News Flash

बाईट

२४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या हे मानवी प्रज्ञेला पडलेले एक सुरेख स्वप्न आहे

अनेकदा स्टुडिओत बोलावलेल्या लोकांपेक्षा त्याचा बाईट चांगला होतो.

२४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या हे मानवी प्रज्ञेला पडलेले एक सुरेख स्वप्न आहे. पूर्वी मला असे वाटायचे की, कोणीतरी एखादी जनहितार्थ याचिका टाकून पूर्वी उगाच दिवसांतून तीन-चार वेळेला बातम्या देणाऱ्या वाहिन्यांना २४ तासांचे करून घेतले असावे. कोणीही मागणी न करता जर एखादी घटना घडली, किंवा एखादा शासन निर्णय झाला, की बहुतांश वेळेला कोणीतरी रिकामटेकडा काहीतरी तितकीच बिनमहत्त्वाची गोष्ट जनहितार्थ आहे, हे कोर्टाला पटवून देण्यात यशस्वी झालाय असे समजायला काहीच हरकत नाही.

पण मी चुकीचा विचार करत होतो असे माझ्या नंतर लक्षात आले. लोकांना २४ तास बातम्यांची गरज होतीच. या वाहिन्यांनी ती गरज ओळखली. अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्सुकता या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या चारही गोष्टींचे कधीही शमन होत नाही.

गोंदिया पंचायत समितीने ठेकेदारांचे पसे दिले की नाही, या बातमीबद्दल सिंधुदुर्गच्या लोकांना जी अपार उत्सुकता असते ती २४ तास बातम्यांमुळे ताबडतोब शमवली जाते. परभणी जिल्हा रुग्णालयातल्या अनागोंदी कारभारामुळे पालघरमध्ये विलक्षण अस्वस्थता पसरल्याचा तर माझाच अनुभव आहे. गावच्या गुंडांबद्दल एकदा माहिती झाली की राज्य- पातळीवरच्या गुंडांची माहिती असावी असे वाटते. नंतर राष्ट्रीय आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुंड-मवाली कोण आहेत आणि सध्या ते काय करताहेत, याबद्दल उत्सुकता वाटत राहते.

या २४ तास वाहिन्यांमुळे अनेक जणांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आला याची आपण विनम्र जाणीव ठेवायला हवी. मी मागेही तुम्हाला म्हणालो होतो, की देशातल्या विचारवंतांची संख्या झपाटय़ाने कमी होत चालली आहे याची मला सतत काळजी वाटत राहते. पण वाहिन्यांवरचे संध्याकाळचे चर्चाचे कार्यक्रम पाहिले की ही काळजी दूर होते. एका चॅनेलला एका विषयावर चर्चा करायला एका रात्रीत १३-१४ अभ्यासू विचारवंत मिळतात, हे फारच दिलासादायक आहे. आणि त्यातले काही विचारवंत तर एकाच वेळेला अनेक विषयांतले तज्ज्ञ आहेत, हे तर काहीच्या काही आशादायक आहे. एका वृत्तवाहिनीला एका महिन्यात साधारणपणे १३०० ते २१०० तज्ज्ञ लागतात. बरं, कोणता तज्ज्ञ नक्की कधी लागेल याची कोणतीही खात्री नाही. त्यामुळे लवकरात लवकर स्टुडिओत पोहोचू शकणे हा ‘तज्ज्ञ’ बनण्याचा एक महत्त्वाचा निकष आहे. माझ्या माहितीतले ग्रामीण भागातल्या समस्यांवर मूलभूत काम करणारे एक विचारवंत तर हल्ली मुंबईलाच शिफ्ट झालेत. मागे दोन-चार वेळा जेव्हा चॅनेलवाल्यांनी त्यांना फोन केला तेव्हा ते ग्रामीण भागात होते. त्यामुळे त्यांना लाइव्ह चच्रेला जाता आले नाही. म्हणून त्यांनी आता ग्रामीण भागात जाणेच बंद करून टाकले आहे. ते आपले सतत मुंबईत थांबतात आणि बोलावले की चच्रेला हजर होतात. मागे एकदा मी माझ्या परिचयाच्या ग्रामीण अभ्यासकाला मुंबईतल्या पाणी-समस्येच्या चच्रेत सहभागी होताना पाहिले होते. मी त्यांना अभिनंदनाचा फोन केला आणि तुमचे अभ्यासाचे विषय कोणते कोणते आहेत, याबद्दल विचारले. तर त्यांनी मला मोठय़ा गौरवाने सांगितले, की ते कुक्कुटपालन ते सीरिया यांपकी कोणत्याही विषयावर बोलू शकतात. २४ तास चालणाऱ्या वृत्त वाहिन्या नसत्या तर इतक्या मौल्यवान लोकांची प्रतिभा आपल्याला कळलीच नसती, या कल्पनेने मला या वाहिन्यांबद्दल कृतज्ञता दाटून आली.

वाहिन्यांना मुलाखती देणाऱ्या लोकांची कायमच गरज पडते. यात जसे तज्ज्ञ लागतात, तसेच भरपूर सारे सामान्य लोकदेखील लागतात. स्वत:ला सामान्य समजणारा मराठी माणूस मला आजवर भेटलेला नाही. इथे सगळी असामान्यांचीच भाऊगर्दी. इथला प्रत्येकजण स्वत:ला ज्ञानेश्वर आणि इतरांना रेडा समजतो. त्यामुळे सामान्य माणूस म्हणून रस्त्यावरच्या लोकांना जेव्हा चॅनेलवाले गोळा करतात तेव्हा ते काय सांगून त्यांना मुलाखत द्यायला राजी करून आणतात याची मला खूपच उत्सुकता आहे. नाही म्हणजे ‘आमच्या चॅनेलवर काही तज्ज्ञ स्टुडिओत बसणार आहेत. त्यांना आमचे संपादक प्रश्न विचारणार आहेत. त्यांनी आम्हाला रस्त्यावरून फिरणारे काही ‘मोकार’ बोलायला गोळा करून आणायला सांगितलेत. तुम्ही ‘मोकार’ म्हणून मस्त शोभून दिसाल. तर जरा कॅमेरासमोर उभे राहता का?’ असे विचारतात, की ‘स्टुडिओत काही तज्ज्ञ बोलावलेत. पण मला नाही वाटत, त्यांना एकूणच चच्रेचा विषय झेपेल. तेव्हा रस्त्यावरून आम्ही काही लोक पकडून आणून त्यामुळे तरी काही उजेड पडतोय का, हे बघायचं ठरवलंय. आता कोणीतरी बोलवायचे तर तुम्ही काय वाईट आहात? तर तुम्हीच बोला!’ असे सांगतात, याची मला खूप उत्सुकता आहे. ते काहीही असो; पण २४ तास बातम्या देणाऱ्या आणि लोकांच्या मुलाखती घेणाऱ्या वाहिन्यांमुळे पूर्वीपेक्षा जास्त स्त्रिया नीटनेटक्या राहायला लागल्या आणि जास्त संख्येने पुरुष रोज दाढी करून बाहेर पडायला लागले, हे सत्य आहे. प्रत्येकालाच असे वाटते की, कधीतरी आपल्याला रस्त्यावर मत मांडावं लागेल. आणि मग कॅमेरा समोर आल्यावर कसे सांगणार- की दहा मिनिटे थांबा, मी जरा दाढी करून येतो. त्यापेक्षा रोजच्या रोज दाढी करूनच रस्त्यावर फिरणे उत्तम. वेळ-काळ काय सांगून येत नाही.

माझा एक मित्र मंत्रालयात काम करतो. त्याचे आणि त्याच्या बायकोचे एकदा घणाघाती भांडण झाले. मंत्रालय आणि आजूबाजूच्या परिसराला पत्रकारांचा वेढा पडलेला असतो. एकदा एक मंत्री कोणत्यातरी विषयावर बाईट देत असताना माझा मित्र त्याच्याच खात्याचे ते मंत्री असल्याने मागे उभा होता. टीव्हीचे कॅमेरे सुरू असताना हा वेंधळ्यासारखा इकडे-तिकडे बघत होता, हा त्याच्यावर त्याच्या बायकोचा आरोप होता. माझ्या माहेरच्या सर्वानी यांना टीव्हीवर पाहिले. जरा नीटनेटके ऑफिसला नको जायला? चांगले कपडे घालून नीटनेटके मंत्रालयात जाता येत नसेल तर साइड पोिस्टग मागून घ्या, असा टोमणाही तिने मारला. नव्वदच्या दशकानंतर नेतेही आपल्या दिसण्याबद्दल जास्त जागरूक झालेत. पूर्वीचे नेते बिचारे मोठे असले तरी रया गेल्यासारखे दिसायचे. आता मात्र अगदी उमेदवारी करणारा नेताही तेजतर्रार दिसतो. भारतीय नेत्यांचा चेहरा बदलण्यातले वाहिन्यांचे योगदान आपल्याला नाकारताच येणार नाही.

मागच्या दहा वर्षांतल्या जुन्या बातम्यांच्या टेप काढून बघा. तुम्हाला लक्षात येईल की रस्त्यावर मुलाखती देणारे दिवसेंदिवस अधिक सफाईदार होत चाललेत. माझ्या माहितीतला एकजण रोज सकाळी सगळी वर्तमानपत्रे वाचतो आणि मग आज वाहिन्यावाले कोणत्या विषयावर मुलाखती घेतील याचा अंदाज बांधतो आणि त्या विषयावर आपण काय मत द्यायचे याची तयारी करतो. बहुतांश वेळा त्याचा अंदाज बरोबर येतो. तयारी झाली की तो पत्रकारांच्या आजूबाजूला घुटमळत राहतो आणि मग सामान्य माणूस म्हणून रस्त्यावर उभा राहून बाईट देतो. अनेकदा स्टुडिओत बोलावलेल्या लोकांपेक्षा त्याचा बाईट चांगला होतो.

एखाद्या बातमीचा माग काढत जसे पत्रकार फिरत असतात, तसेच पत्रकारांचा माग काढत मुलाखती देत फिरणारे लोक मला माहिती आहेत. पत्रकारांचे लक्ष वेधून घ्यायची कला आता लोकांना बरोबर माहिती आहे. एकदा एका जवानाला वीरमरण आले म्हणून ती बातमी कव्हर करायला पत्रकार गेले होते. तिथे दूर एकजण हुंदके देऊन रडत होता. त्याच्यापुढे माईक केल्यावर तो म्हणाला, ‘आमच्या घरातला शेवटचा माणूस उरला तरी तो देशासाठी बलिदान करायला क्षणभरही मागेपुढे पाहणार नाही.’ झालं. सगळीकडे हीच ब्रेकिंग न्यूज : वीर जवानाच्या घरातला शेवटचा माणूसही बलिदान करायला मागेपुढे पाहणार नाही! त्या जवानाच्या खऱ्या नातलगांनी तक्रार केली- हा कोण आहे? हा काही आमचा नातलग नाही. मग शोध केला तेव्हा कळले, की चॅनेलवाल्यांचे लक्ष जावे म्हणून भलत्याच कोणीतरी हंबरडा फोडला होता आणि नातलग म्हणून बाईट दिला होता. आता असली बनेल सामान्य माणसे आजूबाजूला असताना चॅनेलवाल्यांनी काम तरी कसे करायचे? माझ्या माहितीतला एक सराईत बाईट देणारा मला सांगत होता की- तो बाईट देण्यापूर्वी विचारून घेतो की नुस्ता बाईट घेऊन ठेवता आहात की मला लाइव्ह जायचंय? तो शक्यतो लाइव्ह टेलिकास्ट असेल तरच बाईट देतो. असे का, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘लाइव्ह असेल तर नक्की दाखवतात ना! नुसता बाईट घेऊन ठेवला तर नंतर एडिटिंगमध्ये तो कापला जायचे भय असते.’ लाइव्ह टेलिकास्टमध्ये आपण दिसावे हे खूप लोकांचे स्वप्न आहे. चकमक वा एन्काऊंटर वगरे असेल तर पोलिसांनी अशा हौशी बाईट देणाऱ्यांकरिता खुच्र्या टाकून दिल्या पाहिजेत. म्हणजे ते व्यवस्थित चकमक बघू शकतील आणि वाहिन्यांना चांगला बाईट देऊ शकतील. जागतिकीकरणात या वाहिन्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. आपल्या एखाद्या स्थानिक आदिवासीला स्वत:च्या खपाटीला गेलेल्या पोटाकडे पाहून हताशा यायला लागली आणि त्याने इथिओपियातल्या लोकांची खपाटीला गेलेली पोटे बातम्यांमध्ये पाहिली की त्याची हताशा कमी होते. गांजलेल्या लोकांना सतत असे वाटत असते, की आपल्यावरच अन्याय होतोय. त्यामुळे त्यांना एकटेपणा वाटतो आणि ते बंडाचा विचारही या एकटेपणातून करू शकतात. पण या वाहिन्यांमुळे जेव्हा त्यांना कळते, की आपण एकटे नाही. गांजलेले लोक जगभर आहेत. आपल्यासारखेच उगाचच त्यांनाही तुडवलं जातंय. तेव्हा मग आपल्या ढुंगणावर बसणाऱ्या लाथांचा त्रास त्याला जाणवत नाही. खूप सारे ग्राफिक्स वापरून, चकाचक नकाशे दाखवत, भरपूर साऱ्या संगीतात जेव्हा वाहिनीवरचा अँकर त्याला इथिओपियातल्या खपाटीला गेलेल्या पोटाची आणि तुडवल्या जाणाऱ्या ढुंगणाची बातमी सांगतो तेव्हा तोही संधी मिळाल्यावर आपल्या ढुंगणावरच्या वळाचे वर्णन करणारा बाईट कसा द्यायचा, याची तयारी करायला लागतो.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 1:25 am

Web Title: author mandar bharde marathi article on 24 hour television news channels
Next Stories
1 हीन अभिरुचीचा विजय असो!
2 कवितेचे परमिट
3 तुसडय़ांचे आख्यान
Just Now!
X