्वार असलेले लाभत नाहीत की काय? आपण विवेकवादी आहोत.. पण तरीही तर्काच्या पलीकडच्या काही गोष्टी असतीलच ना! मग काय, एखाद्याशी नवीन ओळख झाली की नकळतच मन त्याच्या नावावर अनुस्वार तर नाही ना, याची खात्री करून घ्यायचे. सगळाच ताप होऊन बसला होता. बरेच महिने लोकांच्या नावावरच्या अनुस्वारांवर लक्ष ठेवल्यावर लक्षात आले की, आपल्या स्वत:च्या आणि आपल्या वडिलांच्या नावावरही अनुस्वार आहे. म्हणजे आता आपण स्वत:ही स्वत:ला ‘लकी’ नाही की काय? हा विचार मनात आल्यावर अनुस्वाराच्या जाचातून माझी सुटका झाली.

दुसऱ्या एकाने सांगितले की, ज्याची बेरीज सहा आहे त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नकोस. जुन्या अनुभवामुळे आधी स्वत:चे जन्मवर्ष, महिना आणि दिवसाची बेरीज केली. ती सुदैवाने सहा नव्हती, म्हणून सुटकेचा नि:श्वास सोडला. पण मनाला वेगळाच चाळा लागला. रस्त्यावरच्या कुठल्याही वाहनाच्या नंबर प्लेटची बेरीज करायची सवय लागली. म्हणजे टँ १५- ३१७८ समोर दिसली की मी फटकन् सगळी बेरीज करायचो. मी मुंबईत राहतो आणि रोज वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करतो. एका साध्या ८-१० कि. मी.च्या प्रवासात हजारो वाहने आजूबाजूने जात असतात. म्हणजे या दीड-दोन तासाच्या प्रवासात मी हजारो वेळेला नंबर प्लेटच्या बेरजा करायचो आणि सहा आकडय़ांची बेरीज असलेली गाडी दिसली की आता काही आपले काम होणार नाही असेच मनात येत राहायचे. उबेर, ओला, रिक्षात बसलो की मी आधी बेरीज करायचो आणि ती सहा आली की आता काही आपले काम होत नाही असे मनात यायचे. लोकांच्या बिल्डिंगचे, फ्लॅटचे नंबर ६ नाही ना, याची मी नकळतच खात्री करून घ्यायचो. या बेरजा करायचा इतका चाळा लागला होता, की मी शेवटी रस्त्यावरच्या गाडय़ांच्या बेरजा करण्यापेक्षा डोळे मिटून गाडीत बसायला लागलो होतो. शेवटी मी आवर्जून सहा बेरीज असलेली गाडी घेतली आणि मग जेव्हा लक्षात आले, की नेहमीच्याच गतीने आपली कामे होताहेत किंवा होत नाहीयेत, तेव्हा कुठे रस्त्यावरच्या गाडय़ांची बेरीज करायची माझी सवय सुटली.

मित्रमंडळींमध्ये मोठा गाजावाजा करत मी नास्तिक बनलो होतो. कधीतरी अडीअडचणीला वाटायचे, जाऊ दे, मित्रांना काय कळणार आहे.. आपण मनातल्या मनात स्तोत्र म्हणत जाऊ या. उगा थोडक्यासाठी कशाला रिस्क घ्या! माझ्या एका व्यापारी मित्राने मला सांगितले, ‘क्या है मंदारभाई, भगवान है की नहीं, पता नहीं! नहीं है तो कोई प्रॉब्लेम नहीं. लेकिन समझो होगाच, तो काय को रिस्क लेने का? आपुन टेक्निकली करेक्ट रहेने का. बाद में लफडा नहीं चाहिये.’

विवेकवादी बनणे माणसाला महत्त्वाचे वाटते. मग तो देवपूजा किंवा विधी यांपासून लांब राहायला लागतो. नास्तिक बनतो. मग आपला धर्म किंवा जात त्याला महत्त्वाची वाटत नाही. आणि मग साधारणत: तो ज्योतिष आणि त्याच्याशी निगडित भाकिते यापासून लांब राहायला लागतो. यातले ज्योतिष हा मोठाच गमतीचा भाग आहे. आयुष्याचे कोणतेही भाकीत शक्य नाही, असेच माझे अनेक वर्ष मत आहे. पण वर्तमानपत्रांतील भविष्ये वाचावीशी किंवा टीव्हीवरची भविष्ये ऐकावीशी वाटायचीच. हे चूक आहे, आपल्याला उत्सुकता वाटताच कामा नये, हे कळायचे. पण चुकून वाचले किंवा ऐकले गेले की दिवसभर तसे होते आहे की नाही, याची खातरजमा मन करीत राहायचे आणि शेवटी शरमिंदा व्हायला व्हायचे. मग चुकूनही भविष्य डोळ्याला पडूच नये म्हणून मी जिथे भविष्य छापले आहे त्याच्या शेजारची बातमी वाचायचोच नाही. मग आस्तिक लोक येऊन नव्या नव्या बातम्या द्यायचे.. ‘अरे, तुला माहीत नाही, पण दाभोलकरांनी घरी गुपचूप सत्यनारायण केला.’ ‘तू अमुक एकाला विवेकवादी मानतोस ना! अरे, ते तर अमुक एका महाराजांचे निस्सीम भक्त आहेत.’ किंवा ‘अमुक एका देवस्थानाने तर हॉस्पिटलं बांधली, शाळा बांधल्या. शेवटी देवाच्या नावाने जो पैसे गोळा झाला तो लोकांच्याच कामाला आला..’ वगैरे वगैरे.

खोटं का बोलू? पण हा सगळा प्रवास अतीव गोंधळाचा आणि पुन्हा पुन्हा स्वत:शी हरण्याचाच होता. पाठीचा कणाच मोडेल असे संकट आले की वाटायचे, की देवावर श्रद्धा ठेवून थोडे झुकलो तर संकट टळेल. आणि कणा उन्नत होईल असे काही हातून घडले की वाटायचे, नाही झुकलो तरी काय फरक पडला? कितीतरी खाचखळगे पार करत आणि अजूनही धडपडतच आपल्याला विवेकाच्या वाटणाऱ्या वाटेवरून चालत राहावे लागते. जे श्रद्धाळू आहेत त्यांचा प्रवास फार सोपा आहे असेच वाटत राहते. श्रद्धा ठेवली आणि काम मनासारखे झाले तर श्रद्धास्थानाला श्रेय देता येते. श्रद्धा ठेवली आणि बराच काळपर्यंत काम नाही झाले, तर सबुरी आवश्यक आहे, ही सबुरीची परीक्षा द्यावीच लागेल, म्हणून श्रद्धेचा प्रवास सुरू ठेवता येतो. आणि श्रद्धा ठेवली, उपासना केली, आणि तरीही काही फारच दुर्दैवी घडले तर ‘हे मागल्या जन्मीचे पाप आहे’, या जन्मी जर अक्षुन्न श्रद्धा ठेवली तर पुढचा जन्म सोपा होईल, असे म्हणूनही श्रद्धा अबाधित ठेवता येते. आज इतकी वर्षे मला जो विवेकवाद वाटतो त्या नास्तिकतेच्या रस्त्यावर चालल्यावरचे माझे आकलन काय आहे? याचा विचार केल्यावर काही फार मोजकी तथ्ये हाताला लागतात. अनाहुतपणे अनेक गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात. लोक ज्याला साधारणपणे ‘नियतीचे निर्णय’ म्हणतात, हे निर्णय तुम्ही काहीही केले तरी बदलत नाहीत. ते बिलकुल अपरिवर्तनीय आहेत. तुम्ही आस्तिक आहात  की नास्तिक आहात याने ‘सो कॉल्ड’ नियतीच्या निर्णयांमध्ये काहीही फरक पडत नाही. नियतीच्या निर्णयांचा कोणताही अंदाज बांधता येत नाही आणि काहीही उपाय करून त्यात बदलही करता येत नाही. तुम्ही अजिबात श्रद्धाळू नसाल तरी सत्त्वाची टोचणी मात्र जिवंत राहतेच. आणि तुम्ही कोणत्याही देवतेच्या कोपाला जाम घाबरत नसलात तरी ही सत्त्वाची टोचणी तुम्हाला सत्शील वाटेवर चालवत राहतेच. श्रद्धाळू लोकांच्या हातून पाप घडल्यावर पापक्षालन करण्याचे उपाय त्यांनी उपलब्ध केले आहेत. आपण नास्तिक! नास्तिकांना पापक्षालनाचे कोणतेही मार्ग नाहीत. त्यामुळे पाप अजिबात न करणे हा एकमेव मार्ग आहे. हे जग कोण चालवते? लोकांच्या पाप-पुण्याचा हिशेब कोण ठेवते? श्रद्धा ठेवली तर मनासारखे होते का? पुढे काय घडणार आहे याच्या शकुनांचा काही अंदाज बांधता येईल का? यांसारख्या प्रश्नांच्या गुंत्यातून हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयास करत राहणे, हा एकच मार्ग आहे. नाहीतर गाडय़ांच्या नंबर प्लेटची बेरीज करणे वाटय़ाला येते. हे जग कोणी का चालवेना.. काय फरक पडतो? पाप-पुण्याचे हिशोब आपल्याशिवाय कोण चांगले ठेवणार? पुढे जे काही घडणार असेल आणि ते जर कशानेच समजा बदलणारे नसेल, तर उगा भविष्य मांडून त्याचे आडाखे मांडण्यात काय हशील आहे? असे एकेका गोष्टीचे आकलन होत जाते.

डाव्या कुशीवर झोपायचे की उजव्या? हात खाजताहेत तर पैसे मिळतील का? ऑफिसच्या खुर्चीची जागा बदलली तर जास्त व्यवसाय होईल का? हल्ली खूप चिडचिड होते, तर एखादी भाग्ययोग उघडणारी अंगठी ट्राय करून बघायची का? यासारखे कितीतरी स्पीड-ब्रेकर अजून रस्त्यात येणारच आहेत. तेव्हा आपला स्टॅन्ड काय असेल? यासारखे प्रश्न शेवटी ‘जे होईल ते होईल, बघून घेऊ..’ या बेदरकार रस्त्यावर आणून सोडतात. एकदा पोहायचे आहेच, हे ठरवले की भोवरे लागतील तरी पोहायचंय आणि संथ पाणी लागलं तरी पोहायचंय. आपल्या उपासनेने ना भोवरे कमी होणारेत, ना संथ झुळझुळते पाणी आयुष्यभर मिळणार आहे. भोवरे वाटय़ाला का येताहेत, याची खंत करणे थांबवले आणि कायमस्वरूपी झुळझुळणारे पाणीच वाटय़ाला यावे, ही लालसा मनातून काढून टाकली की पोहण्याचा मस्त आनंद घेता येतो, असेच माझे तरी आकलन आहे.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 4:47 am

Web Title: author mandar bharde article on god worship
Next Stories
1 सांगे वडिलांची कीर्ती!
2 ‘हवाई’ स्त्रीपुराण..
3 अभिव्यक्तिस्वातंत्र्य!
Just Now!
X