‘आला सकाळी सकाळी पैसे मागायला. थोडी तरी सभ्यता पाहिजे राव. माझा अजून नाश्ताही नाही झाला. सकाळचा दुसरा चहा मी अजून प्यायलो नाही तर सकाळीच लाजलज्जा सोडून पैसे मागायला दारात हजर!’ माझा हा सगळा पाणउतारा जो करत होता त्याने सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडून ‘दोन दिवसांत आणून देतो’ म्हणून पैसे उधार नेले होते. त्यानंतर सहा महिन्यांत तो मला एकदाही भेटला नव्हता. फोनवर जेव्हा बोलणे व्हायचे तेव्हा तो ‘पैशाची व्यवस्था जवळजवळ झालीये. आणि आठ-दहा दिवसांत ते होऊनच जाईल,’ असेही सांगायचा. जवळजवळ पैशाची व्यवस्था होणे म्हणजे काय, हे मला आजवर कळलेले नाही.

जगात दोन प्रकारचे लोक असतात. उधार देणारे आणि उधार घेणारे. लोकांना पैसे उधार देणारे होण्यासाठी फार काही करावे लागत नाही. तुम्हाला भीड पडत असेल, नाही म्हणता येत नसेल आणि समोरच्याला जी पैशाची निकड आहे ती खरीच आहे यावर तुमचा लगेचच विश्वास बसत असेल तर उधार देणाऱ्यांच्या लीगमध्ये तुमचा ताबडतोब समावेश होतो. जगातले बहुतांश लोक याच प्रकारात मोडतात. आणि काही थोडे गुणवान, विशेष डीएनए असलेले लोकच उधार घेणाऱ्या लोकांच्या लीगमध्ये असतात. अडीअडचणीला लोकांकडून पैसे घेऊन ते सांगितलेल्या वेळेला देऊन टाकणाऱ्या भाबडय़ा लोकांचा तर मला उल्लेखदेखील करायचा नाहीए. उधार पैसे घेणाऱ्या सराईत लोकांच्या जमातीला हे लोक कलंक आहेत. सराईत उधार मागणारा ही विधात्याने फार फुरसतीत केलेली निर्मिती आहे. फार लोकविलक्षण अवगुणांचा संगम जुळून आला की एक धडधाकट सराईत उधार मागणारा तयार होतो.

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

मी उधार पैसे घेणाऱ्या सराईत लोकांच्या वर्तनाचा फार बारकाईने अभ्यास केला आहे. ‘आपले पैसे’, ‘दुसऱ्याचे पैसे’ अशा पैशाच्या मालकीच्या क्षुद्र संकल्पनांमधून ते मुक्त झालेले असतात. जे पैसे दुसऱ्याच्या खिशात आहेत, ते आपल्याला उपलब्ध आहेत, यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे त्यांना जरा जरी संशय आला- की समोरच्याकडे पैसे आहेत, की ते ताबडतोब त्याच्याकडे उधार मागतात.  सराईत उधार मागणारा होण्यासाठी तीन टप्प्यांत विविध व्यक्तिगत गुणांची गरज असते.

टप्पा पहिला :

हा पैसे मागण्याचा टप्पा आहे. या टप्प्यात सराईत उधार मागणारा सावज हेरत असतो. सर्वोच्च सफाईदारपणा याच टप्प्यात दाखवावा लागतो. समोरच्याला आपली पैशाची गरज पटवून देणे, हे या टप्प्यात अतिशय गरजेचे असते. एकाने माझ्याकडे ‘सध्या आयसिसच्या कारवायांमुळे धंद्यावर परिणाम झालाय, तेव्हा काही काळापुरते उधार पैसे दे,’ असे सांगून पैसे मागितले होते. तो ब्लाऊज शिवून देणारा टेलर आहे. जेव्हा सराईत तुमच्याकडे पैसे मागतो तेव्हा आयसिसच्या कारवायांचा आणि ब्लाऊज शिवून देण्याच्या धंद्याचा काय संबंध, असले प्रश्न तुम्हाला पडतच नाहीत. उधार मागण्याचा आत्मविश्वास हेच त्याचे मुख्य भांडवल असते. मी एकदा चहाच्या टपरीवर चहा पीत उभा होतो. एकजण सराईत भेटला. मी त्याला चहा  पितोस का, म्हणून विचारले. ‘या असल्या फडतूस टपरीवर मी नाही चहा पीत. जरा चांगल्या हॉटेलात चहा प्यायची सवय लावून घे..’ म्हणून तो मला एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने चहाबरोबर खाण्याचीही ऑर्डर दिली. आणि गप्पा मारता मारता तो आता त्याची कंपनी न्यूयॉर्क स्टॉक मार्केटमध्ये नोंदवणार असल्याचे सांगितले. मला साहजिकच आनंद झाला. ‘सध्या फक्त अडचण आहे..’ असे म्हणून त्याने माझ्याकडे थोडे पैसे उधार मागितले. ते पैसे न्यूयॉर्कला जायच्या-यायच्या विमानाच्या तिकिटाइतकेदेखील नव्हते. मी ‘हो’ म्हणालो. त्याची आर्थिक अडचण त्याने मला सांगितली होती आणि तो फालतू ठिकाणी चहा पीत नाही, त्यामुळे हॉटेलचे बिलदेखील मी दिले. आणि मी टीप दिल्यावर त्याने मला अजून जास्त टीप द्यायला लावली आणि ‘जरा ग्रेसफुल जगायला शीक..’ असा सल्लाही वर दिला. ते पैसे परत कधीच मिळाले नाहीत. मी आजही न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर कुठे त्याची कंपनी दिसते आहे का, हे शोधत असतो.

तुमच्या-माझ्यासारखी माणसं उधार मागायला नातलग किंवा जवळच्या मित्रांचा आधार घेतात. ही सगळी माणसं उधार मागून वेळेवर परत देणाऱ्या हलक्या जमातीतली. पट्टीच्या उधार मागणाऱ्याचे जवळचे मित्र आणि नातलग हे पर्याय फार लहानपणीच वापरून झालेले असतात. सराईत हा कोणाकडेही उधार मागू शकतो. आणि मुख्य म्हणजे मिळवूदेखील शकतो. मी एकदा पाहिलेय की- एका सराईताने नंबर लावून क्लिनिकमध्ये बसलेला असताना कंपौंडरकडून उधार घेऊन नंतर डॉक्टरला फी दिली. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये- जसे की लग्न किंवा सभा- यांत सहभागी होण्याकडे सराईत उधार मागणाऱ्यांचा कल असतो. त्यानिमित्ताने त्यांची खूप लोकांशी ओळख होते आणि भविष्यात या खूप लोकांकडे उधार मागणे त्यांना शक्य होते. या लोकांकडे उधार पैसे मागायचे.. दहापैकी पाचजण नक्की देतात असा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे खूप लोकांशी संपर्क ठेवणे हे उधार मागण्यात प्रगती करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

टप्पा दुसरा :

हा उधार मागण्याच्या भव्यदिव्य परंपरेतला सर्वात कठीण टप्पा. या टप्प्यातून जो पार होतो त्यालाच उधार मागण्याची गोड फळे उपभोगता येतात. वाट्टेल त्या थापा मारून लोकांकडून एकदा पैसे उधार घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचे असते ते- लोक पैसे मागायला लागल्यानंतर त्यांना टाळायचे कसे? खरं तर एक अगदी साधा नियम आहे. जो मनुष्य तुम्ही फोन केल्यावर उचलत नाही किंवा नंतर परत फोनही करीत नाही, किंवा जो मनुष्य वारंवार फोन नंबर बदलत राहतो, किंवा ज्या माणसाकडे दोनपेक्षा जास्त फोन आहेत, त्या माणसाबरोबर कोणताही व्यवहार करताच कामा नये. पण जेव्हा आपण उधार द्यायच्या मूडमध्ये असतो तेव्हा या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या बाबतीत असे काही होणारच नाही असे आपल्याला मनापासून वाटत असते. आणि मग उधार दिल्यानंतरचा थरारक टप्पा सुरू होतो. ज्याला पैसे दिलेत तो फोन उचलेनासा होतो. अनेकदा तो आपला नंबर बघून फोन कट करून टाकतो. कधीही घरी गेलो तरी ‘तो घरी नाही’ असे घरचे सांगतात. ऑफिसमध्ये गेलो तर ‘आत्ताच तो बाहेर गेलाय’ असे सांगितले जाते. सर्वाधिक सीसीटीव्ही कॅमेरे हे उधार न चुकवणाऱ्या सराईत लोकांनी आपल्या घरी वा ऑफिसमध्ये बसवले आहेत. ते पैसे मागायला येणाऱ्या लोकांना लांबवरून कॅमेऱ्यात बघतात आणि ‘मी नाहीये असे सांगा’ असे कळवायला इतरांना सांगतात. मला एक धुरंधर असा माहिती आहे- की ज्याने घरी तीन मोठे कुत्रे पाळलेत. पैसे मागायला एखादा माणूस आला की तो कुत्रे मोकळे सोडतो. त्याला घाबरून पैसे मागायला आलेले लोक पळून जातात. आणि जे फोन करतात त्यांचे तो फोन उचलतच नाही. थापा मारणारे व नाटक करणारे तर याच्याही पुढची पायरी गाठतात. माझ्या माहितीतला एकजण उधार वसूल करायला गेला असता उधार घेणाऱ्याने असे सांगितले की, ‘माझ्याकडे आता पैसे नाहीत. पण पाहिजे असेल तर तू माझ्या लहान मुलाला तारण ठेव. जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी त्याला परत घेऊन जाईन..’ ‘मी तुझे पैसे देण्यासाठी यायला निघालो होतो, पण मला चोरांनी रस्त्यात लुटले..’ ‘मी खूप आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, बरा झालो की पैसे आणून देतो..’ ‘मला एकाचे पैसे येणार होते, पण त्याचे वडील वारले..’ ‘अमुकने दिलेला चेक बाऊन्स झाला, त्यामुळे सध्या पैसे नाहीयेत..’ ही आणि अशी कितीतरी कारणे उधार परत न करण्यासाठी सराईत माणूस लीलया देत राहतो. समोरच्याचा फोन उचलायचा नाही, त्याला भेटणे टाळायचे, भेटला तर खोटी कारणे सांगायची, पुढची मुदत थापा मारून मागून घ्यायची, नंतर परत फोन टाळायचे, भेटायचे नाही.. शेवटी शंभरातले नव्वद जण कंटाळून नाद सोडून देतात. ते सगळे पैसे फुकटात आपलेच.

असे हे सगळे दुष्टचक्र आहे.

टप्पा तिसरा :

हा टप्पा उधार घेणाऱ्या लोकांच्या वाटय़ाला फार कमी वेळा येतो. बहुतांश पैसे मागणाऱ्यांचा हुरूप या टप्प्यावर येईपर्यंत तुटलेला असतो आणि त्यांनी पैशाचा नाद सोडून दिलेला असतो. एखादाच खमका निघतो- जो धमकी देऊन किंवा दमदाटी करून कसेतरी आपले पैसे वसूल करतो. पण हे फारच दुर्मीळ आहे. एखाद्याने खूपच तगादा लावला तर दुसऱ्याकडून पैसे उधार घेऊन त्याची उधारी फेडून टाकायची वेळ काही वेळा सराईतावर येतेही; पण फेडून टाकायची वेळ येणे, हे सराईतासाठी फारच अपमानकारक समजले जाते. एखाद्याचे पैसे फेडून टाकावे लागले तर सराईत त्या घटनेतून योग्य तो धडा घेतो आणि परत कधीही दुसऱ्याचे पैसे फेडायला लागू नये यासाठी काय करता येईल, याच्या तयारीला लागतो.

आपल्या पैशाची सर्वात सुरक्षित जागा आपली तिजोरी हीच होय. आपल्याला नाही म्हणता येत नाही, भीड पडते आणि मग आपण आपल्या मनाला समर्थन देत राहतो : तो चांगला आहे, तो आपल्याशी नाही वाईट वागणार, अडचणीच्या वेळी नाही मदत करायची तर कधी करायची? नंतर नंतर तर ‘नाही म्हणता येत नाही’ हे स्वीकारण्याऐवजी आपण दुसऱ्याच्या गरजेचेच समर्थन करू लागतो आणि पैसे देऊन बसतो. यावर ठाम ‘नाही’ म्हणायला शिकणे किंवा लुटले जाणे असे दोनच पर्याय आहेत. कारण बाहेरच्या प्रत्येक फांदीवर एकेक सराईत टपूनच बसलाय!

मंदार भारदे mandarbharde@gmail.com