11 July 2020

News Flash

पुरुषांची फॅशन

पुरुष अजागळ का दिसतात, या प्रश्नाच्या चिंतनात मी बराच वेळ खर्च केला आहे.

भारतीय पुरुष आणि त्यांच्या फॅशन या चकाचक वातावरणाला लाज आणतात असे माझे मत आहे.

ग्लोबलायझेशनच्या गाडीतून भारतीय पुरुषांना उतरवून दिले पाहिजे, हे माझे स्पष्ट मत आहे. सगळे जग कसे चकाचक होते आहे. प्रत्येक जण आपण कसे नीटनेटके, व्यवस्थित दिसावे याची काळजी घेतो आहे. माणसे तर सोडाच; हल्ली झाडांनाही नीटनेटके ठेवायची फॅशन आहे! घराबाहेर, रस्त्यावर झाडे लावून अगदी त्याचे प्रत्येक पान, प्रत्येक फांदी नीटनेटकी राहावी म्हणून मेहनत घेतली जाते. कुत्र्यांनाही हल्ली पार्लरमध्ये नेतात. पूर्वी कुत्री किती असभ्य वागायची! आता मात्र ती सुधारली आहेत. उगाच खाजवत बसलेली पाळीव कुत्री तर तुम्हाला आढळणारच नाहीत. भटकी कुत्रीही आता सायकलवाले किंवा किटल्या लावून जाणाऱ्यांच्याच मागे धावतात, एखादा थ्री-पीसमध्ये किंवा गेलाबाजार टाय लावून कुठे निघाला असेल तर भटकी कुत्री त्यांना आदर देतात. भुंकत त्यांच्यामागे धावत नाहीत असा माझा अनुभव आहे.

जो-तो आपापल्या परीने चकाचक ग्लोबल होत असताना भारतीय पुरुष आणि त्यांच्या फॅशन या चकाचक वातावरणाला लाज आणतात असे माझे मत आहे. जे हाताला येईल ते कपडे घालायचे, हे पुरुषांचे स्टाईल स्टेटमेंट आहे. मधे एकदा मी एक प्रयोग केला. बसमध्ये काही पुरुषांच्या चेहऱ्यावर मी मागून जाऊन फडके टाकले आणि त्यांना प्रश्न विचारला, ‘तुम्ही आज कोणत्या रंगाचा शर्ट आणि कोणत्या रंगाची पॅन्ट घातली आहे ते सांगा..’ शंभरपैकी नव्वद जणांना सांगता आले नाही. एखाद्या बाईच्या चेहऱ्यावर फडके टाकले असते तर तिने आजचेच काय, अगदी मागच्या आठवडाभरात तिने आणि तिच्या मैत्रिणींनीही कोणत्या रंगांचे कपडे घातले होते, हे घडाघडा सांगितले असते. आपण कसे दिसायला हवे याबद्दल भारतीय पुरुषांचा कोणताही विचारच नसतो. फिकट निळा, पडेल पिवळा आणि पांढरा रंग वापरायचा नाही असा जर कायदा केला तर भारतीय पुरुष शब्दश: उघडय़ावर येतील. ‘या तीन रंगांपैकी एकाही रंगाचा शर्ट न वापरता बाहेर पड,’ असे सांगितले तर पुरुषांना गोधडी गुंडाळून बाहेर पडावे लागेल. स्वत:च्या दिसण्याबद्दल इतकी अनास्था असलेले पुरुष जगातल्या फार कमी देशांत आढळतात. आपणही चांगले दिसू शकतो यावरचा भारतीय पुरुषांचा विश्वासच डळमळीत झाला आहे की काय, असे वाटावे अशी परिस्थिती आहे.

कॉलेजची दोन-चार वर्षे सोडली तर भारतीय पुरुष बरे दिसण्यासाठी थोडेही प्रयत्न करत नाहीत, हा माझा अनुभव आहे. किंबहुना, एकदा लग्न झाले की त्यांची एकूणच ‘प्रेझेंटेबल’ असण्याची गरजच संपून जाते, हे मानायला वाव आहे. भारतीय पुरुष हे लग्नात- तेही स्वत:च्याच- एकदाच काय ते नीटनेटके दिसतात. नंतर रया गेलेल्या अवस्थेत उर्वरित आयुष्य जगतात. बायकांना संस्कृतीने बंधने घातली, समाजाने बंधने घातली, घरातल्यांनी बंधने घातली. त्यांनी कसे, कोणते आणि किती कपडे घालायचे, हे सगळेच दुसऱ्यांनी ठरवले. इतक्या सर्व बंधनांनंतरही त्या, त्या परिस्थितीत जो उत्तम कपडा असेल तो बायका घालतात. सगळ्या जगाची बंधने डोक्यावर वागवत फॅशनचा प्रवाह वाहता ठेवतात. त्यांच्या कपडय़ांच्या रंगांतले वैविध्य बघा. केसांची रचना बघा. जोडय़ांचे प्रकार बघा. दागिन्यांची व्हरायटी बघा. दिवसागणिक नवनवे फॅशनचे प्रकार उत्क्रांत होत आहेत. आणि जगण्याचा हा प्रवाह दिवसागणिक वेगाने पुढे चाललाय असे वाटत राहते. आणि तेच पुरुषांकडे पाहिले तर वाटते, गत लाखो वर्षांत आदिमानवाच्या नागडेपणापासून याचा जो प्रवास सुरू झाला तो आत्ताशी कुठे पिवळा-निळा शर्ट आणि काळी-निळी पॅन्टपर्यंत येऊन पोहोचलाय. आदिमानव जटाधारी होता; हा पचपचीत तेल लावायला शिकलाय- एव्हढाच काय तो फरक!

दाढी हा मानवजातीला शापच असावा असे एकूण वर्तन! मरेपर्यंत आपल्या दाढी आणि मिशांचे काय करायचे, याचा निर्णयच भारतीय पुरुषांचा होत नाही. अनेकदा तर संध्याकाळचा निर्णय सकाळी बदलतो. रात्री त्यांनी ठरवलेले असते, की आता रोज चकाचक दाढी केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. अन् सकाळी जरा थंडी वाजली की तो ठरवतो, आता कशाला इतक्या थंडीची दाढी करायची? आपण वाढवायलाच हवी दाढी! दाढी करायची की वाढवायची, या द्वंद्वात खुरटी दाढी वाढवून फिरणारी बहुसंख्य प्रजा त्यामुळेच आपल्याला दिसते. भारतीय पुरुषांच्या आयुष्यात दोन प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांना कधीही मिळत नाहीत : पहिला- आईचे ऐकायला हवे की बायकोचे? आणि दुसरा- आपण मिशी ठेवल्यावर चांगले दिसतो, की काढल्यावर? त्यामुळे पहिल्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने तो घरात वेंधळ्यासारखा वागतो, तर दुसऱ्यामुळे गावभर भांबावल्यासारखा फिरतो. एकदा आपण नीटनेटके दिसायला हवे यासाठीचा आग्रह निघून गेला, की मग काही तद्नुषंगिक गोष्टी येतातच. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या पुरुषाच्या बेल्टवरच्या भागावर शर्टाची बटणे उघडी पडलेली असतात आणि त्याला ते जराही खटकत नाही. आपण चांगले कधीच दिसू शकत नाही, हे एकदा मनाला समजावले असेल तर गुटखा खाल्ल्यामुळे माकडासारखे तपकिरी, लाल झालेले दात घेऊन बिनधास्त फिरायचीही शरम वाटेनाशी होते. मग एखादा यशस्वी माणूस जसे कपडे घालत असेल तसेच कपडे घालून फिरण्याचा सोपा पर्याय पुरुषांकडून निवडला जातो. पूर्वी नेहरू जाकीट घालायचे, नंतर सूट घालायचे. आणि आत्ताचे सगळे मोरू हे मोदी जाकीट घालायला लागले आहेत. परवा अचानक एक मित्र मोदी जाकीट घालून भेटला. एखाद्या हँगरवर जाकीट टांगावे आणि तो हँगर लांब लांब टांगा टाकत आला तर जसा दिसेल तसा तो दिसत होता. मोदी यशस्वी आहेत, त्यामुळे आता अनेक खुळ्यांना असे वाटते, की आपणही त्यांच्यासारखे जाकीट घातले की यशस्वी दिसू. अनेक राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, कुलगुरू, शास्त्रज्ञ  हे अचानकच मोदी जाकीट घालायला लागले आहेत. ते हेच लोक होते- जे पूर्वी नेहरू जाकीट किंवा सूट घालायचे. पुरुष हे फॅशनच्या बाबतीत इतके घाबरट आहेत, की ते स्वत:च्या दिसण्यातून काही वेगळे स्टेटमेंट देण्याचेही धाडस करायचा कंटाळा करतात. त्यामुळे जे यशस्वी असेल त्याच्यासारखे दिसण्याचा शॉर्टकट निवडण्याकडेच त्यांचा कल असतो. परिणामी पुरुषांच्या फॅशनचे ढोबळमानाने दोनच प्रकार आहेत : एक म्हणजे काही थोडे लोक- जे कोणत्या तरी यशस्वी माणसासारखे दिसायचा प्रयत्न करताहेत; आणि दुसरे- ज्यांना आपण कसे दिसायला हवे याबद्दल काहीही मत नाही. ‘मी पाच मिनिटांत दुकानातून तीन शर्ट, दोन पॅन्ट घेऊन बाहेर पडलो..’ हे मोठय़ा फुशारकीने सांगणारे पुरुष तुम्हाला गठ्ठय़ाने सापडतील. त्यांना ते मोठे बहादुरीचेच वाटत असेल. पण निवड करण्याचे ज्ञान नसेल आणि नवे काही विकत घ्यायचे आणि अंगावर घालायचे धाडस नसेल तर एकसारखेच जुनाट घ्यायला कितीसा वेळ लागणार? मी केस कापायला गेलो तिथे गर्दी होती, म्हणून मग पलीकडच्या गल्लीत गेलो आणि तिथल्या सलूनमधून केस कापून घेतले. केस कापायचे म्हणजे काय? तर शक्य तितके बारीक करून आणायचे. यापलीकडे हेअर स्टाईलचा विचार केला नसेल तर मग काय- कोणीही वस्तरा फिरवला तरी चालतो. नेहमीची पार्लरवाली नसेल तर मिळेल त्या पार्लरवालीकडे जाऊन येणाऱ्या बायका तुम्हाला जवळजवळ आढळणारच नाहीत.

पुरुष अजागळ का दिसतात, या प्रश्नाच्या चिंतनात मी बराच वेळ खर्च केला आहे. माझ्या असे लक्षात आलेय, की पुरुष ‘फॅशन’च्या बाबतीतले निर्णय घेण्याच्या बाबतीत डरपोक असतो. तुम्हाला नवनवे रंग वापरायचे असतील तर प्रत्येक नवा रंग वापरताना तुम्हाला एक धाडस करावे लागते. हा रंग आपण वापरला- आणि तो आपल्याला अजिबात चांगला दिसत नसेल, तरी आपला आत्मविश्वास जराही डळमळीत न होता तो रंग अंगावर वागवत वावरणे हे मोठे धैर्याचेच आहे. एकदा विविध रंग वापरायला लागलो की रंगवापराच्या भिंती तुटतात आणि कितीतरी रंगीबेरंगी पर्याय आयुष्यात उपलब्ध होतात. जे रंगांच्या बाबतीत आहे, तेच कपडय़ांचे पॅटर्न आणि केशरचनेच्या बाबतीतही. सुरुवातीचे धाडस, नव्या कल्पनांना खुलेपणाने सामोरे जाण्याची दिलेरी, चांगले दिसण्याचे किंवा किमान वेगळे दिसण्याचे प्रयत्न जगण्याचे कितीतरी नवे, लोभस पर्याय खुले करतात. नवनवीन फॅशनचा आग्रह आणि वेगळे दिसण्याचे धाडस जसजसे माणूस करायला लागतो, तसतसा तो नवा होत जातो. नुसते कपडे किंवा हेअर स्टाईल बदलत नसते, त्याबरोबरच आतला माणूसही बदलत असतो. जुनाट, खरकटे विचार, कालबाह्य़ परंपरा आणि रूढींची अडगळ सांभाळण्याच्या लायकीची आहे असे समजणारे आणि त्याच्यामागे लागलेले लोक स्वत:ही नव्या फॅशनचे काही घालत नाहीत आणि दुसऱ्याने फॅशनेबल दिसायलाही ते विरोध करतात, तो त्यामुळेच. आणि ते मुख्यत: पुरुषच असतात, हेही स्वाभाविकच.

शेवटी ‘फॅशन’ म्हणजे तरी काय? आपण कसे दिसायला पाहिजे याबद्दलचा आपण स्वत: घेतलेला निर्णय. आपण कसे दिसायला हवे याचा निर्णय घेण्याचे धाडस आले, की कसे असायला हवे, याचेही धाडस करता येते. मग कसा विचार करायला हवा, याचेही धाडस करता येते. जिथे कॉपी नाही, संपूर्ण नवीन आहे- ती म्हणजे फॅशन. मग ती दिसण्याची असो, असण्याची असो, किंवा विचार करण्याच्या पद्धतीची असो; ती फॅशन वेगळी आणि नवी असणारच! सगळे जग बदलते आहे. जगातल्या अनेक देशांनी आपली कवाडे खुली केली आहेत. भूतकाळाच्या बेडय़ा ज्याच्या पायात नाही आणि भविष्यकाळाची फिकीर नाही असा  ज्ञानाचा, कल्पनांचा खुला प्रवाह एकमेकांकडे वाहतो आहे. आणि या खुल्या, वाहणाऱ्या हमरस्त्यावर वळू बनून काही जुनाट लोक देशोदेशी बसलेत.

पन्नास वर्षांनी जेव्हा आपण तेव्हाच्या रंगीबेरंगी कपडे घालणाऱ्या, टवटवीत, ताजा विचार करणाऱ्या मुलांबरोबर बोलत असू, आणि जेव्हा आपण त्यांना सांगू, की नव्या, वाहत्या विचारांच्या रस्त्यात वळू बनून बसण्याचा जेव्हा माझ्या आयुष्याने मला पर्याय दिला होता तेव्हा तो मी नाकारला होता.

कसले फॅशनेबल दिसू तेव्हा आपण!

मंदार  भारदे mandarbharde@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2017 3:33 am

Web Title: indian men and their fashion
Next Stories
1 बायकोचे आडनाव
2 विवेकवाद्यांसमोरचे संभ्रमित प्रश्न
3 सांगे वडिलांची कीर्ती!
Just Now!
X