12 November 2019

News Flash

परमेश्वर आणि पोलीस 

मी चारित्र्याचे सर्टिफिकेट घ्यायला पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि माझा नंबर यायची वाट बघत बसलो होतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

परमेश्वर आणि पोलीस या दोघांमध्ये विलक्षण साम्य आहे असे मला नेहमीच वाटते. संबंध असो अथवा नसो, आपले प्रश्न सोडवायला लोक त्यांच्याकडे जातात. आणि जगातल्या कोणत्याच प्रश्नाबद्दल ‘याच्याशी आमचा संबंध नाही,’ असे या दोन्ही प्रोफेशनमधल्या लोकांना कधीच सांगता येणे शक्य होत नाही. परमेश्वर आणि पोलीस यांची नेमकी कामे तरी कोणती, याची यादी बनवायचे कष्ट आजवर कोणीही घेतलेले नाहीत. त्यामुळे आकाशाच्या छपराखालील कोणतेही काम झाले नाही की तुम्ही परमेश्वर आणि पोलीस यांना बिनधास्त त्याबद्दल जबाबदार धरू शकता. परमेश्वर हे काही कोटींमध्ये आहेत, पण त्यांनी कधी युनियन बनवलेली नाही. तसेच पोलिसांना युनियन बनवायची परवानगी नाही. त्यामुळे या दोघांचे प्रश्न काय आहेत याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. मी पोलिसांना अशी अनेक कामे करताना पाहिले आहे- ज्या कामांशी त्यांचा काय संबंध, असे मला नेहमीच वाटत आलेले आहे.

काही दिवसांपूर्वी मी मंत्रालयात निघालो होतो आणि वाटेत पेपर वाचत होतो. सौदी अरेबियाहून सिंगापूरला निघालेल्या विमानाने इमर्जन्सी लँडिंग केल्याची बातमी त्यात होती. नवरा विमानात झोपलेला असताना बायकोने गुपचूप त्याचा अंगठा वापरून त्याचा मोबाइल उघडला आणि त्यात काय आहे ते उत्सुकतेपोटी पाहिले. अर्थातच बायकोला कळू नये म्हणून कडेकोट कुलूप लावून ठेवायची सारीच कारणे मोबाइल उघडल्यावर तिला सापडली आणि त्यावरून पंचेचाळीस हजार फुटांवर तिने भांडण सुरू केले. आपल्या बायकोने आपल्या मोबाइल फोनचे लॉक का काढले, याने नवराही संतापला आणि त्यानेही बायकोला शिव्या द्यायला सुरुवात केली. विमानातील हवाई सुंदऱ्या आणि प्रवाशांनी खूप प्रयत्न करूनदेखील दोघांचे भांडण इतके विकोपाला गेले की पायलटला विमान उतरवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. त्यामुळे जवळच्या विमानतळावर त्याने विमान उतरवले आणि त्या नवरा-बायकोला पोलिसांच्या ताब्यात देऊन विमान निघून गेले. अचानक आकाशातून कुठून तरी पोलिसांवर काम येऊन पडते ते असे! आता सौदी अरेबियाच्या त्या बदफैली नवऱ्याचे गुपित त्याच्या बायकोला समजले म्हणून दोघांनी आकाशात भांडण सुरू केले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका आहे असे पायलटला वाटले म्हणून त्याने विमान उतरवले. आता या सगळ्याशी पोलिसांचा काय संबंध? पण या भानगडी निस्तरायला पुढचे कितीतरी दिवस पोलिसांना लागले.

पुढे निघालो तर पाहिले- मोठा बंदोबस्त लावला होता आणि खूप सारे पोलीस रस्ता अडवून उभे होते. बेल्जियमचा राजा फिलिप आणि राणी मॅथिलडे मुंबईतल्या लोकांच्या समस्या समजावून घेत फिरत होते म्हणून हा बंदोबस्त लावला गेला होता. बंदोबस्तावरच्या शिपायांबद्दल माझ्या मनात अपार करुणा दाटून आली. बेल्जियमचा राजा फिलिप आणि राणी मॅथिलडेशी डय़ुटीवरच्या म्हात्रेचा काय संबंध? गाडीच्या काचा बंद करून आपल्या राणीशी गप्पा मारीत बेल्जियमचा राजा निघून जाणार.. आणि लोकांच्या गाडय़ा का अडवल्या म्हणून करवादलेला एखादा मुंबईकर डय़ुटीवरच्या एखाद्या म्हात्रेच्या नावाने बोटे मोडणार!

तिथून पुढे मंत्रालयात गेलो आणि दहा मिनिटांनी खाली चौकात येऊन पाहतो तो तिथे हीऽऽऽ गर्दी जमलेली. आणि पोलीस हवालदार म्हात्रे परत तिथे हजर! कृषी विभागाने अन्याय केल्यामुळे चिडून जाऊन एक सुज्ञ नागरिक मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारायची धमकी देत होता आणि म्हात्रे त्याला समजावून सांगत होते. ‘मला मुख्यमंत्र्यांना किंवा कृषिमंत्र्यांना भेटायचंय, त्यांना ताबडतोब माझ्याशी चर्चेला बोलवा,’ म्हणून तो सुज्ञ नागरिक खिडकीच्या बाहेर छतावर अडूनच बसला होता. मीडियावाले ही घटना लाइव्ह दाखवताहेत, मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री तर शहरातदेखील नाहीत, सुज्ञ नागरिक जीव द्यायची धमकी देतोय आणि पोलीस हवालदार म्हात्रे बिचारे सुज्ञ नागरिकाने उडी मारू नये म्हणून या नागरिकाला गयावया करताहेत. बेल्जियमचा राजा फिलिप ते मंत्रालयातून उडी मारायला निघालेला सुज्ञ नागरिक व्हाया बदफैली नवऱ्याला शिव्या देऊन विमान उतरवायला भाग पाडणारी सौदी अरेबियाची कजाग बाई.. या पोलिसांनी हाताळलेल्या प्रकरणांची रेंज जरी पाहिली तरी थक्क व्हायला होते. ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास पोलीस आहे’ असेच मला नेहमी वाटत आले आहे.

मी चारित्र्याचे सर्टिफिकेट घ्यायला पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि माझा नंबर यायची वाट बघत बसलो होतो. आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार-पाच लाख तरी नागरिक राहतात. या सगळ्यांच्या चारित्र्याची नोंद पोलिसांकडे असणे अपेक्षित आहे, हेही मजेचेच आहे. एक वयस्कर बाई एका तरुण पोलीस अधिकाऱ्यासमोर बसल्या होत्या. त्यांचा मुलगा परदेशात काही महिने नोकरीनिमित्त गेला म्हणून त्या, त्यांची सून आणि छोटा नातू असे तिघे जण राहत होते. ‘माझी सून मुद्दाम मला आवडत नाही तरी विशिष्ट पद्धतीने वरण करते. मला राग यावा म्हणून ती तसे मुद्दाम करते. आणि तसे करायला तिच्या आईची सुनेला फूस आहे..’ असे काकूंचे आरोप होते. आणि किमान एक दिवस तरी पोलिसांनी सुनेला जेलमध्ये टाकावे- म्हणजे तिला आणि तिच्या आईला चांगली अद्दल घडेल, असा तक्रार अर्ज घेऊन त्या तरुण पोलीस अधिकाऱ्यासमोर बसल्या होत्या आणि तो बिचारा हताशपणे ‘अहो, सासूला आवडत नाही तसे वरण केले म्हणून सुनेला तुरुंगात टाकायची कोणतीही प्रोव्हिजन कायद्यात नाही,’ हे त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करीत होता. पण काकू ऐकायलाच तयार नव्हत्या. शेवटी ‘तुम्ही तिला फोन तरी करा. त्यानेही ती वठणीवर येईल..’ म्हणून काकू अडूनच बसल्या आणि बिचाऱ्या त्या अधिकाऱ्याला मोबाइलवर सुनेला फोन लावून दिला. त्या अधिकाऱ्यानेही मग ‘एक दिवस तुमच्या आवडीचे वरण करा, एक दिवस सासूच्या आवडीचे करा,’ असा काहीतरी तोडगा सांगितला तेव्हा कुठे काकूंनी त्या अधिकाऱ्याचा पिच्छा सोडला. नवरा, बायको, सासू, सून आणि शेजारी यांच्या भांडणांपासून तर पोलिसांनी स्वत:ची सुटकाच करून घ्यायला हवी. शासनाकडे बरेच विभाग असे आहेत- ज्यांना करायला पुरेसे काम नाही, त्यांच्याकडे या सगळ्या कौटुंबिक भानगडी वर्ग कराव्यात असे मला नेहमीच वाटत आले आहे.

नागरिकांची नस्ती उत्सुकता हाही पोलिसांच्या डोक्याला ताप देणारा एक मोठ्ठा घटक आहे असे मला वाटते. एखादा गुन्हा घडल्यावर त्या ठिकाणी येणाऱ्या बघ्यांच्या गर्दीचे काय करायचे यावरदेखील काहीतरी तोडगा काढायला हवा. कुठेतरी बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली की बॉम्ब कसा फुटतो हे बघायला लोक हीऽऽ गर्दी करतात! बॉम्बशोधक पथकाला बेवारस बॅगेजवळ जायला वाट मिळावी म्हणून शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला तेव्हा कुठे बॉम्बशोधक पथक तिथे पोहोचले. अमुक एका ठिकाणी बॉम्ब ठेवला गेला आहे हे कळल्यावर त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन तो बॉम्ब बघू इच्छिणारे नरपुंगव फक्त आपल्याच देशात असावेत. कसाब आणि ताजमध्ये शिरलेले अतिरेकी आणि पोलिसांचा गोळीबार पाहायला लांबून लांबून लोक आले होते असे म्हणतात. मुंबईत घुसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यापूर्वी आपल्याच लोकांच्या गर्दीला हटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागले होते. पोलीस गर्दीला हटवत होते, तर लोक ‘साहेब, थांबू द्या ना. फार लांबून माझ्या मुलांना अतिरेकी दाखवायला घेऊन आलोय! त्यांना परत कधी मिळणार अतिरेकी पाहायला?’ म्हणून हुज्जत घालत होते. जिथे गुन्हे घडताहेत किंवा हल्ले होत आहेत तिथली ‘मजा’ नीट बघता यावी म्हणून नागरिकांना खुर्च्या टाकून द्याव्यात आणि मगच पोलिसांनी चकमक सुरू करावी असे मनापासून वाटणारे आपल्याकडे खूप लोक आहेत. ‘गुन्हे पर्यटन’ असा नवीन विभागही त्याकरिता सुरू करता येऊ  शकतो. नामचीन गुंडांबरोबर ब्रेकफास्ट किंवा अंडा सेलमध्ये अतिरेक्याबरोबर एक रात्र अशी पॅकेजेस या पर्यटकांकरिता बनवता येतील. जे खूपच हौशी पर्यटक आहेत त्यांना टायरमध्ये घालून बडवायलाही हरकत नाही. नाही तरी टायरमध्ये घालून बडवायची कला हल्ली लुप्त होत चाललीय की काय अशी मला भीती वाटते.

रात्री खूप उशिरा तुम्ही घरी जात असाल तर पोलीस गाडी अडवतात आणि काच खाली करून तुमच्या चेहऱ्याजवळ तोंड आणतात आणि तुम्हाला नाव विचारतात. नाव सांगताना तुमच्या तोंडाला दारूचा वास येत नाहीए ना, हे ते तपासतात. समोरचा दारू प्यायला आहे की नाही, हे तपासणारी यंत्रे उपलब्ध आहेत. पोलिसांकडेही ती आहेत. पण त्या यंत्रांना लागणारी कोणते तरी केमिकल कधीच पुरेशा प्रमाणात पोलिसांकडे नसते. केमिकल नाही, त्यामुळे मी दारू प्यायलेले ड्रायव्हर शोधणार नाही, असे म्हणायची पोलिसांना कोणतीच सोय नाही. त्यामुळे ड्रायव्हरच्या तोंडाजवळ जाऊन बिचारे पोलीस त्याच्या तोंडाचा वास घेतात. हा पोलिसांच्या मानवी अधिकारांचा भंग आहे असे मला वाटते. जगातल्या कोणत्याही प्रगत देशाने कधीच नुसत्या नाकाने समोरच्याच्या तोंडाचा वास घ्यायची वेळ आपल्या पोलिसांवर आणली नसती. आपण खुलेआम तशी वेळ आपल्या पोलिसांवर आणली आहे.

जगात सर्वत्र जे जे उत्तम आहे ते पोलिसांना दिले जाते. मग ती शस्त्रे असोत किंवा गाडय़ा. गावातल्या कोणाहीपेक्षा वेगवान गाडय़ा पोलिसांना दिल्या जातात. आणि ते लॉजिकलच आहे. काही देशांत तर फेरारी गाडय़ा पोलिसांना दिल्या गेल्या आहेत. आणि त्या देशातले सर्वोत्तम वेतन पोलिसांना दिले जाते. गुन्ह्यच्या तपासापासून ते बंदोबस्तापर्यंत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून ते सासू-सुनेच्या भांडणांपर्यंत आपल्याला सर्वत्र पोलिसांनी मदत करायला हवीये, पण त्यासाठीची किंमत मोजायची आपली तयारी नाही. पोलिसांना फक्त तीन दिवस स्वत:च्या मनासारखे काम करायला दिले तर एका फटक्यात ते सगळ्या गुन्हेगारांना कोठडीत टाकतील आणि शहर गुन्हेमुक्त करतील यावर सगळ्यांचाच विश्वास आहे. पण हा विश्वास ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाला, त्या पोलिसांबद्दल विचार करायची समाज म्हणून आपल्याला गरज वाटत नाही. शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली व्हायला भावूक होऊन सगळेच जातात. पण नंतर त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांच्या माघारी काय झाले, याची माहिती ठेवायची मात्र समाजाला गरज वाटत नाही. या देशात वाटेल त्या विषयांवर लोकांनी मोर्चे काढलेत. परदेशी नागरिकांसाठी या देशात मोर्चे निघालेत. भटक्या जनावरांसाठीच्या कळवळ्याने मोर्चे निघालेत. पण ‘पोलिसांना अधिक सोयीसुविधा द्या, त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे याची व्यवस्था करा..’ या मागण्यांसाठी नागरिकांचा मोर्चा निघाल्याचे मी तरी आजवर कधी पाहिलेले नाही. अर्थात हे आपल्या समाज म्हणून असलेल्या दांभिकतेला साजेसेच आहे. पोलिसांच्या त्यागाबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या कामाच्या चित्रविचित्र वेळांबद्दल, त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर आणि कुटुंबीयांवर होणाऱ्या परिणामांबद्दल तुम्ही बोलायला सुरुवात करा- की लागलीच समाजातले भले भले लोक ‘ते कर्तव्यच आहे त्यांचे. त्यांना पगार मिळतो त्याबद्दल..’ वगैरे युक्तिवाद सुरू करतात. आम्हाला पोलिसांसाठी काही करायचे नाही. त्यांच्या अडचणींबद्दल आम्हाला संवेदनशीलदेखील असण्यात स्वारस्य नाही. अर्थात शहीद पोलिसांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लावायला आम्ही नक्की जाऊ . त्यात ग्लॅमर आहे. पण डय़ुटीवरच्या पोलिसाबद्दल कृतज्ञ असण्यात थोडेच ग्लॅमर आहे?

मंदार भारदे mandarbharde@gmail.com 

First Published on December 10, 2017 2:44 am

Web Title: extraordinary equality in god and cops