20 November 2019

News Flash

लॉरा ब्रूकर कोण आहे?

असेच एकदा मार्शल टिटोच्या दुसऱ्या बायकोच्या लहान मुलीने मला मेल केला होता.

मी फेसबुक पाहिले तर लॉरा ब्रूकर नावाने मला मित्रयादीत जोडून घ्या म्हणून एका मुलीने मला कळकळीची विनंती केली होती.

माझा एक नियम आहे. मी सकाळी उठल्या उठल्या फेसबुकवर लॉगिन करतो. मी झोपलो होतो तेवढय़ा काळात रात्रीतून माझ्या आजूबाजूच्यांच्या आयुष्यात काही क्रांती वगरे तर झाली नाहीये ना, हे तपासतो, आणि मगच दात घासायला जातो. गेली पाच-सहा वर्षे माझा हा दिनक्रम आहे. फेसबुकवर स्मार्टपणे लोकांनी पुरवलेल्या माहितीने अपडेट होणे आणि वेळच्या वेळी तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देणे फार महत्त्वाचे असते. नाही तर तुम्ही मागे पडता. मागे एकदा एकाच्या लग्नाच्या फोटोला मी लाइक केले, तर त्याने कॉमेंटमध्ये मला खूप झापले होते. मी लाइक करेपर्यंत त्याचा घटस्फोट झाला होता. आणि जेव्हा त्याच्या नव्या बायकोला हे कळले, की त्याच्या एका मित्राने त्याच्या जुन्या लग्नाच्या फोटोला लाइक केलेय, तेव्हा ‘तुझ्या मित्रांना जर तुझे माझ्याशी लग्न झालेले पसंत नाहीये, तर हे तू मला आधीच का सांगितले नाहीस?,’ असे म्हणून तिने शिमगा केला. तर ते असो!

मी फेसबुक पाहिले तर लॉरा ब्रूकर नावाने मला मित्रयादीत जोडून घ्या म्हणून एका मुलीने मला कळकळीची विनंती केली होती. आणि जर नुसत्या नावाने मी तिला ओळखले नाही तर मला ती कोण आहे, हे लगेच कळावे म्हणून तिचा बिकिनीतला फोटोही तिने प्रोफाइल फोटो म्हणून लावला होता. आता इतक्या कळकळीने जर कोणी माझ्याशी मत्री करा म्हणून विनंती करत असेल तर उगा नाही कशाला म्हणा, हा विचार मी केलाच. माझा आणि तिचा एक कॉमन मित्रही आहे, हेही मला फेसबुकने सांगितले. शेवगे दारणाला माझा एक मित्र आहे- ज्याचे किराणा आणि भुसार मालाचे दुकान आहे. तोही लॉरा ब्रूकरचा गेल्या तीन वर्षांपासून मित्र आहे, हेही यानिमित्ताने समजले. शेवगे दारणाच्या आमच्या वहिनी घुंघट घेऊन असतात. घराण्याचे रीतिरिवाज सांभाळले गेले पाहिजेत याबद्दल आमचा मित्रही फार आग्रही आहे. पण शेवटी लॉराच्या रीतिरिवाजांबद्दल त्यालाही काही बोलता आले नसावे. लॉरा, आमचा किराणा भुसारवाला मित्र आणि मी- आमची एकमेकांशी ओळख कुठे झाली असेल, हेही माझ्या लक्षात येईना. मी बऱ्याचदा नावे आणि चेहरे विसरतो हे खरंय; पण लॉरासारख्यांची नावे आणि चेहरेही जर मी विसरायला लागलो असेन तर विषय फारच गंभीर आहे. लॉराची काही अधिक माहिती मिळते का ते पाहिले, तर समजले की, ती कॅमेरून आयलंडला राहते आणि तिच्या परिचयात तिने लिहिले होते- ‘फीलिंग लोनली’! घ्या.. म्हणजे आता कॅमेरून आयलंडच्या लॉराला जर एकटे वाटत असेल तर मी आणि माझा किराणा भुसारवाला मित्र तिला काय मदत करू शकतो, या प्रश्नाने मला बुचकळ्यात टाकले. शेवटी मी आधी माझ्या बायकोला माझ्या नोटिफिकेशन बघण्यापासून ब्लॉक केले (उगा नंतर भानगड नको.) आणि लॉराची मत्रीची विनंती स्वीकारली. मी तिची विनंती स्वीकारल्या स्वीकारल्या दहा सेकंदांत ‘हॅलो मंदार’ असा लॉराचा मेसेज आला. किती तळमळीने मी तिच्या मत्रीचा स्वीकार करावा म्हणून लॉरा वाट पाहत होती, या कल्पनेने मला आनंद झाला. आता काय बोलायचे, हा प्रश्नच होता. पण हल्ली हे एक बरे आहे- बोलायला काही नसले की सरळ शुभेच्छा द्यायची फॅशन आहे. कॅलेंडर पाहायचे आणि सरळ माघी जयंती असेल किंवा भगतसिंग फाशी स्मरणदिन असेल, तरी आपण शुभेच्छा देऊन टाकायच्या. मीही लॉराला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर तिने वेगवेगळ्या रंगांतल्या बिकिनीतले तिचे पाच-सहा फोटो पाठवून दिले. आता ही काय पद्धत आहे- एखाद्याने शुभेच्छा दिल्या तर प्रतिसाद द्यायची? मी घाबरलो ना! एकदा किराणा भुसारवाल्याला फोन करून लॉरा कोण आहे ते विचारायला हवे, असे मनाशी ठरवले. बायकोला पुन्हा अनब्लॉक केले आणि मी दात घासायला गेलो.

असेच एकदा मार्शल टिटोच्या दुसऱ्या बायकोच्या लहान मुलीने मला मेल केला होता. बिचारीने प्रामाणिकपणे मला सांगितले, की आपण कधीही भेटलेलो नाही; पण तरीही मी एक प्रामाणिक माणूस असावा असे तिला वाटते आहे. तिच्या वडिलांनी तिच्या अकाऊंटमध्ये ५० मिलियन डॉलर ठेवलेले आहेत. तिचे भाऊ खूप क्रूर आहेत आणि तिच्याकडून ते हे पैसे हिसकावून घेऊ शकतात. त्यांनी तिच्या गाडीवर रॉकेट लाँचरने हल्लाही केला होता.. ज्यातून ती सुदैवाने बचावली. पण आता ती देश सोडून जायच्या विचारात आहे. पण त्यापूर्वी ती एखाद्या प्रामाणिक माणसाच्या खात्यात ते ५० मिलियन डॉलर ट्रान्स्फर करू इच्छिते. आणि एकदा का ती देश सोडून बाहेर पडली, की मग तिच्या नव्या अकाऊंटमध्ये मी ते पैसे परत पाठवायचे. ही सेवा पुरवण्याबद्दल ती मला आग्रह करत होती- की त्यासाठी २५ मिलियन डॉलर मी ठेवून घ्यावेत.. मेहनताना म्हणून! आमच्या शेजारच्या काकू दिवाळीला मुलीकडे जातात, तर त्यांचे दागिने आणि चांदीची भांडी आठ-दहा दिवस सांभाळायला माझ्या आईकडे आणून देतात. लोकांच्या वस्तू सांभाळायची आम्हाला अगदीच सवय नाही असे नाही; पण त्याची इतकी किंमत मिळते, हे आम्हाला माहीतच नाही. एकतर माझा मिलियन म्हणजे किती शून्य, याचा नेहमीच गोंधळ उडतो. उगा आपण लोकांना मदत करायला जायचो, आणि हे मिलियन-बिलियनचे हिशोब करायच्या नादात आपल्याच खात्यातले पाच-पन्नास हजार टिटो-कन्येकडे जायचे, ही भीती मला वाटली आणि मी मोठय़ा जड अंत:करणाने ‘सध्या योग नाही..’ असे तिला कळवून टाकले.

या व्हच्र्युअल जगातले मला काही कळतच नाही. इथे लोक कशाने खूश होतील, कशाने दुखावले जातील, काहीच सांगता येत नाही. माझ्या एका परिचिताने फेसबुकवर माहिती दिली, की त्याची आत्या वारली. तर त्या पोस्टला तीनशे लाइक्स मिळाले. आता त्याची आत्या वारली तर तीनशे जणांनी त्यात खूश होण्यासारखे काय आहे? त्याची आत्या काही देशद्रोही किंवा सराईत पैसे घेऊन लोकांना लुटणारी वगरे काहीही नव्हती. बिचारी खाणावळ चालवायची. ती गेल्यावर लोकांनी खूश व्हावे असे काय होते, ते मला कळले नाही! बरं, त्याला विचारले तर तोही खुशीत होता. त्याने फेसबुकवर काही लिहिले तर उगाच १५-२० जण आजपर्यंत लाइक करायचे. या वेळेला एकदम तीनशे लाइक्स मिळाले. त्यामुळे तो खूपच आनंदला होता. झारखंड, नागालँड, फ्रान्स, इथिओपिया इथूनही लोकांनी त्याची आत्या गेली म्हणून ‘लाइक’ करून सहवेदना व्यक्त केली होती.

एकदा विश्वास नांगरे पाटलांना एक मेसेज आला. तो मेसेज वाचून ते अतिशय खूश झाले. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्या तीन गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी याबद्दल अतिशय छान विचार त्यात मांडले होते. लेखकाच्या प्रतिभेवर ते खूश झाले. आतापर्यंत आपल्याला हे का कळले नाही? आता यापुढे आपणही हा विचार आचरणात आणायचा असे त्यांनी मनोमन ठरवून टाकले, आणि खाली लेखकाचे नाव पाहिले तर- विश्वास नांगरे पाटील. आपण कधी हे बोललो होतो, या प्रश्नाने ते बुचकळ्यात पडले. आपण बोलतो आणि आपल्यालाच माहीत नसते की काय? विश्वास नांगरे पाटलांचे विचार म्हणून जेवढे साहित्य आज समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे त्याची बेरीज ही भगवद्गीता, कुराण, बायबल यांच्या पानांच्या बेरजेपेक्षा जास्त भरेल. ‘ऑफिसच्या कामाला चाललोय म्हणून बाहेर पडता आणि लोकांना प्रेरणा देणारे मेसेज पाठवता.. प्रेरणा देणारे मेसेज पाठवायचेत तर घरीच बसून का नाही पाठवत? त्याकरिता बाहेर जायची काय गरज आहे?’ या प्रश्नाला बिचाऱ्यांना घरी तोंड द्यावे लागले अशी माझी माहिती आहे. ‘घरी यायला किती वेळ आहे?’ या मेसेजच्या उत्तराची वाट बघत असताना ‘जीवनात संयम फार महत्त्वाचा. जो धीर धरतो त्यालाच यशाची माळ गळ्यात पडल्याचा अनुभव घेता येतो..’ असा मेसेज आपल्या नवऱ्याच्या नावाने कोणी पाठवला तर रागाचा पारा तर चढेलच ना! लोकांना काहीतरी भव्यदिव्य सुचले की त्यांना खात्रीच नसते- लोक ते वाचतील म्हणून! मग सरळ नांगरे पाटलांसारख्या यशस्वी माणसाच्या नावावर आपलेच विचार पुढे ढकलून ते मोकळे होतात. दुसऱ्याच्या नावावर एखादी बदनामीकारक पोस्ट लिहिली तर कायद्याने गुन्हा आहे; पण दुसऱ्याच्या नावावर काहीतरी भव्यदिव्य प्रेरणा देणारी खोटीच पोस्ट लिहिली तर कोणती कलमे लावता येतील, हे एकदा नांगरे पाटलांनाच विचारायला पाहिजे. घराच्या खिडकीत पक्षी येऊन बसलेला असतो तेव्हा लोक संगणकाच्या स्क्रीनवर पक्ष्याचे कूजन ऐकून ‘सो स्वीट!’ अशी कॉमेंट देण्यात बिझी असतात. घरातलं पोर कविता म्हणून दाखवत असतं तेव्हा त्याला मोबाइलवर रेकॉर्ड करतात, फेसबुकवर अपलोड करतात आणि मग स्वत:च्या पोस्टला लाइक करून इतरांचे लाइक मोजत बसतात. बाहेर पाऊस पडत असतो तेव्हा त्यात भिजण्यापेक्षा पटकन् संगणकासमोर जाऊन पोस्ट टाकणे त्याला महत्त्वाचे वाटते. एकाची बायको घर सोडून गेली. का, तर म्हणे तिच्या आईने अळूवडय़ांचा व्हिडीओ टाकला होता, तर नवऱ्याच्या भावाने त्याला लाइक नाही केले!

व्हच्र्युअली खूप कनेक्टेड म्हणजे रिअ‍ॅलिटीमध्ये खूप बिनडोक असे अनुभवायला यायला लागले आहे. लोक भयाच्या सावटाखाली गेलेत. त्यांचे सगळे आधार ते छोटय़ाशा स्क्रीनमध्ये शोधताहेत. त्यांच्या प्रेरणा तिथे आहेत. त्यांचे व्हिलन तिथे आहेत. आणि त्याचा नि:पात करणारे हीरोही तिथेच आहेत. त्यांना निराधार, तुटल्यासारखेही तिथेच वाटतेय आणि आधारही तिथेच वाटतोय. साधे ऑफिसमधून एकत्र घरी जायचे असेल तरी लोक माणसांना प्रत्यक्षात टाळायला लागलेत. कारण लोक वेळ वाया घालवतात आणि मग ऑनलाइन राहता येत नाही. लोक एकमेकांना भेटत नाहीत, कारण मग गप्पा मारत बसावे लागते आणि मग ऑनलाइन राहता येत नाही. स्क्रीनसमोर मान खाली घालून ते प्रवास करतात आणि घरी येतात. घरी आई, बाप, बायको, मुले त्यांची वाट बघत असतात. त्यांना खूप काहीतरी बोलायचे असते. पण आपण आता समोरासमोर बोलायची सवयच हरवून बसलो आहोत की काय, अशी मला भीती वाटते. ते घरी येतात. घरातल्यांशी बोलणे टाळतात. खोलीचे दार लावून घेतात आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जगाची कवाडे उघडतात. तिथे कोणाची तरी आत्या गेलेली असते, त्याच्या आभासी दारावर जायचे असते. तो आभासीच सुतक पाळतो. कोणीतरी भलत्यानेच नांगरे पाटलांचे म्हणून भलत्याचेच विचार फॉरवर्ड केलेले असतात आणि आपली अभिरुची किती भारी आहे असा खोटाच गवगवा करून आभासी दंडातल्या आभासी बेटकुळ्या फुलवलेल्या असतात. कोणत्या तरी जातीच्या भावना दुखावलेल्या असतात. कोणीतरी एल्गार करतो. कोणाला तरी आभासी एकटे वाटते. त्याची कोणीतरी आभासीच पाठ थोपटतो. आभासीच समूह बनतो आणि त्याच्या आभासीच अस्मिता दुखावल्या जातात. आभासी प्रतीकांच्या आभासीच विटंबना होतात. आभासी ब्लू व्हेलची आभासीच सावली पडते आणि या अभद्र सावलीच्या पाठी स्क्रीनसमोर मान खाली घालून कोणीतरी खराखुरा खुळा कठडय़ावरून चालत निघतो.. आणि त्याच्या बापाला आलेल्या फॉरवर्डमधूनच कळते, की त्याचा पोरगा कठडय़ावरून पडला.

बिकिनीतल्या लॉरा ब्रूकरने आपल्या वास्तवाचे कपडे उतरवायला सुरुवात केलीये भाऊ!

मंदार भारदे mandarbharde@gmail.com

First Published on August 20, 2017 4:07 am

Web Title: mandar bharde article laura brooker facebook
Just Now!
X