News Flash

घेतोस की नाही प्रेरणा?

आयुष्य जगायला पैसा जोडावा लागतो. पण आयुष्य सुंदर करायला चार माणसंच जोडावी लागतात.

शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या दैनंदिन जीवनातल्या वागण्यातील विसंगतींची खिल्ली उडवत त्यावर मार्मिक बोट ठेवणारे, सरकार, प्रशासन, राजकीय पक्ष, शिक्षण, स्वयंसेवी संस्था, नाती, प्रतिष्ठेच्या कल्पना, तसेच तत्कालीन घटनांतले विरोधाभास हेरणारे, त्यातल्या चेष्टेच्या जागा शोधणारे मिश्कील, गमतीशीर सदर..

लोक मला चांगले आणि सत्शील जगायची प्रेरणा देणारे खूप मेसेज रोज पाठवतात. आधी जेव्हा रटर ला पैसे लागायचे तेव्हा तुलनेने प्रेरणा देणारे मेसेजेस् कमी यायचे. पण व्हाट्सअ‍ॅपमुळे मेसेजेस् फुकट झाल्यापासून त्यांचा भडिमार सुरू झाला आहे.

‘आयुष्य जगायला पैसा जोडावा लागतो. पण आयुष्य सुंदर करायला चार माणसंच जोडावी लागतात. आयुष्य नुसतंच जगू नका, तर ते सुंदर करा..’ हा मेसेज मला आमच्या लाँड्रीवाल्याने पाठवला.

‘जंगलात रोज सकाळ झाली की हरीण विचार करते की, मला खूप वेगात धावायचे आहे, नाहीतर सिंह मला खाऊन टाकेल. आणि रोज सकाळ झाली की सिंह विचार करतो की, मला हरणापेक्षा वेगात धावायचे आहे, नाहीतर मी उपाशी राहीन. तुम्ही हरीण असा किंवा सिंह; तुम्हाला रोज धावावेच लागेल. कारण संघर्षांशिवाय काहीच मिळत नाही..’ हा मेसेज मला एका सरकारी अधिकारी असलेल्या मित्राने पाठवला.

रोज हे असले मेसेज आले की मला खूप गोंधळून जायला होते. जेव्हा माझ्या अधिकारी मित्राने हा हरीण आणि सिंहाचा मेसेज पाठवला तेव्हा त्याच्या मनात माझ्याबद्दल नेमकी काय भावना असेल? म्हणजे तो सकाळी सकाळी उठला आणि त्याला माझी आठवण आली आणि त्याला वाटले की, आपला मित्र खूपच ऐदी आहे, रिकामा बसून खातो, खायला काळ आणि भुईला भार आहे; तेव्हा त्याला आपण चार समजुतीच्या गोष्टी सांगून प्रेरणा दिली नाही तर आपला मित्र अन्नान्न दशा होऊन मरून पडेल! तेव्हा आपण दात नंतर घासू, पण आधी त्याला प्रेरणा देऊ.. हे असलेच काहीतरी त्याच्या मनात असणार ना!!!

‘स्वत:ला तहान लागली तर मिनरल वॉटरची बाटली विकत घेता ना! मग उन्हाळ्यात पक्ष्यांना तहान लागली तर त्यांनी कुठून पाणी विकत घ्यायचे? घराच्या बाहेर रोज पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवत नसाल तर तुम्हाला माणूस म्हणून जगायचा काही अधिकार नाही..’ अशी धमकी एकाने दिली. व्हाट्सअ‍ॅप नव्हते तेव्हा करोडो पक्षी पाण्यावाचून मागची हजारो वर्षे तडफडून मेले असतील, या विचाराने मला गलबलून आले. रस्त्यावर उभा राहून पाणी पिताना डोक्यावरून एखादा कावळा उडत गेला तरी माझ्या मनात ‘हा तहानलेला तर नसेल?’ असले विचार येतात. आणि आता आपण पाणी प्यायचं की कावळ्याच्या मागे जाऊन त्याला पाणी पाजायचं, या विचाराने मी गोंधळून जातो.

या अफवा कोणी पसरवल्या असतील, की मी हळूहळू राष्ट्रद्रोही बनत चाललोय! शक्यता अशीही आहे, की मी त्याचबरोबर लंपटतेकडेही वाटचाल करतोय; वृद्ध लोकांबद्दल माझ्या मनात घृणा आहे आणि सीमेवर लढणारे सैनिक हे मला मस्करीचा विषय वाटतात; शिक्षक, स्वातंत्र्यसैनिक, गरिबीने गांजलेले लोक आणि भटकी जनावरे मला डोळ्यांसमोर नकोशी झालीत; मी पर्यावरणाप्रति बेफिकीर आहे आणि ग्लोबल वॉìमगमुळे पृथ्वीचे तापमान वाढले तर मला हवेच आहे; मी प्रचंड रासायनिक अन्न खातो आणि भरपूर अन्न वाया घालवतो; माझ्या गाडीच्या सायलेन्सरने जो धूर सोडला त्यामुळे ओझोनच्या थराला भगदाड पडले आणि त्यामुळे गाईच्या दुधातही आता रसायने सापडायला सुरुवात झाली आहे; मी विश्वासघातकी आहे, कपटी आहे, मला नात्यांची कदर नाही; काळा पैसा हेच माझ्या उपजीविकेचे साधन आहे; मी आळशी आहे; झाडे तोडतो; कर चुकवतो; दिलेला शब्द पाळत नाही; वडीलधाऱ्या माणसांना मानत नाही; मला देशाचा जराही अभिमान नाही; आणि जमलेच तर मी संधी साधून इथल्या वैभवशाली परंपरांचा अपमान करायचे षड्यंत्र रचतोय..

कोणी पसरवले असेल माझ्याबद्दल हे सारे? नाहीतर उगाचच मी असे वागू नये म्हणून मला प्रेरणा देणारे मेसेज लोक का पाठवतील, या विचाराने मला अस्वस्थता येते.

आलेला मेसेज आणि पाठवणारा यांचा मी एकत्र विचार करायला लागलो की मी घाबरून जातो. मनात विचार येतात की, आपला लाँड्रीवाला आपल्याला पैशांसाठी लोभी समजतो. ड्रायव्हर आपल्याला वादळात भरकटलेले तारू समजतो. गणिताच्या बाईंना नक्कीच वाटतेय, की आपण लाचारीने स्वाभिमान गहाण टाकलाय. आणि क्लायंटची खात्री पटलीये, की आता आपल्याला मोक्ष शक्यच नाही. लोक आपल्याबद्दल असा विचार करतात या कल्पनेने घाबरायला होते. एकाने मला प्रेरणेचा दैनंदिन रतीब घालताना लिहिले होते..

नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..

कोणाचा अपमान करू नका

आणि कोणाला कमीही लेखू नका..

तुम्ही खूप शक्तिशाली असाल,

पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे..

कोणी कितीही महान झाला असेल,

पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा

महान बनण्याचा क्षण देत नाही..

स्वत:वर कधीही अहंकार करू नकोस..

देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना

मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं..

आता तुम्ही एक प्रयोग करून बघा म्हणजे मला इतका राग का येतो, ते तुम्हाला समजेल. हा किंवा असले मेसेज ज्याने पाठवलेत त्याला डोळ्यांसमोर आणा. तो समोर उभा राहून हे सगळे आपल्याला ऐकवतोय अशी कल्पना करा. म्हणजे वरचे प्रेरक विचार एखादा जर तुमच्या दारात येऊन ऐकवायला लागला तर त्याचा अर्थ तिसऱ्याला काय लागेल याची कल्पना करा. तुम्ही पदाचा गैरवापर करता, लोकांचा पदोपदी अपमान करता, तुमचे काळाचे भान सुटलेय आणि तुम्ही शेफारलाय, अहंकार झालाय तुम्हाला. आणि याची जाणीव करून देणाऱ्याबरोबर तुम्हीही मातीत जाणार आहात याचा तुम्हाला विसर पडलाय! आता इतके सगळे जर एखादा आपल्या तोंडावर बोलला तर तुम्हाला वाटते तुम्ही ते अहिंसेने ऐकून घ्याल? मेसेज पाठवणारा समोर नसतो म्हणूनच तो हे असले सगळे बिनधास्त बोलायची हिंमत करत असावा.

जगातले लाखो लोक, पुराणपुरुष, साधू, योद्धे, नेते, लेखक, यशस्वी लोक गेल्या हजारो वर्षांपासून काही ना काही प्रेरणादायी बोलत आले आहेत. बोलोत बापडे.. आपल्याला काय त्याचे? हा माझा व्हाट्सअ‍ॅप येण्यापूर्वी या लोकांकडे बघायचा दृष्टिकोन होता. हे तेजस्वी लोक आणि त्यांचे प्रेरणादायी आयुष्य एका बाजूला आणि आपले जगणे एका बाजूला- असा सगळा मोकळाढाकळा मामला होता. उगा आपले जगणे वगैरे या लोकांसारखे तेजस्वी करायची तोशीश मी जिवाला कधीही लावून घेतली नाही. आता असेही काही लोक असतात, जे वेटलिफ्टिंग करतात, शे-दोनशे किलो उरापोटावर उचलतात. आता आपल्याला कधी ते दिसले तर आपण काय करतो? आपल्याला त्यांचे कौतुक वाटते. पण म्हणून लगेच प्रेरित होऊन आपणही छाताडावर वजन उचलायचेच असे कधी करतो का? जेव्हा व्हाट्सअ‍ॅप नव्हते त्या काळात कोणाच्या तरी तेजोमय, त्यागमय, करारी जीवनाबद्दल काही प्रेरणादायी किंवा उदात्त कानावर पडले तर माझा हिशोब सोपा होता. त्याला उचलू दे वजन; हे काही आपले काम नव्हे! हे रोज न चुकता सकाळी सकाळी प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या मेसेजेसमधून मला- बनतोस की नाही तेजपुंज? करतोस की नाही स्वार्थाचा त्याग? कुठवर आलेय तुझी मुक्ती? किती वेळ लागेल तुला परम करुणावान बनायला?- अशी सगळी घाई आणि गलबला ऐकायला येतो आणि मग मी गांजून जातो.

मी मला येणारे हे मेसेजेस थांबवायचा खूप प्रयत्न केला; पण लोक ऐकतच नाहीत.

एक काका मला रोज प्रेरणा द्यायचा प्रयत्न करायचे. कधी स्तोत्र, कधी दोहे, कधी देवदेवतांचे फोटो. किमान आठ-दहा पानांचे तरी संदेश पाठवायचे सकाळी सकाळी. आपण कसा घरातला वेगवेगळ्या ठिकाणचा कचरा एकत्र करून कुंडीत नेऊन टाकतो, तसे हे काका दिवसभर इकडून-तिकडून गोळा झालेले मेसेज माझ्या मोबाइलवर आणून टाकायचे आणि मोबाइलचा उकिरडा करायचे. मी खूप काळ दुर्लक्ष केले. त्यांना कधीही उत्तर दिले नाही. तरी त्यांचा प्रेरणा द्यायचा आवेग थांबेचना. शेवटी मी एकदा त्यांनी मला मेसेज पाठवल्यावर मी सकाळी सकाळी त्यांना २५ सनी लिओनीचे फोटो पाठवून दिले, तेव्हा कुठे त्यांनी मला फायनली ब्लॉक केले.

एकजण मला रोज सकाळी ५.२८ ला ‘जय जिनेंद्र’चा मेसेज पाठवतात. एकदाही ते वेळ चुकवत नाहीत. एकदा त्यांच्याकडे इन्कम टॅक्सची रात्री रेड पडली तरी सकाळी ५.२८ चा मला ‘जय जिनेंद्र’ करायचा नियम त्यांनी चुकवला नाही. त्यांच्याकडे रेड पडली आणि त्यांनी मला प्रेरणा देणारा मेसेज पाठवला नाही, तर या संधीचा गैरफायदा घेऊन मी पटकन् मधल्या काळात लबाड बनून घेईन अशी भीती त्यांना वाटली असावी. मला प्रेरणा मिळावी म्हणून लोक कोणत्या थराला जाऊन कष्ट घेतात हे पाहिले की मला तुडुंब कृतज्ञता दाटून येते.

युद्धाच्या ऐन प्रसंगी गोंधळलेल्या अर्जुनाला शेवटी कृष्णाला पुढे होऊन गीतारूपी प्रेरणा द्यावी लागली होती. रोजच्या धबडग्यात आपणही गोंधळून जातोच ना! महागाईच्या आणि जागतिक मंदीच्या काळात आता आपल्याला कृष्णाची चैन कशी परवडणार?

तेव्हा आता घ्या भागवून प्रेरणांच्या मेसेजवर!

मंदार  भारदे mandarbharde@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2017 1:01 am

Web Title: the daily life of urban middle class man
Next Stories
1 ‘क्या मेरी बात भरडे जी से हो रही है?
Just Now!
X