12 November 2019

News Flash

नेत्यांनी गरीबांच्या प्रश्नांत पडू नये!

गरीब माणूस हा भारतीय जनजीवनातला एक फार इंटरेस्टिंग घटक आहे असे माझे मत आहे.

गरीब माणूस हा भारतीय जनजीवनातला एक फार इंटरेस्टिंग घटक आहे असे माझे मत आहे. गरीब माणूस बोलतो कसा? तो वागतो कसा? तो दिसतो कसा? त्याच्या आवडीनिवडी काय आहेत? ग्लोबल वॉìमगबद्दल आणि कार्बन सजगतेबद्दल त्याचे काय मत आहे? त्याला अमेरिकेत स्थायिक व्हावे आणि तिकडे हळदीकुंकू करावे असे वाटत नाही काय? गरीब हा नारायण मूर्तीच्या बाजूचा आहे की सिक्कांच्या? हे प्रश्न मला नेहमीच पडत राहतात.

माझा एक मित्र मोठा तालेवार राजकारणी आहे. काही दिवसांपूर्वी मी त्याच्याबरोबर त्याच्या एका सभेला गेलो होतो. त्याने कळवळून कळवळून गरीबांचे प्रश्न मांडले. त्यांच्या हालअपेष्टांचे वर्णनही केले. मीही थोडा हेलावलो. गरीबांचे इतके हाल होताहेत याची मला तर बिलकुलच कल्पना नव्हती. सभा संपल्यावर आम्ही त्याच्या गाडीत पटकन् जाऊन बसलो. त्याचा ड्रायव्हर चतुर होता. त्याने सभा संपायचा अंदाज घेऊन गाडीचा एसी बरोबर आधीच सुरू करून ठेवला होता. त्यामुळे आम्ही सभा संपल्या संपल्या गाडीच्या थेट गारव्यातच येऊन बसलो. राजकीय सभेच्या ठिकाणी वातानुकूलित मांडव का घालत नाहीत, हा माझा मोठाच आक्षेपाचा विषय आहे. तर ते असो. गाडीत बसल्याबरोबर मी मित्राला म्हणालो, ‘‘अरे, तू काय जबरदस्त बोललास. गरीबांचे आणि गरिबीचे तू काय मस्त वर्णन केलेस. तू जेव्हा गरीबांचे पावसाळ्यात कसे हाल होतात त्याचे वर्णन करत होतास, तेव्हा तर अगदी ऐकत राहावेसे वाटत होते.’’ मित्रही खूश झाला. आमचा मित्र कुलाब्याला राहतो. भल्यामोठय़ा गाडीतून काच बंद करून फिरतो. मतदारसंघात जायचे असेल तर हेलिकॉप्टरने जातो. मग त्याला गरीबांचे दु:ख कसे कळले असेल? माझ्या मते तर त्याने शेवटचा गरीब बघूनही पंधरा-वीस वर्षे झाली असतील. पण तरीही त्याने गरीबांचे जे वर्णन केले ते थक्क करणारे होते. माझा तर गरीबाशी अजिबात संबंध येत नाही. त्यामुळे मला गरीबांची फारशी माहितीही नाही. माझ्या मित्रालाही गरीबांबद्दल फारसे माहीत नाही. तरीही तो गरीबांबद्दल फार मस्त बोलला. त्याने अभ्यासासाठी काही गरीब गिनिपिग म्हणून फार्म हाऊसवर बाळगलेत तर नाही ना, असाही मला संशय होता. म्हणून त्याला मी विचारले, तू शेवटचा गरीब बघून किती दिवस झाले? त्यानेही पारदर्शकतेनं मला सांगितलं की, जवळजवळ २० वर्षे झाली त्याला शेवटचा गरीब बघून. मग मी त्याला म्हणालो, ‘अरे, २० वर्षांपूर्वी पाहिलेल्या गरीबांचे तू इतके तंतोतंत वर्णन कसे काय केलेस? डोळ्यांत पाणी काय, उडालेले छप्पर काय, बायाबापडय़ांची इज्जत काय, आणि पोटाची खळगी काय! काय जबरदस्त वर्णन केलेस तू २० वर्षांपूर्वीच्या गरीबांचे! पण मग तुला आत्ताच्या गरीबांबद्दल काही माहिती आहे का? आता त्यांच्या परिस्थितीत काय बदल झालाय याची काही कल्पना आहे का?’

तर तो बिनधास्तपणे म्हणाला, ‘अरे, गरीबाच्या परिस्थितीत बदल वगैरे होत नसतोच. ते आहे तसेच राहतात. त्याने आत्ता जे भाषण केले ते त्याच्या स्वर्गवासी वडिलांनी पहिल्या टर्मला जेव्हा ते उभे होते तेव्हा बसवलेले भाषण आहे. त्यांनी सहा टर्म काढल्या आणि आता मित्राच्याही दोन टर्म झाल्यात. बायाबापडय़ांची इज्जत, पोटाची खळगी, उडालेले छप्पर सगळे जसेच्या तसे आहे. गरीबांबद्दल माझ्या मनात उत्सुकता दाटून आली. सुरवंटाचे फुलपाखरू होते, खजुराची खारीक होते, क्लार्कचा हेडक्लार्क होतो, सिंगल स्क्रीनचे मल्टिप्लेक्स होते, बी पेरले तर त्याचे झाड होते; पण गरीब पेरल्यावर मात्र त्यातून गरीबच उगवतो, हे किती मजेदार आहे!

गरीब हा भारतीय समाजजीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. (हे मी आपले उगाच सवयीने म्हणालो.) भारतीय राजकारण, नोकरशाही आणि सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या लोकांच्या करीअरमध्ये गरीबाला फार महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना खरे म्हणजे गरीब अजिबातच आवडत नाहीत. पण बिचाऱ्यांना तसे उघडपणे बोलता येत नाही. मागे एकदा ओबेरॉय हॉटेलमध्ये दहा गरीब मुलांना वह्य़ावाटपाचा कार्यक्रम एका संस्थेने ठेवला होता. त्या कार्यक्रमाला संस्थेतले झाडून २०० कार्यकर्ते आले होते. अतिशय देखणा सोहळा आणि अतिशय उच्च प्रतीचे जेवण आयोजकांनी ठेवले होते. मीही कार्यक्रमाला गेलो होतो. दहा गरीबांना मोफत वह्य़ा मिळाव्यात म्हणून अक्षरश: लाखो रुपयांचा खर्च त्या संस्थेने जेवण आणि आयोजनावर केला होता. मी मनातल्या मनात विचार केला- डिनर आणि कार्यक्रमाच्या आयोजनाचा खर्च जर मोजला तर हजार रुपयाला एक १०० पाणी वही एका गरीबाला पडली. तिथल्या सेक्रेटरी बाई तर अध्यक्षांवर जाम उखडला होत्या. अध्यक्षांनी कुठले भुक्कड गरीब विद्यार्थी मोफत वह्य़ावाटपासाठी आणले, हा त्यांच्या आक्षेपाचा विषय होता. मी त्यांच्या शेजारी बसून आइस्क्रीम खात होतो. त्यांनी एका गरीबाकडे बोट दाखवले आणि मला म्हणाल्या, ‘कपडे बघ त्याने कसे घातलेत? फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये कोणी असले कपडे घालून जाते का? कुठे कसे कपडे घालून जायचे हेही ज्यांना कळत नाही असले गरीब सिलेक्ट करून आणायचेच कशाला? चांगले नीटनेइतके गरीब बोलवावेत कार्यक्रमाला हेही समजत नाही अध्यक्षांना.’ त्यांचे गरीबांबद्दलचे स्पष्ट मत आणि कळकळ पाहून या बाई नक्की एक दिवस संस्थेच्या अध्यक्ष होतील याची मला खात्रीच पटली. मी त्यांना तसे म्हटल्यावर बाई जाम खूश झाल्या. माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मी तर युरोपिअन क्रूझ बुक करून त्यावर गरीबांना वह्य़ा वाटायचे ठरवले आहे, अशी मनीषा त्यांनी घोषित केली तेव्हा त्यांच्या विचारांची झेप बघून मला गहिवरून आले. त्या क्रूझवर गरीब शोभावेत म्हणून त्यांना स्वत:च्या खर्चाने स्विमिंग कॉस्च्युम देणार असल्याचेही त्यांनी मला सांगितले. गरीबांना क्रूझवर नेण्यापूर्वी त्यांचे फेशिअल करून घ्या, म्हणजे गरीब चकाचक दिसतील, ही माझी सूचनाही त्यांना खूपच आवडली. मलाही त्यानिमित्ताने गरीबांसाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळाले.

राजकारणात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या देशातल्या गरीबांचे काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. आणि ते उत्तर ‘दुर्लक्ष’ हे आहे. गरीबांकडे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने जर दुर्लक्ष केले तर त्यांचे प्रश्न जास्त लवकर सुटतील असे मला वाटते. ज्या ज्या राजकारण्यांनी गरीबांच्या प्रश्नात हात घातला, त्या त्या राजकारण्यांचे हात त्या प्रश्नात पोळले आहेत आणि त्यांचे राजकारण उद्ध्वस्त झाले आहे. माझ्या असेही लक्षात आले आहे, की गरीबांना राजकारण्यांनी त्यांच्या प्रश्नात लक्ष घातलेले अजिबात आवडत नाही. त्यांचा इगो त्यामुळे दुखावला जातो. त्यामुळे गरिबीत राहणारे किंवा आवर्जून गरीबासारखा पेहराव करणाऱ्याचे राजकीय करीअर कायमच उद्ध्वस्त झालेले आहे. गरीबाला त्याचा नेता गरीब असलेला चालत नाही. त्याला मग अशा नेत्याला आपला नेता मानायला मजाच येत नाही. नेत्याने मस्त हेलिकॉप्टरने सभेच्या ठिकाणी यावे, एखाद्या राजा-महाराजासारखा त्याचा गाडय़ांचा ताफा असावा, त्याचे कपडे भारी असावेत, त्याच्या हातात सोन्याच्या अंगठय़ा वगैरे असाव्यात आणि लांब कुठेतरी बघत त्याने लोकांना हात हलवावेत.. हे सारे गरीबाला आवडते. प्रस्थापित राजकारण आपले प्रश्न सोडवायला काहीही करू शकत नाही याची गरीबांना खात्रीच आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवावेत म्हणून ते तुमच्याकडे पाहत नाहीत, तर तुम्ही त्यांची करमणूक करावी, या अपेक्षेने ते सभांना येत असतात. आणि मग तिथेही जर त्यांना त्यांच्यासारखाच गरीबासारखा राहणारा नेता दिसला तर त्यांना फसवल्यासारखे वाटते.

नेत्याने त्याला घातलेले हार मस्त लोकांमध्ये भिरकावले पाहिजेत. तलवार उंचावून दाखवली पाहिजे. तो हेलिकॉप्टरने उडणारा धुरळा, ती लांबच लांब गाडय़ांची रांग, त्या पोलिसांच्या शिट्टय़ा हे सगळे पाहायला गरीबांना फार आवडते. त्यात जर एखादा नेता साधा राहणार असेल आणि स्वत:ला गरीब म्हणून प्रोजेक्ट करत असेल, तर लोकांना कशाला त्याला पाहायला आवडेल? त्यासाठी ते आरशात नाही पाहणार? तुम्ही आठवून बघा- ज्या ज्या नेत्यांनी गरीबांचे प्रश्न खरेच समजावून घ्यायचा प्रयत्न केला, त्या प्रत्येकाचे राजकीय करीअर उद्ध्वस्त झाले आहे. तहहयात समस्त कम्युनिस्टांनी आणि समाजवाद्यांनी गरीबांसाठी गरीबासारखे दिसायचा प्रयत्न करत राजकारण केले.. लोकांनी कायमच त्यांना सत्तेच्या बाबतीत ‘गरीब’ ठेवले. समाजवादी लोकांना थोडीफार सत्ता तेव्हाच दिसली- जेव्हा अनिल अंबानी समाजवादी पक्षाचे, तर विजय मल्लय़ा जनता दलाचे खासदार झाले. महाराष्ट्रातल्या गरीब कलावतीच्या घरी राहुल गांधी जमिनीवर बसून जेवले, तिथून सगळे राजकारण फिरले. नंतर नंतर तर ते गरीबांच्या इतक्या प्रेमात पडले होते, की ते गरीबांच्या वस्त्या-वस्त्यांवर फिरायचे आणि त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न करायचे. गरीबांना त्यांच्या प्रश्नांत कोणीही लक्ष घालण्याचा भोचकपणा केला तर ते आवडत नाही. याची जी फळे त्यांना मिळाली ती तर आपण पाहतोच आहोत.

मला नेहमीच याची गंमत वाटत आली आहे, की भारतातल्या महत्त्वाच्या लोकांना गरीबांची दखल का घ्यावी लागत असावी? त्यांना गरीबांबद्दल बोलावे लागते. जिथे संधी मिळेल तिथे बोलावे लागते. त्यांच्यासाठी देश चाललाय असे म्हणावे लागते. त्यांच्यासाठी हॉस्पिटले, शाळा काढल्या आहेत असेही म्हणावे लागते. मोठमोठे सेमिनार घ्यावे लागतात. गरीबांचे दारिद्रय़ाचे निर्देशांक बनवावे लागतात.. आणि त्यांच्यावर कोणते कोणते मोठे अहवाल लिहायला लागतात. ज्या गावाला या लोकांना कधी जायचेच नाही, त्याचा पत्ता हे लोक का विचारत असतात? मागे एकदा सरकारने गरीबांच्या सद्य:स्थितीची माहिती देणारा एक अहवाल बनवला होता. त्याच्या कव्हरवर खपाटीला पोट गेलेली लहान पोरे आणि आणि त्यांचे भकास चेहरे छापले होते. फार दिवसांनी इतके बावन्नकशी दारिद्रय़ पाहायला मिळाले. नंतर गदारोळ झाला. सरकारने स्थानिक म्हणून जे गरीब दाखवले होते ते मुळात आफ्रिकेतल्या कोणत्या तरी देशातले गरीब होते. भारी दिसतात म्हणून सरकारने हे आपलेच गरीब आहेत असे समजून त्यांचा फोटो छापला होता. पण मी नेहमीप्रमाणे सरकारचीच बाजू घेतली. सरकारी कार्यालयातून समुद्र दिसतो, रस्त्यावरची वाहतूक दिसते, आलिशान गाडय़ांतून येणारे झुळझुळीत कपडय़ांतले कॉन्ट्रॅक्टर दिसतात, परदेशी करार आणि गुंतवणूक दिसते, बढती आणि वेतन आयोग दिसतात.. पण तिथून जर गरीब दिसतच नसतील तर गरीबांचे फोटो छापताना गडबड होणारच.

मस्त आश्वासने द्या, नव्या भारताची स्वप्ने दाखवा, मॉलबद्दल बोला, सहापदरी रस्त्यांबद्दल बोला, फास्ट इंटरनेट किंवा बुलेट ट्रेनबद्दल बोला.. गरीबांना ते भारी आवडतं. गरीबांच्या प्रश्नांबद्दल राजकारण्यांनी बोलणे हे गरीबांना दरिद्रीपणाचे वाटते.

सरकार कोणाचेही असो! गरीब लोकांचा विकास ही राजकारणाची करमणूक आहे. आणि राजकारण ही गरीबांची करमणूक आहे. त्यामुळे करमणूक जोरदार व्हायला पाहिजे. गरीबाचा विकास त्याच्या त्याच्या वेगाने होत राहील!

मंदार भारदे

mandarbharde@gmail.com

 

First Published on September 10, 2017 1:45 am

Web Title: marathi articles on poverty in india