20 November 2019

News Flash

दुवा मैं याद रखूंगा!

‘बघ्याची भूमिका’ वाचायची आवड हा आता एकमेकांना बांधून ठेवणारा एकमेव समान धागा आहे.

ब्रिफिंग करायला गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे आले होते. त्यांनी दार ठोठावले. मुख्यमंत्र्यांनी मान वर केली, त्यांच्या हातात ‘लोकसत्ता’ होता. म्हणाले, ‘‘मी जरा ‘बघ्याची भूमिका’ वाचतो आणि मग ब्रिफिंग घेतो. हेलिकॉप्टरच्या कलकलाटात नंतर धड वाचता येणार नाही आणि मग मला शांतपणे न वाचल्याची रुखरुख लागून राहील. तेव्हा प्लीज, थोडे थांबता का?’’ दोघेही अधिकारी ‘हो’ म्हणाले. ‘‘मुख्यमंत्र्यांकडे यायचे म्हणून आपण ‘बघ्याची भूमिका’ न वाचताच आलो. इथे येऊन थांबावे लागणार आहे हे माहीत असते तर आपणही वाचूनच नसतो का आलो?’’ असे ज्युनियर अधिकारी सीनियर अधिकाऱ्याच्या कानात कुजबुजला. सीनियर अधिकाऱ्याने सफाईदार पोक्तपणाने ज्याचा अर्थ ‘हो’ही नाही आणि ‘नाही’ही नाही अशी मान हलवली!

आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या खोलीचा दरवाजा ठोठावला.

‘‘बाबा, तुम्ही ‘बघ्याची भूमिका’ वाचताय का?’’

‘‘हो..’’ असे उत्तर आले.

‘‘अहो, तुम्ही सकाळपासून किती वेळा ‘बघ्याची भूमिका’ वाचणार आहात? मला पण वाचायचंय!’’

‘‘तू थांब जरा. नंतर पाठवतो मी तुझ्या खोलीत.’’

‘‘मी किती वेळा आपल्या पेपरवाल्याला सांगितलंय, की रविवारी ‘मातोश्री’वर दोन ‘लोकसत्ता’ टाकत जा. एक मला, एक बाबांना. पण दर वेळेला तो एक ‘लोकसत्ता’ आणि चार ‘सामना’ टाकतो. कधी कधी तर तो सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि संध्याकाळी दोनदा येऊन ‘मातोश्री’वर ‘सामना’ टाकून जातो. खूप वेळा ‘सामना’ टाकला म्हणजे शिवसैनिक म्हणून झडझडून काम केले असे समजले जाणार नाही, असे तुम्ही त्याला एकदाच काय ते सांगून का टाकत नाही?’’ असे म्हणून आदित्यने शेवटी आपल्या टॅबवर ‘बघ्याची भूमिका’ वाचायला घेतले.

‘बघ्याची भूमिका’ वाचायची आवड हा आता एकमेकांना बांधून ठेवणारा एकमेव समान धागा आहे, हे भाजप आणि शिवसेना या दोघांनीही मान्य केले आहे. आपल्या सरकारच्या काळात जर ‘बघ्याची भूमिका’ हे सदर असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना बांधून ठेवणारा तो समान धागा ठरला असता आणि आपल्याही साम्राज्यावरचा सूर्य कायम तळपत राहिला असता याबद्दल मोठीच खंत दोन्हीकडच्या नेत्यांना लागून राहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियनमध्ये ‘बघ्याची भूमिका’चा अनुवाद करून व्लादिमिर पुतिन यांना पाठवतात. ‘तुला ‘बघ्याची भूमिका’चा अनुवाद करून पाठवणे हा मला मोठाच ताप होऊन बसलाय,’ अशी तक्रार मोदींनी नुकतीच पुतिनकडे केली अशी माझी माहिती आहे. ‘तुला अमेरिकेच्या निवडणुकीत चबढब करायला माणसे मिळतात, पण ‘बघ्याची भूमिका’चा अनुवाद करायला माणूस मिळत नाही यावर विश्वास तरी कसा ठेवणार?’ असेही त्यांनी पुतिनना सुनावल्याची कळते.

मी ‘बघ्याची भूमिका’ लिहायला लागल्यानंतर जगभरातल्या महत्त्वाच्या लोकांच्या आयुष्यात हे सगळे बदल घडले अशी माझी माहिती आहे. आणि यातल्या एकानेही याचा अद्याप इन्कार केलेला नाही. तेव्हा ते सत्यच असणार यावर वाचकांनीही विश्वास ठेवायला हरकत नाही.

‘बघ्याची भूमिका’ या सदरातला आजचा हा शेवटचा लेख. शाहरुखने आपले चित्रपट चालायला काय करायला हवे? अर्थव्यवस्थेपुढच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला इतके सारे जण आहेत, पण व्यक्तिगत कडकीचा प्रश्न कोणी सोडवायचा? उत्तर कोरियाचा किम जोंग उन हा जगासमोरचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की किम जोंग उन हेच जगासमोरच्या प्रश्नांचे उत्तर आहे? वसंत व्याख्यानमालेत भाषणाला बोलावले तर किम जोंग काय बोलेल? आणि येताना तो पाठीवर दोन क्षेपणास्त्रे टाकूनच येईल का?  गोमूत्रापासून सिंगल माल्ट कशी बनवायची? शेतीतल्या बोंड अळीच्या समस्येवर बिटकॉइन हेच खरे उत्तर कसे आहे? ‘भुताला मिळेना बायको आणि हडळीला मिळेना नवरा’ हेच कोणत्याही राजकीय युतीचे मुख्य सूत्र कसे असते? अशा कितीतरी महत्त्वाच्या विषयांवर मला ‘बघ्याची भूमिका’ लिहायचे होते; जे आता राहून गेले आहे.

साप्ताहिक सदर लिहिणे ही मोठीच गमतीची गोष्ट आहे, हे मला या सदराच्या निमित्ताने लक्षात आले. मी गेली अनेक वर्षे ‘लोकसत्ता’ अथपासून इतिपर्यंत वाचतो. ‘लोकरंग’मधलेही प्रत्येक लेख वाचतो. ‘बघ्याची भूमिका’ सुरू झाल्यानंतर मात्र माझी गोची झाली. रविवारी कितीही वेळा ‘लोकरंग’ उचलला की मी पुन: पुन्हा ‘बघ्याची भूमिका’च वाचायचो! आपणच लिहिलेला लेख आपणच वाचत असताना ‘कसे काय बुवा आपल्याला इतके भारी सुचते?’ या विचारांनी अचंबित होणे आणि तो परत परत वाचणे ही मोठीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता पुन्हा एकदा सगळे जुने अंक काढून ‘लोकरंग’मधल्या माझ्या शेजाऱ्यांनीही काय लिहिले होते ते वाचावे म्हणतो! ‘बघ्याची भूमिका’ हे नाव मला कसे सुचले, हा प्रश्न मला अनेक जणांनी विचारला. संयुक्त राष्ट्र संघाबद्दल मी एकदा विचार करत बसलो होतो तेव्हा मला हे नाव सुचले, हे मला इथे नमूद करावेसे वाटते.

‘बघ्याची भूमिका’ लिहीत असताना काही गोष्टी मला नव्याने उलगडल्या. ‘प्रतिक्रिया कळव’ म्हणून आपला लेख कोणालाही पाठवायचा नसतो. आणि मित्रांना तर अजिबातच पाठवायचा नसतो. मी आपला भाबडय़ासारखा एका मित्राला ‘काही सुधारणा असेल तर कळव’ म्हणून लेख पाठवला. त्याने लगेच फोन केला, ‘मी आधीपासूनच या मताचा होतो, की ‘लोकसत्ता’ने तुझे लेख छापताच कामा नयेत. उगा मराठी बाराखडी येते म्हणून कोणी लेखक होत नसतो. तुला तर ऱ्हस्व-दीर्घदेखील धड कळत नाही, विचारांमध्ये स्पष्टता नाही; आणि निघाले सदर चालवायला!’’ असे म्हणून त्याने माझ्या लेखात सुधारणा करून पाठवल्या. सुधारणा करताना त्याने काही माफक बदल माझ्या लेखात केले होते. ज्यामध्ये त्याने लेखाचा विषय बदलला, आशय बदलला आणि माझा लेख ९०० शब्दांचा होता तो त्याने चार हजार शब्दांचा करून पाठवला. माझ्या दुसऱ्या एका मित्राने ‘‘आता अगदी सहन होत नाही. तुम्ही ताबडतोब ‘बघ्याची भूमिका’ छापणे बंद करून टाका..’ अशा पत्रांचा ‘लोकसत्ता’वर मारा होईल आणि लोकाग्रहास्तव तुझे सदर बंद करायला लागेल,’’ असे भविष्य वर्तवले होते. मी दर रविवारी ‘लोकरंग’ उघडून पाहायचो आणि या आठवडय़ात लोकाग्रहाने आपल्या लेखाचा बळी तर घेतला नाही ना, याची खात्री करून घ्यायचो.

खूप जण रविवारी लेख आवडला म्हणून मला फोन करायचे म्हणून मी रविवारी फोन बंद करून बसू लागलो. कोणी तुमचे कौतुक केले की तुम्हाला त्याचा विनम्रतेने स्वीकार करावा लागतो. खूप वेळ विनम्रतेने वागावे लागले की मला त्याचा थकवा येतो. विनम्रतेने वागायला लागले की मराठी माणूस चिडचिडा होतो, हे माझ्याही बाबतीत खरे आहेच. सदर लिहायला लागल्यावर आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. लेखकाला जे लोकांना खूप आवडेल याची खात्री असते ते त्यांना अजिबात आवडत नाही. आणि जे तुम्हाला फारसे महत्त्वाचे वाटलेले नसते, ते मात्र लोकांना काहीच्या काही आवडते. सदर लिहीत असताना हा सारा मोठाच मजेचा अनुभव होता. ‘लोकसत्ता’च्या पानांवर बसून किती लांबवरच्या वाचकांपर्यंत पोहोचता येते, ही तर अनुभवण्याचीच गोष्ट आहे.

जगभर फिरत असताना लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचा प्रयत्न करणे हा माझ्या आनंदाचा भाग असतो. जगातले अनेक देश आपल्यापेक्षाही गरीब आहेत, ज्यांच्या रोजच्या जगण्याच्या समस्या या आपल्यापेक्षाही जटिल आहेत, अशा देशांतले म्हातारेकोतारेही टवटवीत दिसतात. काय व्हायरस शिरलाय माहीत नाही; पण दिवसेंदिवस आपल्या देशातले तरुणही रया गेल्यासारखे दिसायला लागलेत. लहान मुलेही चिंताग्रस्त दिसतात. आपल्या आजूबाजूला आपण पाहतो, की म्हातारे झाल्यावर आपल्या वाटय़ाला सुखाचे आयुष्य येईल म्हणून लोक तरुणपणी आनंदाच्या ओढगस्तीत जगतात. आणि म्हातारपणी आजवर कधी आनंदात जगलो नाही, आता म्हातारपणात काय जगता येणार, म्हणून ते आनंदी होणे नाकारतात. तुमच्या देशातल्या म्हाताऱ्यांचे चेहरे हे तुमच्या देशात काय घडले होते आणि काय घडते आहे याचा जीडीपीपेक्षा जास्त महत्त्वाचा पॅरामीटर असतो. कृतार्थ वृद्ध चेहऱ्याइतके मादक दुसरे या जगात काहीही नाही. ओंजळीतून भुरभुर आयुष्यातले क्षण निसटून जात असताना प्रत्येक क्षण आनंदी बनण्याच्या प्रयत्नांत सार्थकी लावणे ही एकमेव प्रॉफिटेबल गोष्ट असते. पण आपण आनंदी होण्याचा फॉम्र्युलाच विसरत चाललो आहोत. आपल्या आजूबाजूला आनंदी होण्यासाठी कितीतरी निमित्ते आजही उपलब्ध आहेत. जगण्याचा महोत्सव चारी दिशांना अविरत सुरू आहे. आपण मात्र आनंदी होण्याच्या आळसापोटी त्याकडे दुर्लक्ष करत पुढे चाललो आहोत. चेहऱ्यावरचा आठय़ांचा गुंता सुटताना पाहणे हे मोठे सुंदर दृश्य असते. चेहऱ्यावरच्या आठय़ांचा गुंता हा फक्त हसायला आल्यावरच थोडासा सैल होतो. या सदराचा शेवट करत असताना आणि नव्या वर्षांच्या उंबरठय़ावर उभे असताना हसण्याची, आनंदी होण्याची आपल्या आजूबाजूलाच उपलब्ध असणारी कारणे आपल्याला सापडोत आणि कपाळावरच्या आठय़ा सुटतानाची मंजुळ किणकिण सतत आपल्या वाटय़ाला येवो, या नवीन वर्षांच्या शुभेच्छा!

दुवा में याद रखूंगा!

mandarbharde@gmail.com

(समाप्त)

First Published on December 31, 2017 12:39 am

Web Title: mandar bharde article in loksatta lokrang
Just Now!
X