20 January 2020

News Flash

दु:खी माणसाचा सदरा

अगदी हताश माणूस असेल तर मला त्याची खूप मजा वाटते.

सध्याच्या जमान्यात एखादा खचलेला, दु:खाने पिचलेला, अगदी हताश माणूस असेल तर मला त्याची खूप मजा वाटते. सध्याच्या काळातही एखाद्याला हताश किंवा दु:खी राहणे कसे काय परवडते, हा तर मला कायमच पडत आलेला प्रश्न आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जोंग उनसारखी माणसे आपल्या आजूबाजूला असताना दु:खी होणे फार कठीण आहे. मला तर गेली काही वर्षे थोडे जरी हताश व्हायला झाले की मी किम जोंगचा चेहरा डोळ्यांसमोर आणतो आणि मग मला मस्त फ्रेश वाटते. मागच्या आठवडय़ात तर मला अजिबातच दु:खी व्हायला वेळ नव्हता. सहज वेळ जात नव्हता म्हणून किम जोंगने अणुचाचण्या केल्या. बरं, साधा नियम आहे, की फटाके फोडायचे असतील तर ज्याने त्याने आपल्या दारात फोडावेत. किम जोंगला ते मान्य नाही. त्याने मागच्या आठवडय़ात जेव्हा जपानचे पंतप्रधान भारतात आले होते तेव्हा सहज गंमत म्हणून जपानच्या डोक्यावरून अण्वस्त्र उडवले आणि पलीकडे समुद्रात नेऊन डागले. युनायटेड नेशन्सने त्याला इशारा दिला तर त्याने ‘कोण युनायटेड नेशन्स?’ असा प्रतिसवाल केला. आमच्याकडे अमेरिकेपेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत आणि आम्ही अजिबात त्यांना घाबरत नाही, असे बिनधास्त विधान केले. आणि आता आरपारच्या लढाईला सज्ज व्हा, असा आदेशही त्याने आपल्या सैन्याला दिलाय. ज्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत ते लोकलज्जा म्हणून कायमच असे सांगतात, की आम्ही आधी अण्वस्त्रांचा उपयोग करणार नाही, आमची अण्वस्त्रे ही संशोधनासाठी किंवा विकासासाठी आहेत. त्यांचा उपयोग हा आम्ही फक्त स्वसंरक्षणासाठीच करू. किम जोंग हा असे उगाच ताकाला जाऊन भांडे लपवत नाही. आपल्यालाच अण्वस्त्रांचा पहिला उपयोग करायचाय, त्याला सिद्ध राहा, असा त्याने सैन्याला आदेश दिलाय. माझं थोडं जुन्या पिढीतल्या कम्युनिस्टांसारखं आहे. कोणीही अमेरिकेला नडला तर आपला संबंध असो-नसो, मला आपलं थोडं बरं वाटतं. मी त्या आनंदात माझ्या कॉम्प्युटरचा स्क्रीन-सेव्हर किम जोंगचा फोटो ठेवलाय. आता इतके सारे आजूबाजूला घडत असताना लोकांना दु:खी व्हायला किंवा झुरत बसायला वेळ तरी कसा मिळतो, हे मला कधीही न उलगडलेले कोडे आहे.

मानवी दु:खाचे मूळ काय, याचा शोध घेण्याचा खूप मोठमोठय़ा लोकांनी प्रयत्न केला आणि त्याबद्दल त्यांनी लिहूनही ठेवले आहे. त्यामुळे मीही जर माझे दु:खाबद्दलचे चिंतन लिहून ठेवले तर कोणाची तक्रार असायचे काही कारण नाही. जगाचे एकूण संख्याशास्त्रीय आणि भौगोलिक आकलन कमी असणे हे मानवी दु:खाचे मूळ आहे असे माझे स्पष्ट मत आहे. तुम्ही कोणत्याही दु:खी माणसाला विचारा.. त्याला कायमच हा प्रश्न पडलेला असतो, की माझ्याच वाटय़ाला कायम दु:ख का येते? हे सगळे माझ्याच बाबतीत का घडते? नियतीने हे सगळे माझ्याच वाटय़ाला का घातले? इतका उद्धट प्रश्न एखाद्याला कसा काय पडू शकतो? म्हणे हे सगळे माझ्याच वाटय़ाला का येते! ही इतकी मोठी जगाची लोकसंख्या! दोन-चार हजार लोक तर रोज बेवारस गायब होतात. त्यांचा थांगपत्ता लागत नाही. चार-चार वेळा जनगणना केली तर आपली माणसं मोजता येत नाहीत. नियती जर असेल तर आपण जगात माणसं तरी किती जन्माला घातली, याचे हिशोब लावता लावता तीच कन्फ्युज होत असेल. त्यात पुन्हा वृक्षवल्ली, पक्षी, प्राणी, कीटक, हवा, पाणी, पाऊस.. झालंच तर पाप-पुण्याचे हिशेब.. या सगळ्या भानगडी सांभाळत असताना नियतीच इतकी गांजली असेल तर एखाद्याला टिपून काढून त्याच्या नशिबाचे फेरे लिहीत बसायला तिला कुठे सवड असेल? या सगळ्या गदारोळात, नियती हे सगळे माझ्याच वाटय़ाला का आणते, असले विचार जर आपल्या मनात येत असतील, आणि हा विचार करून खचून जाताना जर आपल्याला आपला फाटका बनियन आठवत नसेल तर त्याला कोण काय करणार? मागच्या सहा महिन्यांत आपल्या बनियनला भोकं पडली, तो नवीन आणायला पाहिजे, हे तुझ्या लक्षात राहत नाही. आणि तुझ्या नियतीच्या मनात तुला जन्माला घातले आहे हे लक्षात असेल, हा आत्मविश्वास येतो तरी कुठून एखाद्याच्या मनात, याचंच मला मोठं कोडं आहे. नियती हे माझ्याच बाबतीत का करते, हा प्रश्न विचारून एखादा कुंथायला लागला की मला त्याला सांगावंसं वाटतं की, फाटक्या बनियनवाल्या मित्रा, तुला जन्माला घालून नियतीही विसरून गेली. तू इतका फुटकळ आहेस की रोज जातो-येतो तरी तुला सोसायटीचा वॉचमन लक्षात ठेवत नाही, तिथे नियती तुला लक्षात ठेवून तुझ्या आयुष्यात चबढब करीत असेल हा कॉन्फिडन्स कसा काय आला तुला? तू सकाळी सकाळी उठला आणि आपली खुरटी दाढी आरशात पाहत बसला होतास तेव्हा तुला हे नाही आठवले, की नुसत्या महाराष्ट्रात रोज चार-पाचशे लोक हे रात्री झोपले की सकाळी उठतच नाहीत. त्यांच्यातले अनेक तर इतके मौल्यवान होते, की ते जगले असते तर जगाच्या काहीतरी कामाला तरी आले असते. ते रात्रीतून गेले. आणि आपला जगाला काहीही उपयोग नसताना आपण खुरटय़ा दाढीतले पांढरे केस आरशात न्याहाळायला अजून जिवंत आहोत, याने एखाद्याने किती खूश व्हायला हवं! तर तोच सकाळी सकाळी चहा पिताना रड काढतो, की हे सारे माझ्याच बाबतीत का होतं म्हणून! संख्याशास्त्रीय आकलन कमी असणे हे दु:खाचे मूळ आहे, हे जे मी म्हणतो ते त्यामुळेच. जग किती मोठे आहे.. आपण किती फुटकळ आहोत, याचे एकदा आकलन झाले की माणसाचे दु:ख कमी व्हायला मदत होईल असे आपले मला वाटते. दु:खी माणसाचा करमणुकीपलीकडे काही दुसरा उपयोग असेल असे मला तरी वाटत नाही. टिचून टिच्चून दु:खी माणसे शोधावीत आणि मस्त दिवसभर त्यांची चेष्टा करत बसावं असं मला कायमच वाटतं. कधीतरी प्रयोग करून बघा. तुम्हाला दु:ख सांगायला आलेला एखादा मस्त दु:खी पकडा. तो आपलं दु:ख सांगायला लागला की त्याला दुसरा कोणीतरी त्याच्यापेक्षा किती जास्त दु:खी आहे याच्या कहाण्या सांगायला सुरुवात करा.. नाही तो तुमच्यावर चिडला, तर नाव बदलून टाकीन. दु:खी माणसाला तो खूप युनिक आहे असं कायमच वाटत असतं. आपण मुळातच सहृदयी असल्याने आपण दु:खी माणसांच्या दु:खभऱ्या कहाण्या ऐकत बसतो आणि त्यांच्याप्रति सहवेदना दाखवतो. इथंच सारं चुकतं. त्याने त्याच्याकडे पैसे नाहीयेत असं सांगितलं की आपण त्याला देशावर पण किती मोठे कर्ज आहे याच्या कहाण्या सांगायच्या. तो स्वत:च्या शुगरची तक्रार करायला लागला की आपण त्याला पिवळा ताप ही आफ्रिकेची कशी मोठी समस्या आहे याबद्दल सांगायला सुरुवात करायची. काय वाट्टेल ते झाले तरी तो त्याचे दु:ख कसे मोठे आणि महत्त्वाचे आहे, हे पटवून द्यायचा प्रयत्न करेल. तुम्ही त्याला त्याचे दु:खही किती फुटकळ आहे आणि जगात तसली दु:खं असणारे कसे भरपूर लोक आहेत, हे पटवून द्यायचा प्रयत्न करीत राहा. एकतर तो दु:खी राहण्याचा नाद सोडून देईल, किंवा इथून पुढे तो रडायला तुमचा खांदा तरी वापरणार नाही. मुलगी प्रेमाला नाही म्हटली म्हणून तोंड पाडून फिरणाऱ्या एकाला मी ऐकवले होते, की सरासरी ६५% वेळेला मुली नाहीच म्हणतात. तुला फार प्रयत्न करायला लागतील. पण शहरात खूप मुली आहेत, तुला आळस करायचाय म्हणून तू एकीसाठी कुढत बसलाय आणि दु:खी झाला आहेस. हिंमत असेल तर गावातल्या इतर मुलींना प्रपोज कर. ते नसेल जमत, तर दुसऱ्या राज्यातल्या.. अगदी दुसऱ्या देशातल्याही मुलींना प्रपोज कर. उगा खुळ्यासारखा एका मुलीसाठी झुरत बसणार असशील तर असल्या सुमार महत्त्वाकांक्षेच्या मुलाला द्यायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. स्वयंवराला सगळे राजकुमार आले होते. रामाने शिवधनुष्य पेलले आणि म्हणून सीतेने त्याला वरले. पण म्हणून इतर राजकुमार काय आयुष्यभर बिनलग्नाचे राहिले? त्यांनी आपल्यासाठी दुसऱ्या मुली शोधल्याच ना! मग त्यात रडण्यासारखं काय आहे? तो गबरू पुढच्याच आठवडय़ात एका मुलीला बाईकवरून घेऊन निघालेला मला दिसला. ग्लोबलायझेशननंतर तर लोकांना दु:खी असण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला तुमच्या देशात नोकरी मिळत नसेल तर दुसऱ्या देशात सापडते. तुमच्या गावात तुमच्या वस्तू विकल्या जात नसतील तर दुसऱ्या देशात जाऊन विकता येतात. आणि आपल्या गावातले मित्र कंटाळवाणे असतील तर ग्लोबल गावात मित्र सापडतात. हे सगळे सहजच शक्य आहे. जग किती मोठे आहे, त्या मोठेपणात कशा भरपूर शक्यता दडलेल्या आहेत, हे एकदा जाणवायला लागले की हताश व्हायलाच होत नाही. एकदा जगाचा आवाका जाणवायला लागला की मग आपल्या दु:खाचा आकार तितका मोठा वाटत नाही. ग्लोबलायझेशनचा विचार करायला लागलो की लक्षात येतं की आपण नेहमीच व्यापाराचं जागतिकीकरण- म्हणजे ग्लोबलाझेशन समजतो. व्यापार हा त्यातला एक भाग आहे; एकमेव नाही. आपल्या मित्र बनवण्याच्या शक्यता ग्लोबल झाल्यात. आपल्या करमणुकीच्या शक्यता ग्लोबल झाल्यात. प्रश्नांची उत्तरे मिळवायच्या शक्यता ग्लोबल झाल्यात. चव, रंग, गंध, सूर या सगळ्याच्या उपभोगाला जागतिक पर्याय उपलब्ध झालेत. या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करत, त्यांचा आस्वाद घेत मस्त झुलत झुलत आयुष्य जगायचे ठरवले तरी आयुष्य पुरणार नाही, इतका छान आयुष्याचा पट मांडला गेला आहे. या सगळ्यात दु:खी होऊन कुढत बसायची चैन एखाद्याला कशी परवडत असेल?

आजच्या रविवारी आपण आपल्या वाटय़ाला आलेल्या दु:खी माणसांची यादी बनवू या, त्यांचा टिपून टिपून उपहास करू या, उपभोग घ्यायच्या किती गोष्टी जगात आहेत आणि त्यासाठी उरलेले आयुष्य कसे अपुरे आहे, आणि त्यामुळे झुरत बसायला त्याच्याकडे कसा एकही तास उपलब्ध नाहीये याची त्याला जाणीव करून देऊ या. आणि या यादीत जर आपलंही नाव आलं असेल तर किम जोंगचे स्क्रीनसेव्हर ठेवण्यापासून आपल्याला कोणी रोखलं आहे? दु:खी माणसाचा सदरा फेकून द्यायला आत्ताच्या वेळेपेक्षा चांगली वेळ कोणती असणार आहे?

मंदार भारदे

mandarbharde@gmail.com

 

First Published on September 24, 2017 1:22 am

Web Title: comedy articles in marathi on kim jong un
Next Stories
1 फोन टॅपिंग
2 नेत्यांनी गरीबांच्या प्रश्नांत पडू नये!
3 जय हो!
Just Now!
X