15 November 2019

News Flash

इस्टेट एजंट

मला मी आयुष्यात पहिल्यांदाच कोणते तरी घर पाहतो आहे की काय असे वाटले.

इस्टेट एजन्ट असणे हा आपल्या राज्याचा एक प्रमुख व्यवसाय आहे असे माझ्या लक्षात आले आहे

राज्याचा प्रमुख व्यवसाय म्हणून कोणत्या व्यवसायाला घोषित करायला हवे याबद्दल मी विचार करत बसलो होतो. वडापाव हे राज्याचे प्रमुख खाद्य आहे. हिंदीत बोलणे हे राज्याचे प्रमुख भय आहे. दुसऱ्याला सतत शिव्या घालत बसणे ही राज्याची प्रमुख करमणूक आहे. वरातीतले नागीणनृत्य हे प्रमुख नृत्य आहे. कोर्टाच्या खेटय़ा हे सर्वाधिक आवडीचे पर्यटन आहे. राजकारणाचा अगदी सखोल अभ्यास हे विद्वत्तेचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. अगदी तसेच इस्टेट एजन्ट असणे हा आपल्या राज्याचा एक प्रमुख व्यवसाय आहे असे माझ्या लक्षात आले आहे. सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत कोणतेही मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याच्या मिटलेल्या बाळमुठीत कोणाच्या तरी विकायला काढलेल्या जमिनीचा सातबाराच असतो याबद्दल माझ्या मनात कोणताही संशय नाही.

आपण सगळेच जण पोटापाण्यासाठी काही ना काही करत असतो. कोणी नोकरी करतो. कोणी धंदा करतो. पण एक इस्टेट एजन्ट जितका झोकून देऊन आपला व्यवसाय करत असतो, ती तडफ, ती निष्ठा आणि ते समर्पण अन्य कोणत्याही व्यवसायात दुर्दैवाने दिसून येत नाही. इस्टेट एजन्टची तडफ जर इतर सगळ्यांनीच आपापल्या व्यवसायात दाखवली तर आठवडाभरात भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही याची मला खात्री आहे.

एखाद्याला इस्टेट एजन्ट बनावेसे नक्की कशामुळे वाटते याचे मला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. म्हणजे एखाद्याला गणित आवडत असेल तर तो इंजिनीअर होतो, जीवशास्त्रवाला डॉक्टर, गाणीबिणी आवडणारा कलाकार होतो, लिहायला आवडत असेल तर लेखक आणि आकडेमोड आवडणारा सी. ए.! तसे काय आवडत असते म्हणून माणूस इस्टेट एजन्ट होतो, याची मला भारीच उत्सुकता आहे. इस्टेट एजन्ट या करीअरमध्ये काहीतरी फारच आकर्षक असावे म्हणून खूप मोठय़ा संख्येने लोक आज इस्टेट एजन्ट बनायच्या मागे लागलेत. संख्या म्हणून जर इस्टेट एजन्ट या व्यवसायाला कोणाची स्पर्धा असेल तर ती फक्त डी. एड. करणारे किंवा राज्यसेवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचीच आहे. नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांत तर तिथल्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोक इस्टेट एजन्टच्या व्यवसायात असावेत असा मला दाट संशय आहे.

मला व्यवसायानिमित्ताने अनेकदा वेगवेगळ्या शहरांत ऑफिस किंवा घर विकत किंवा भाडय़ाने घ्यायचा प्रसंग आलाय. त्यानिमित्ताने मला अनेक शहरांतल्या आणि काही वेळा वेगवेगळ्या देशांतल्या इस्टेट एजन्ट लोकांशी माझी ओळख झालीये. पण त्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या आत्मविश्वासाला आणि तडफेला जगात तोड नाही. जगातल्या सर्व व्यवसायांत तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे तीच वस्तू देण्याचा प्रघात आहे. पण लोकांना जे हवे आहे ते सोडून इतर सर्व काही त्यांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करायला एक धाडसच अंगी असावे लागते. म्हणजे मला एकदा मुंबईला कांदिवलीत दोन बेडरूमचे घर हवे होते म्हणून मी इस्टेट एजन्टकडे गेलो. तर तो दिवसभर मला मी त्यापेक्षा पाचगणीमध्ये वीस गुंठय़ाचे फार्महाऊस ताबडतोब घेणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगत होता. ‘कुठे दोन खोल्यांचे भुक्कड घर घेता साहेब? थोडी मोठी स्वप्ने बघायला शिका! आणि मोठय़ा फार्महाऊसमध्ये राहायला जा..’ म्हणून तो माझ्या मागे लागला होता. तुम्हाला फॅक्टरी टाकायची असेल तर ते दुकान दाखवतात. तुम्हाला दोन एकर जमीन घ्यायची असेल तर ते दोनशे एकर जमीन दाखवतात. आणि दोनशे एकर जमीन बघायचीय म्हणालात तर दोन खोल्यांचे घर दाखवतात. तुम्ही जे काही मागता आहात ते तुम्हाला दाखवणे बहुतेक त्यांना कमीपणाचे वाटत असावे असे मला वाटते. कोणत्याही अस्सल ड्रायव्हरला जसे रस्त्यात पत्ता विचारणे अवमानकारक वाटते, तसे कुठल्याही जातिवंत इस्टेट एजन्टला तुम्हाला जी जमीन बघायची आहे ती दाखवणे अवमानकारक वाटते. ड्रायव्हर जसा चुकीच्या रस्त्यावर चार वेळा चकरा मारत राहतो, पण रस्त्यावरच्याला पत्ता विचारत नाही, तसाच जातिवंत इस्टेट एजन्ट अगदीच परिस्थिती हाताबाहेर जात नाही तोपर्यंत तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचे घर दाखवत नाही. इस्टेट एजन्टच्या मदतीने घरांचा शोध ही मोठी तपश्चर्याच आहे. तपश्चर्येत जसे- कधी मोक्ष मिळेल, हा प्रश्न विचारायचा नसतो.. आपण तपश्चर्या फळाची अपेक्षा न धरता करत राहायची असते, तसेच इस्टेट एजन्टच्या मदतीने घराचा शोध फळाची अपेक्षा न धरता करत राहायचा असतो. जे घर तुम्हाला दाखवायला ते नेतात त्या घराची चावी नेमकी त्यांच्याकडे कधीच का नसते, हे मला पडलेले एक कोडे आहे. एकदा मला तीन बेडरूमचे घर बघायचे होते आणि नेहमीप्रमाणे त्याची चावी नव्हती, तर आमच्या या महाभागाने मला एक बेडरूमचे कोणते तरी घर उघडून दाखवले आणि म्हणाला, ‘तीन बेडरूमचे घर साधारण असेच आहे. तुम्हाला यावरून तीन बेडरूमच्या घराचा बरोबर अंदाज येईल.’ मी म्हणालो, ‘अरे, ज्या घराची चावी नाहीये, ते घर या इमारतीत कोणत्या मजल्यावर आहे? मी बाहेरून पाहून तरी अंदाज घेतो.’ तर तो म्हणाला, ‘साहेब, तुम्ही घर बघायचे म्हणून मागेच लागला होतात.. या घराची चावी होती म्हणून हे दाखवले. तुम्हाला जे घर द्यायचेय ते दुसऱ्या एरियात आहे.’

मला मी आयुष्यात पहिल्यांदाच कोणते तरी घर पाहतो आहे की काय असे वाटले. वास्तुशास्त्राप्रमाणे घर असेल तर दिशा फार महत्त्वाच्या, असे सांगतात. आणि दक्षिणमुखी असेल तर वास्तुशास्त्र थोतांड आहे, असे सांगतात. एकाने तर मला एकाच इमारतीत एकाच तासात एका घरात वास्तुशास्त्र महत्त्वाचे आणि दुसऱ्यात वास्तुशास्त्र थोतांड असे सांगितले होते. ‘घरमालकाचा माझ्यावर फार विश्वास आहे. माझ्याशिवाय तो त्याच्या घराचा व्यवहारच करणार नाही,’ असे सांगून मला घर पाहायला नेतात आणि मग तो प्रचंड विश्वासू मालक याला बघून दारच उघडत नाही. आणि घर बंद असेल तरी रिकाम्या घराची याला चावीच देत नाही.. ही काय भानगड आहे तेच मला कळत नाही. मी जे काही बघायला गेलो असेन- मग ते दोन खोल्यांचे छोटे घर असो किंवा दहा एकर जमीन- मला प्रत्येकाने असे सांगितले आहे, की ते असले किरकोळ व्यवहार करत नाहीत. पण आता मी आलोच आहे तर मला मदत म्हणून ते हा व्यवहार करताहेत. सकाळी असाच एकजण जागा घ्यायला आला होता तर त्याला त्यांनी हाकलून दिले होते. मी मनातल्या मनात मला त्याने हाकलून दिले नाही म्हणून आभार मानले. संभाषणाला सुरुवात केल्या केल्या समोरच्याचा कॉन्फिडन्स घालवायला सुरुवात करण्याच्या इस्टेट एजन्टच्या कौशल्याला मानलेच पाहिजे. मी कमिशनचे पैसे वेळेवर आणि ठरल्याप्रमाणे देईन, हा विश्वास माझ्या इस्टेट एजन्टला वाटावा म्हणून काय करायला हवे, हे मला कळतच नाही. प्रत्येक जण मला कोणतीही जागा दाखवण्यापूर्वी त्या अमुक अमुकने कसे कमिशनचे पैसे बुडवले आणि मग त्यांनी कसे दिवाळीच्या दिवशी त्याला घरी गाठले आणि पैसे वसूल केले, किंवा त्या अमुक तमुकला कसे त्यांनी ऑफिसच्या पार्किंगमधून उचलून आणले आणि कमिशनचे पैसे वसूल केले, त्याचे किस्से सांगतात.

जमिनीचे व्यवहार करणारे इस्टेट एजन्ट हा एक फार वरचा क्लास आहे. तुम्ही त्यांना कोणत्याही जमिनीबद्दल विचारणा करा; ते तुम्हाला त्या जमिनीची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी त्यांच्याचकडे आहे याची खात्री देतील. थोडा शोध घेतला तर पिंपरी-चिंचवडमध्ये तुम्हाला पार्लमेंट हाऊसचा सातबारा आणि त्याच्या विक्रीचे मुखत्यारपत्र घेऊन विकायला निघालेला एजन्ट सापडू शकेल. आणि एक जिल्हा ओलांडून त्याने नाशिकमधल्या त्याच्या दाजींकडे चौकशी केली तर व्हाइट हाऊसचाही सातबारा तो तुम्हाला देऊ  शकेल याची खात्री बाळगा. तुम्ही जमीन विकत घ्यायला निघालात तर त्या परिसरातल्या जमिनींचे भाव आकाशाला भिडलेले असतात. आणि विकायला निघालात तर जमिनींचे भाव पार पडलेले असतात. त्या परिसरातल्या गत दोनशे वर्षांतल्या सगळ्याच जमिनींचे व्यवहार किती रुपयाला झाले आणि किती रुपयाला फिस्कटले याची खडान्खडा माहिती त्यांना असते. प्रत्येक गावात त्यांचे चहाचे अड्डे असतात- जिथे माहितीची देवाणघेवाण होत असते. इथे जमीन विकत घेणाऱ्याला किंवा विकणाऱ्याला ‘पार्टी’ म्हणतात. ‘तुझी पार्टी तयार आहे का बघ. दोन खोक्याचा व्यवहार आहे..’ ‘आपली पार्टी जागची हलणार नाही..’ ‘तुझी पार्टी टाइमपास करतेय..’ असे सगळे उल्लेख! चहाचे कप रिचवत करोडोंच्या व्यवहाराच्या गप्पा तिथे चाललेल्या असतात. या अड्डय़ांवर व्यवहार कोण करतो माहीत नाही, पण व्यवहारांच्या चर्चा मात्र सगळेच जण करत असतात.

भारत-पाकिस्तानमधला सीमाप्रश्न हा मुळात राजकीय किंवा लष्करी प्रश्न नाही. हा प्रश्न मुळात जमिनीच्या बांधाचा प्रश्न आहे, हे आपण समजावून घेतले पाहिजे. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपल्या इस्टेट एजन्टच्या हातात हा प्रश्न दिला पाहिजे आणि त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. ते सरळ पाकिस्तानातल्या जमिनींचे गुंठे पाडतील आणि फार्महाऊसकरता म्हणून भारतातल्या लोकांना विकून टाकतील. पार कराचीपर्यंतच्या जमिनीच्या सातबारावर आपल्या लोकांची नावे परस्पर लावून टाकतील. आणि एकदा का सातबारावर नाव लागले, की सख्ख्या भावाला जमिनीत एक इंच इकडचे तिकडे हलू देत नाहीत आपले लोक! त्यांच्यापुढे पाकिस्तानचा काय पाडाव लागणार? ‘एनए केलेले प्लॉट विकणे आहे..’ असे बोर्ड नाही त्यांनी कराची, रावळपिंडी, लाहोरला लावले, तर नाव बदलून टाकीन!

मंदार भारदे mandarbharde@gmail.com 

First Published on August 27, 2017 3:33 am

Web Title: search for a home with the help of an estate agent
टॅग Estate Agent