News Flash

मराठी NRI

मी माझ्या वाटय़ाला आलेल्या मराठी ठफक लोकांचा आणि त्यांच्या वर्तणुकीचा थोडा अभ्यास केला.

शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या दैनंदिन जीवनातील विसंगतींची खिल्ली उडवणारे, तसेच तात्कालिक घटनांतले विरोधाभास हेरणारे आणि त्यातल्या चेष्टेच्या जागा शोधणारे मिश्कील, गमतीशीर सदर..

सांप्रतकाळी (म्हणजे लगेच २०१४ नंतर नाही.. त्यापूर्वीही- आधी सांगितलेले बरे!) आपण काहीही केले तरी कोणतेही सरकार आपल्या मताला  गांभीर्याने घेत नाही असा माझा अनुभव आहे. मग असे कोण लोक आहेत- ज्यांना सरकार गांभीर्याने घेते? माझ्या असे लक्षात आले की, फक्त तुम्ही जर गोरे नागरिक असाल किंवा ठफक असाल, तरच तुमचे मत उपयोगाचे आहे असे सरकारला वाटते.

मी तेव्हा खूपच भारावून गेलो होतो- जेव्हा मूळ  तामिळनाडूच्या, पण सध्या फ्लोरिडा इथे राहणाऱ्या  एका अनिवासी भारतीयाने ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयावर रिपोर्ट लिहिला होता; आणि सरकार त्यावर गांभीर्याने विचार करते आहे, असे मी वाचले! मी कायमच सरकारचे मत गांभीर्याने घेतो, हे मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे. त्यामुळे फ्लोरिडाच्या अनिवासी  भारतीयाचा यवतमाळच्या शेतकऱ्याचा अभ्यास असणारच यावर माझा विश्वास आहे.

मी एका लग्नाला गेलो होतो. तिथे एक आजी भेटल्या. त्यांच्या कडेवर त्यांचा दोन-तीन वर्षांचा गोंडस नातू होता. काहीतरी विचारायचे म्हणून मी त्यांना ‘मग नातवाला घातला की नाही शाळेत?’ असे विचारले. तर त्यांनी ‘आम्ही घालणार आहोत त्याला शाळेत. पण ते इथल्या फडतूस शाळेत नाही, तर लंडनच्या. शेवटी ठफक चे रक्त आहे ते!’ असे मोठय़ा अभिमानाने सांगितले. छान! मी भरून पावलो. मला जगातल्या अनेक देशांमध्ये पोटापाण्यासाठी फिरावे लागते. एक सच्चा भारतीय.. आणि त्यात आणखीन मराठी माणूस असल्याने सरकारबद्दल माझ्या खूप तक्रारी आहेत. त्यात पासपोर्टला पुरेशी पाने नसतात; त्यामुळे सतत फिरणाऱ्याला वारंवार पासपोर्टला अधिक पाने जोडावी लागतात, हीसुद्धा एक तक्रार आहेच. त्यामुळे जेव्हा आपण ग्लोबलायझेशनबद्दल बोलतो तेव्हा मराठी ठफक लोकांच्याबद्दल मज पामराला खूपच उत्सुकता वाटत राहते.

मी माझ्या वाटय़ाला आलेल्या मराठी ठफक लोकांचा आणि त्यांच्या वर्तणुकीचा थोडा अभ्यास केला. त्यातल्या अनेकजणांचे जीवनध्येय हे पहिली संधी मिळताच भारताबाहेर पोटापाण्यासाठी जायचे, हे होते. अशी पहिली संधी जेव्हा मिळाली तेव्हा त्यांनी ताबडतोब तिचा स्वीकार केला. घरात मुलाने नाव काढले याचा आनंद झाला आणि आपला गबरू विमानात चढला याचं कौतुकही. तुम्ही कुठल्याही मराठी ठफक शी बोलायला सुरुवात करा; ते पहिल्या काही वाक्यातच तुम्हाला तिथल्या महाराष्ट्र मंडळाबद्दल सांगायला सुरुवात करतील. माझा एक मित्र मला सांगत होता, की आपली पोरं एकदा परदेशी भूमीवर उतरली की पहिले काम काय करतात, तर ब्यागा खोलीवर टाकतात आणि महाराष्ट्र मंडळ शोधायला बाहेर पडतात. महाराष्ट्र मंडळांबद्दल मला काही राग नाही. आपले मन रमवायला कुणी काहीही करावे. पण मी जेव्हा अनेक जणांशी बोललो तेव्हा मला कळाले, की त्यातल्या बहुतेकजणांचा महाराष्ट्र मंडळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थांशी काहीही संबंध नाही. भारताबाहेर जाऊन जर तिथल्या महाराष्ट्रीय लोकांशीच ओळखी ठेवाव्यात असे आपल्याला वाटत असेल, तर नक्कीच काहीतरी चुकते आहे. मी अनेक मराठी ठफक मुलांचे फेसबुक प्रोफाइल पाहिले. त्यांचे मित्र कोण, मैत्रिणी कोण, हे सगळे बारकाईने पाहिले. लोकांनी अपलोड केलेले फोटो पाहिले की त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळतात. खूपच कमी लोकांच्या मित्रयादीत मला स्थानिक परदेशी मित्र आढळले. हे कुणा स्थानिकाकडे वाढदिवसाला  गेल्याचे किंवा त्यांच्यापैकी कुणी यांच्याकडे आल्याचे फोटो जवळजवळ नव्हतेच. मला असे वाटायचे की, स्थानिक लोक आपल्या लोकांना विचारत नाहीत, किंवा त्यांच्या खाजगी कार्यक्रमांना बोलावण्याइतके प्रतिष्ठित समजत नाहीत की काय? नाहीतर यांना मित्र का नसावेत? मला माझा एक मित्र म्हणाला की, ते लोक फार रिझव्‍‌र्हड् असतात. त्यांना कुणाच्यात मिसळायचे नसते. त्यामुळे आम्हाला फक्त व्यावसायिक सहकारी आहेत; पण मित्र नाहीत. मग मी त्याच्या गावातल्या माझ्या स्थानिक मित्रांचे प्रोफाइल पाहिले. त्यातल्या अनेक फोटोंमध्ये मला काळे, पांढरे, पिवळे सगळे लोक दिसले; फक्त आपले लोक दिसले नाहीत. म्हणजे त्याला सगळे लोक चालत होते.. फक्त आपले लोक सोडून. आपल्या लोकांना दुसऱ्या नवीन संस्कृतीतल्या लोकांशी जुळवून घेता येत नाही. मला वाटते, की भारताबाहेर गेल्यावरही मराठी लोकांना आधी महाराष्ट्र मंडळात का जावेसे वाटते, या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे. मी अनेक ट्रॅव्हल कंपन्यांच्या जाहिराती पाहत असतो. त्यात ठळकपणे हे सांगितलेले असते की, वरण-भात-भाजी-पोळी असले महाराष्ट्रीय जेवण सर्व दिवशी मिळेल. आपल्याला ६ दिवस ७ रात्री पण स्वत:च्या पद्धतीच्या जेवणाशिवाय राहता येत नाही? जिथे आपण चाललोय, तिथले खाणे खाऊन पाहू अशी उत्सुकताही वाटत नाही? अटकेपार झेंडे लावून जेव्हा दिल्लीचे तख्त मराठी माणसाने फोडले आणि जेव्हा तिथे राज्य करायची वेळ आली तेव्हा चांगल्या दर्जाची मटकीची उसळ आणि कांदाभजी मिळत नाहीत म्हणून आपल्या सैनिकांनी तक्रार केली होती, असे जर मला कोणी सांगितले तर आश्चर्य वाटणार नाही. मला माझ्या एक मित्राने सांगितले (जो अमेरिकन आहे!) की, तो एकदा आपल्या एका मराठी मित्राशी गप्पा मारत होता. नवीन काय चालले आहे, हे सांगावे म्हणून त्याने तो एक घरात वापरायचे काहीतरी डिजिटल भांडे बनवत होता त्याबद्दल सांगितले. तर आपल्या गबरूने लगेच त्याला शून्याचा शोध कसा आम्हीच लावलाय, आणि त्यामुळे कशी डिजिटल युगाला सुरुवात झाली, याची रट्ट लावायला सुरुवात केली. तो बिचारा गांजून गेला. हा माझाही अनुभव आहे, की आपले बहुतांश मराठी ठफक हे जेव्हा भारतात असतात तेव्हा परदेशाचे आणि तिथल्या व्यवस्थांचे गोडवे गाऊन वीट आणतात. आणि तिथल्या लोकांना मात्र आपल्या संस्कृतीच्या खऱ्या-खोटय़ा कहाण्या सांगून कंटाळा आणतात. आपल्याला आपण जिथे आहोत तिथे समरसून जाणे, तिथल्या लोकांशी जवळीक निर्माण करणे शक्यच होत नाही की काय, अशी मला भीती वाटते. आपण ग्लोबलायझेशनबद्दल बोलतो. माझ्या मते, याचा पाया जागतिक स्वीकार वाढवणे, हा आहे. कोणी काहीही खात असला, काहीही कपडे घालत असला, इतिहासात त्याचे वर्तन कसेही असले, त्याने आपल्यावर राज्य केलेले असले, किंवा आपला भूतकाळ हा लाजिरवाणा किंवा देदीप्यमान कसाही असला, तरी हे सारे विसरून जाऊन जगभर माणसे जोडत जाणे, त्यांना मित्र बनवणे हाच ग्लोबलायझेशनचा पाया आहे. तिथले स्थानिक आपल्याला स्वीकारत नाहीत, असे म्हणून आपल्या टोळ्या वेगवेगळ्या देशांत बनवत राहणे, हे आपल्याला अजून जागतिक नागरिक बनता येत नाहीये याचे मला निदर्शक वाटते. सॅन हॉजे इथे बसून एखादा भारदे जेव्हा तिथल्या देशमुखलाच मित्र बनवत असतो आणि त्यांना वीकएंडला एकमेकांशिवाय दुसरा कुणीही फिरायला जायला सोबत नसतो तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकते आहे असे मला वाटत राहते. मुंबईत येऊन बिहारी लोकांनी छठपूजा केली की फेसबुकवर जोरात टीका करणारे आपले मराठी गबरू तिथे जाऊन मंगळागौर किंवा गणपती उत्सवच करतातच ना? वर्षांला साधारण नवीन २५ परदेशी मित्र गुणिले आपल्या वास्तव्याची एकूण वर्षे हे गुणोत्तर जर फेसबुक प्रोफाइलवर दिसत असेल तर सगळे बरे चालले आहे असे समजावे. मराठी अनिवासी भारतीय नागरिक हा कधीतरी जागतिक नागरिक होईल अशी मला आशा आहे. कारण शेवटी हिंजेवाडी किंवा मगरपट्टय़ात तीन बेडरूम्सचा फ्लॅट घेणे, भारतीय संस्कृती उरापोटावर सांभाळणे, स्थानिक प्रगतीबद्दल तळतळाट व्यक्त करणे यापलीकडेही इंटरेस्टिंग काहीतरी कधीतरी त्याला सापडेलच ना!

मंदार  भारदे mandarbharde@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 1:30 am

Web Title: marathi nri
Next Stories
1 जिल्हाधिकारी  आणि  माकड
2 पेंग्विनचे मरण आणि बिचारे शासन!
3 घेतोस की नाही प्रेरणा?
Just Now!
X