ध्रुवचं घर होतं पंचतारांकित वसाहतीत, दहाव्या मजल्यावर. तीन उत्तुंग इमारतींमध्ये मैदान, स्विमिंग पूल, क्लब हाऊस. सारं कसं अगदी पॉश.
सोसायटीत मुलंही भरपूर. मग सुटीत दिवसभर धुमाकूळ चाले. क्रिकेट, स्केटिंग, पोहणं, सायकलिंग.. सगळं सगळं खेळून दिवस कधी संपला कळत नसे.

ध्रुवला काटकसर वगैरे शब्द माहीत नव्हते. पण आई, बाबा, आजीला उधळपट्टी अजिबात आवडत नसे. ध्रुवला स्विमिंग पूलवर पाण्यात भरपूर खेळायला आवडत असेच; शिवाय घरी आल्यावर बाथरूममध्ये शॉवर, नळ दोन्ही सोडून पाण्यात उडय़ा मारायला फार आवडे. आजी रागवे. सायंकाळी घरी आल्यावर आई-बाबाही पाणी वाया घालवण्यावरून त्याला  दटावतही, पण त्याच्यात काही फरक पडत नव्हता. शिवाय दिवसभर तो ए.सी. लावून बसे.

आजी म्हणे, ‘जरा उकडलं तर काय होतं?’ ध्रुव फुरंगटून म्हणे, ‘मला नाही घाम आलेला आवडत. आणि ए.सी. कशाला आहे?’

आजी म्हणे, ‘ए.सी. रात्री थोडा वेळ लावावा. अरे, पाणी, वीज, अन्न जपून वापरायला हवं.’

पण ध्रुवच्या वागण्यात काही फरक पडत नसे.

अचानक एक दिवस आजीला गावाकडून फोन आला. तिला ताबडतोब गावी जावं लागणार होतं. मग ध्रुवला कुठं ठेवणार, म्हणून आई-बाबांनी त्यालाही आजीसोबत गावी पाठवून दिलं.

गावात भयंकर दुष्काळ होता. गावातल्या विहिरी कोरडय़ा पडल्या होत्या. रोज पहाटे माणसं नदीच्या पात्रात खड्डे खणून पाणी आणत. बरेचजण गाव सोडून गेले होते. काही माणसं दूरवरून पाणी आणत. कोणी शेतात राहायला गेले होते.

दुसऱ्या दिवशी ध्रुव सकाळी उठला तर घरात कोणीच नव्हतं. परसात एक माणूस काम करीत होता. ध्रुवने त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, ‘सगळेजण पाणी आणायला  नदीवर गेलेत.’ ध्रुव त्यांची वाट पाहत बसला. काका, काकू, त्यांचा मुलगा सचिन, आजी सारे एकेक घागर घेऊन आले. त्यांनी नदीकाठीच अंघोळी केल्या होत्या, कपडे धुतले होते.

काका म्हणाला, ‘अरे ध्रुव, किती उशिरा उठलास. आता तुला पाणी कसं मिळणार?’                                                                                                                                                          सचिन त्याला नदीवर घेऊन गेला व खड्डा खणून पाणी कसं काढायचं, ते त्यानं ध्रुवला दाखवलं. पण ध्रुवला जेमतेम हात-तोंड धुवायला पाणी मिळालं. म्हणून ते दोघे दूरच्या विहिरीवर गेले. पण तेथे खूप गर्दी होती. ध्रुवने कशीबशी अंघोळ केली.

घरी आल्यावर नाश्ता करून ध्रुवने टी.व्ही. सुरू केला, पण वीजच नव्हती. त्यानं सचिनला म्हटलं, ‘चल, आपण क्रिकेट खेळू.’

पण सचिनला त्याच्या आईनं बागेतलं काम दिलं होतं. मग सचिन आणि तो सकाळभर बागेत हिंडून काकूने सांगितलेली कामं करीत बसले. सारीच मुलं अंगण झाडणं, शेण्या थापणं, गुरांसाठी चारा आणणं अशी कामं करीत होती.

दुपारी जेवायला घरी आल्यावर ध्रुवला खूप उकडत होतं. पण अजून वीज आली नव्हती. त्यामुळे फॅन लावता येईना. वीज फक्त रात्री येई.

‘आपण नदीवर पोहायला जाऊ या का?’ त्यानं दुपारी सचिनला विचारलं.

पण नदीला पाणी नव्हतं. गावातील साऱ्या विहिरींमधलं पाणी तळाला लागलं होतं. त्यामुळे प्यायचं पाणीसुद्धा पुरवून वापरावं लागे.

ध्रुव अगदी रडकुंडीला आला. त्याला वाटलं ‘आपण शहरात एवढं पाणी वाया घालवतो आणि इथं माणसं, गुरं पाण्याच्या थेंबाथेंबासाठी धडपडत आहेत.’

आठ दिवसांत ध्रुव कंटाळला. आजीचंही काम झालं होतं.

तो आणि आजी मुंबईला आले. पण गावच्या अनुभवाने आता ध्रुव बदलला होता. आपणअसंच पाणी वाया घालवलं तर आपल्याकडेही दुष्काळ पडेल, या विचाराने तो पाणी जपून वापरू लागला. ऊठसूट ए.सी., फॅन लावणं बंद केलं. शिवाय आई, आजीला कामात मदत करू लागला.

त्याच्या आई-बाबांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. दुष्काळाच्या अनुभवाने आठ दिवसांत ध्रुव शहाणा झाला होता.