‘पवारसाहेबांनी हायकमांडवर विश्वास टाकला तिथेच सारे चुकले. मी जर त्यांच्या जागी असतो तर हायकमांडवर कधीच विश्वास ठेवला नसता. जी हायकमांड यशवंतरावांची होऊ  शकली नाही, ती आपलीही होऊ शकणार नाही हे पवारसाहेबांना लक्षात यायला पाहिजे होते..’ माझ्या मित्राचा भाचा- ज्याला एफ. वाय. बी. कॉम.ला दोन विषयात एटीकेटी लागली होती, त्याने करीअर थोडे गांभीर्याने घ्यावे असे मार्गदर्शन मी त्याला करावे म्हणून ज्याला माझ्याकडे धाडला होता, त्याने पवारसाहेबांबद्दलचे त्याचे हे मत मला ऐकवले होते. आपल्याला दोन विषयांत एटीकेटी लागली आहे, तेव्हा पवारसाहेबांच्या राजकारणाचे चिंतन करण्यापेक्षा आपण दोन विषय लवकरात लवकर कसे सोडवायचे याबद्दल अधिक चिंतन करायला हवे, वगैरे सुमार भीती या मुलाला नव्हतीच. तो पुढे कितीतरी काळ मला पवारसाहेबांनी त्यांचे राजकारण आता इथून पुढे कशा प्रकारे करायला हवे याबद्दल त्याचे विचार ऐकवत राहिला. ‘अडवाणींनी जर योग्य माणसे आजूबाजूला ठेवली असती तर ते कधीच भारताचे पंतप्रधान झाले असते. पण नाही.. कोणाचे ऐकायचेच नाही. मग बसा आता विजनवासात. दुसरा काय इलाज आहे? जेव्हा आम्ही सांगत होतो तेव्हा त्यांनी ऐकले नाही..’ हे दिव्य उद्गार मी उबेरने चाललो होतो आणि ट्रॅफिकमध्ये फसलो होतो तेव्हा उबेरच्या चालकाने काढले होते. ‘उद्धव आणि राज यांच्यात सत्तावाटपाचा काय फॉम्र्युला बाळासाहेबांनी काढायला हवा होता?’ किंवा ‘अखेरच्या क्षणी कुणी युक्तिवाद केला, ज्यामुळे मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफीला राजी झाले..’ अशी कितीतरी गुपितं मला अशा लोकांकडून कळली आहेत- ज्यांचा तसं पाहिलं तर राजकारणाशी किंवा राजकारण्यांशी काहीही संबंध नाही.

मला नेहमीच राजकारण्यांबद्दल अतीव करुणा वाटत आलेली आहे. जगात करीअर करताना जे संघर्ष कोणाच्याही वाटय़ाला येत नाहीत ते राजकारण्यांच्या वाटय़ाला येतात. कधी आणि कोणत्या कारणाने त्यांचे करीअर अडचणीत येईल याचा कसलाच भरवसा नसतो. कांद्याचे भाव वाढले म्हणून ज्या राज्यात एकही कांदा पिकत नाही त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला खुर्ची गमवावी लागली होती. महाराष्ट्रातल्या लासलगावच्या शेतकऱ्यांनी कांदा कमी पिकवला किंवा व्यापाऱ्यांनी तो महाग विकला, तर त्याला दिल्लीचा मुख्यमंत्री काय करणार? पण लोकांनी आरडाओरडा केला म्हणून बिचाऱ्याला मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. भलतीचाच नवरा मेला म्हणून भलतीच सती गेली अशी वेळ राजकारण्यांवर अनेकदा येते. आणि अशा वेळा बहुतेकदा पाऊल न वाजवताच येतात. कोणाचा तरी बाप मेलेला असतो आणि आपल्यावर केस काढून फिरायची वेळ यावी, हेही नेहमीचंच. बरं, मला का केस काढायला लावले याची तक्रारही करता येत नाही. कधी कशाने पक्षशिस्तीचा भंग होईल, किंवा श्रेष्ठींच्या भावना दुखावतील, काहीच सांगता येत नाही. तिकीटवाटप जवळ आले की श्रेष्ठी जास्तच संवेदनशील होतात. एवढय़ा तेवढय़ाने त्यांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता वाढते. अशा साऱ्या गदारोळात आपलं राजकीय करीअर घडवावं लागतं. त्यामुळे मला नेहमी राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांबद्दल आदर वाटत आलेला आहे. जगातल्या सर्वात कठीण करीअरपैकी ते एक आहे असं मला वाटतं. ही माझी भावना आणखीनच पक्की झाली- जेव्हा माझ्या लक्षात आलं, की या करीअरमधल्या लोकांनी कसं असायला हवं याबद्दल अक्षरश: वाटेल त्या लोकांना मतं आहेत. उदा. मी हवाई वाहतूक क्षेत्रात आहे; तर हा धंदा कसा करायला हवा याबद्दल जे लोक मत व्यक्त करतात ते शक्यतो याच व्यवसायातले असतात. पण राजकारण हे एक असं करीअर आहे- ज्याबद्दल त्यात सक्रीय असलेल्या लोकांपेक्षा बाहेरचेच लोक जास्त चर्चा करतात. आपला काहीही संबंध नसताना लोक आणखी कोणत्या व्यवसायाबद्दल बोलतात हे शोधले तर लक्षात येते की हिंदी चित्रपट, क्रिकेट आणि आयुर्वेदिक उपचार ही आणखीन काही करीअर आहेत, ज्यात प्रत्यक्ष सक्रीय असणाऱ्यांपेक्षा अन्य लोकच स्वत:ला या क्षेत्रांतले तज्ज्ञ समजतात. परंतु या मंडळींचा सर्वाधिक सहभाग हा राजकीय विषयावर चर्चा करण्यात असतो.

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
vishwajeet kadam congress marathi news
विश्वजित कदम यांचे दबावाचे राजकारण यशस्वी होणार का ?
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?
arvind kejriwal
लालकिल्ला: सहानुभूतीच्या लाटेवर केजरीवाल?

मी एकदा महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याबरोबर प्रवास करीत होतो. मुळात सकाळपासूनच प्रत्येक गोष्टीला उशीर होत गेला होता. त्यामुळे ठरलेले कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याचे मोठेच दडपण त्या नेत्यावर होते. ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती तिथे वेळेवर आम्ही पोहोचू याची काहीच शक्यता नव्हती. त्यामुळे रस्त्यात मिळेल त्या ठिकाणी थांबून जेवण करायचे आणि वेळ वाचवायचा निर्णय त्यांनी घेतला. त्याप्रमाणे आम्ही हायवेवरच्या एका धाब्यावर थांबलो. ते नेताजी बऱ्यापैकी लोकप्रिय असल्याने ढाब्याच्या मालकासह सगळ्यांनीच नेताजींना ओळखले. ‘आम्ही घाईत आहोत, आम्हाला पटकन् जेवण बनवून दे..’ असे सांगून सर्वानी पटापट काम करावे म्हणून मोठा दबाव नेताजी आणि त्यांच्याबरोबरच्या आम्ही सगळ्यांनीच तिथल्या स्टाफवर आणला होता. त्याप्रमाणे अगदी पटकन् जेवण बनवून त्यांनी वाढले. आणि नेताजींनी जेवायला सुरुवात केली तसा एक वेटर त्यांच्याजवळ आला आणि ‘साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगायचीय,’ म्हणाला. ‘बोल ना.. काय म्हणतोस?’ विचारल्यावर तो म्हणाला, ‘साहेब, तुम्ही त्या पक्षातल्या अमुक एकाला फार लाइटली घेताय. तो कधी तुम्हाला अडचणीत आणेल तुम्हालाही कळणार नाही.’ राजकीय गणितं वेगाने करण्यात माहीर असा नेताजींचा लौकिक होता. त्यांनी पायाने मारलेली गाठ भल्याभल्यांना हातानेही सोडवता येत नाही, असे त्यांच्या राजकारणाबद्दल लोक बोलायचे. या कशाचेही दडपण वेटर-महोदयांना आले नाही. हॉटेल, गिऱ्हाईके, मेन्यू कार्ड, बिल, टीप यापलीकडे आपले विश्व नाही, याचा कोणताही गंड त्याला नेताजींना राजकारणाचा सल्ला देताना आला नव्हता. बिचारे नेताजी जेवता जेवता मान डोलवत राहिले. त्यांच्या परीने ‘मी विचार करतो, आता यापुढे जरा नीट लक्ष ठेवतो,’ असं काहीतरी स्पष्टीकरण देत राहिले आणि भराभरा जेवण संपवून गाडीत बसले. मला खात्री आहे, की त्या अमुक एकाला नेताजींनी दूर केला असता तर त्या वेटरने सर्वाना सांगितलं असतं की, त्याने सांगितलं म्हणून नेताजींनी ते केलं. नेताजींनी त्याला दूर केलं नसतं तर वेटर महोदय ‘नेताजींना राजकारण कसं कळत नाहीये..’ हे सांगत राहिले असते. कुणीही उठतो आणि तुम्ही जे प्रोफेशन पूर्णवेळ स्वीकारलंय त्याबद्दल तुम्हाला सल्ला द्यायला लागतो असं दुसऱ्या कोणत्याच प्रोफेशनबाबत होत नसेल.

तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात जा- तुम्हाला राजकारणाबद्दल चर्चा करताना लोक आढळतील. निवडणूक असो वा नसो; ते राजकीय चर्चा करताना दिसतात. मग ते त्यांच्या जिल्ह्य़ातल्या नेत्याबद्दल आडाखे बांधत असतील, ते राज्य सरकारबद्दल बोलत असतील, ते केंद्र सरकारच्या निर्णयांचे विश्लेषण करीत असतील, आणि आता तर गुगलोत्तर जगात ते कुठल्या तरी राज्यातल्या एखाद्या खेडय़ात बसून अमेरिका आणि कोरिया यांच्या संबंधांबद्दलही मत बाळगून असतील. ‘मला राजकारणातलं काही कळत नाही, एकही महत्त्वाचा राजकीय नेता मला ओळखतदेखील नाही, माझा या विषयावर अजिबात अभ्यास नाही..’ असं म्हणणारा एकही माणूस मला आजपर्यंत भेटलेला नाही. सामान्य कष्टकऱ्यापासून प्राध्यापकांपर्यंत तुम्ही कोणालाही चावी मारली की तो राजकीय मतं मांडायला सुरुवात करतो.

विकासाचा आणि लोकांच्या राजकीय चर्चेतील सहभागाचा थेट संबंध आहे. ज्या प्रदेशातील लोक राजकीयदृष्टय़ा सर्वाधिक साक्षर आणि सजग असतात, तो प्रदेश अतिशय मागास असतो असे नेहमीच आढळून येते. राजकीयदृष्टय़ा जे सगळ्यात कमी लाभार्थी असतात ते राजकारणावर बोलायला सर्वात जास्त उत्सुक कसे असतात, हा प्रश्न मला कायमच पडत आलेला आहे. बिहारी माणूस हा राजकीय आकलनाच्या बाबतीत सर्वात साक्षर माणूस समजला जातो. शेकडा नव्वद टक्के लोक राजकारणाबद्दल उत्सुकता बाळगत असतील तर तिथलं राजकारण किती उदात्त आणि विकासाभिमुख असायला हवं. साऱ्यांनाच जर हा विषय समजतो आहे आणि त्यांच्याकडे त्यासाठीचे तोडगे आहेत तर मग आपला देश कुठल्या कुठं पोहोचायला हवा. पण लाखो-करोडो लोक अब्जावधी प्रसंगी बोलत राहतात, तोडगे सुचवत राहतात, तरी या सगळ्यातून सरकारे बदलल्याचे दिसत; पण देश किंवा राज्य पुढे सरकल्याचं का दिसत नाही, हेच कळत नाही. या चर्चेतल्या ऊर्जेनं जे जे अमंगल, अभद्र आहे, ते ते पालापाचोळ्यासारखं उडून जायला हवं होतं. आणि जे जे भव्य, उदात्त आहे ते राजतख्तावर स्थापित व्हायला हवं होतं. इतक्या लोकांना जर इतकं सारं समजतं आहे तर त्यांच्या आकलनाचं दडपण व्यवस्थेवर कसं निर्माण होत नाही? तावातावाने राजकीय चर्चा करणारे लोक पाहिले की वाटतं, अरे, यांना तर सगळंच उलगडलं आहे. राजकीय अवकाशात आता एकही प्रश्न असा नाही- ज्याची उत्तरं या लोकांना माहीत नाहीत. पण तरीही गोष्टी बदलत का नाहीत? आणि आपल्या प्रोफेशनबद्दल अगदी बारीकसारीक तपशील जर इतक्या लोकांना माहीत असेल तर काम करताना त्याचं किती दडपण पुढाऱ्यांवर येत असेल? या विचारानंही माझी छाती दडपून जाते.

माझा दृढ विश्वास आहे की राजकीय मंडळींना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं आणि लोकांचं इतर कुणाहीपेक्षा जास्त चांगलं आकलन असतं. आपल्या विषयात लक्ष घालणारे, त्यावर चर्चा करणारे इतके सारे लोक असतानाही  पुढाऱ्यांना दडपण येत नाही कारण त्यांना बरोबर माहिती आहे, की राजकीय चर्चा ही या लोकांची शिळोप्याची करमणूक आहे. आपण राजकारणावर बडबड करतो आहोत म्हणजे आपल्याला देशाबद्दल आणि त्याच्या विकासाबद्दल देणंघेणं आहे असं इतरांनी समजावं असं त्यांना वाटतं. त्यांना बडबड करावीशी वाटते याचं कारण त्यामुळे त्यांना देशोन्नतीतलं कळतं, अशी शेखी लोकांमध्ये मिरवता येईल अशी त्यांना आशा असते. या प्रतिष्ठेपलीकडे त्यांना काहीही नकोय. अगदी देशोन्नतीसुद्धा. आता असल्या गणंगांना आणि त्यांच्या मतांना राजकारण हेच ज्यांचं मुख्य करीअर आहे त्यांनी महत्त्व का द्यावं? त्यांना हे पक्कं माहीत आहे, की हे लोक ना राजकारणात येणार आहेत, ना कोणत्या राजकीय कृतीत राजकारण्यांबरोबर सहभागी होणार आहेत. अगदी मतदानाच्या दिवशीसुद्धा हे लोक सकाळीच मेव्हण्याबरोबर लोणावळ्याला निघून जातील. अशांची राजकीय मतं गांभीर्यानं का घ्यायची?

राजकीय चर्चा ही प्रदूषणासारखी सर्वव्यापी आहे. सगळीकडे जाणवत तर राहते; पण सुधारण्याचा प्रयत्न मात्र कुठंच दिसत नाही.

– मंदार भारदे

mandarbharde@gmail.com