15 December 2018

News Flash

सर्फिग : टॅवी गेविन्सन : १५ वर्षांची वेब मॅगझिन एडिटर 

वयाच्या पंधराव्या वर्षी टॅवीने या मॅगझिनच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली होती,

प्रतिनिधिक छायाचित्र

टॅवी गेविन्सन अकरा वर्षांची होती- जेव्हा तिनं पहिल्यांदा ब्लॉगिंग सुरू केलं. तिला स्वत:ला फॅशन्स आणि स्टाईलिंग या विषयांची आवड होती म्हणून तिने ‘स्टाईल रूकी’ नावाचा ब्लॉग सुरू केला. मूळच्या शिकागोमधल्या टॅवीचे वडील इंग्रजीचे शिक्षक आहेत. २००८ साली जेव्हा तिचा ब्लॉग सुरू झाला तेव्हा ही अकरा वर्षांची चिमुरडी फॅशन्सबद्दल लिहायची. बोलायची. लेटेस्ट फॅशन ट्रेंड्सबद्दल मत मांडायची. थोडय़ाच दिवसांत तिच्या ब्लॉगवर येणाऱ्यांची संख्या तुफान वाढली. दररोज जवळपास ३०,००० लोक तिचा ब्लॉग वाचायला यायला लागले. या वाचकांमध्ये अर्थातच तिच्या वयाची अनेक मुलं-मुली होते. अनेक समवयीन मुली तिच्याशी स्वत:चे अनुभव शेअर करायला लागल्या. यातूनच तिला ऑनलाइन मॅगझिन सुरू करण्याची कल्पना सुचली आणि २०११ मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी तिने ‘रूकी’ (Rookie) या नावानेच मॅगझिन सुरू केलं. हे ऑनलाइन मॅगझिन टीनएजर मुलींसाठी आहे. यात अनेक मुली स्वत:चे अनुभव लिहितात, कविता पोस्ट करतात, विचार मांडतात. वयाच्या पंधराव्या वर्षी टॅवीने या मॅगझिनच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली होती, ती आजतागायत! ‘रूकी’ हे एक स्वतंत्र मासिक तर आहेच, पण त्याचबरोबर ऑनलाइन पुस्तकंही प्रकाशित केली जातात. या ऑनलाइन मासिकात अनेक विभाग आहेत. जसं की, कविता, पुस्तकं, अनुभव लिहिण्यासाठी विशेष जागा, कुणाला स्वत:ची चित्रं पोस्ट करायची असतील तर त्यासाठी सोय अशा अनेक गोष्टी आहेत. मैत्री, प्रेम, लैंगिकता या विषयांवरचे लेख आहेत. सिनेमा आणि टीव्हीवरच्या शोज्बद्दल लेखन आहे. विविध देशांतल्या मुली या वेब मॅगझिनवर लिहीत असतात. यात ‘यू आस्क्ड इट’ असा एक विभाग आहे. यात दर महिन्याला एक विषय असतो. त्या विषयावर मुलींना पडणाऱ्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न रूकीच्या वतीने केला जातो. टॅवीचा ब्लॉग आणि वेबसाइट दोन्ही वाचण्यासारखं आहे. मुळात तुमच्याच वयाच्या मुलींनी लिहिलेलं असल्याने तुम्हाला या सगळ्याशी नक्कीच कनेक्ट होता येईल. शिवाय मुलांनीही वाचायला हरकत नाही. वाढीच्या वयात जसं तुम्हाला स्वत:ला काय वाटतंय हे समजून घेणं आवश्यक असतं, तसंच आपल्या मैत्रिणी, बहीण, समवयीन मुली काय विचार करतात हेही समजून घेणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने मुलं आणि मुली सगळेच हे ऑनलाइन मासिक वाचू शकतात. २०१३ साली फोर्ब्सच्या सर्वोत्कृष्ट पहिल्या दहा वेबसाइट्समध्ये ‘रूकी’ची नोंद झाली होती. ऑनलाइन विश्वात असे अनेक प्रयोग चालू असतात. आपण मोबाइलच्या पलीकडे या खिडकीत डोकावायचं ठरवलं तर बघण्यासारख्या, वाचण्यासारख्या अनेक गोष्टी सापडतील. ऑनलाइन असणं असंही एन्जॉय करा!

रेड अलर्ट

इंटरनेटवर फिरत असताना अनेक ठिकाणी तुम्हाला चॅट बॉक्स दिसतील. तिथे लोक निरनिराळ्या विषयांवर चर्चा करत असतात. अगदी लहान मुलांच्या साइट्स असल्या तरी मोठय़ा माणसांचीही तिथे ये-जा चालू असते. त्यामुळे या चॅट बॉक्समध्ये जाताना, गप्पा मारताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी तुम्हाला आज सांगते.

१  एखाद्या व्यक्तीशी तुम्ही ऑनलाइन बोलत आहात आणि तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलताना एखादी गोष्ट खटकत असेल, किंवा त्या व्यक्तीची भाषा चुकीची वाटली तर लगेचच त्या चॅटिंग बॉक्समधून बाहेर पडा. चॅट बॉक्स बंद करणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे.

१  अनेकदा मुलांबाबत फसवणुकीच्या घटना घडतात. त्यांत असं दिसून आलं आहे की, समोरची फसवणारी व्यक्ती त्या मुलाला/ मुलीला त्याच्या कुटुंबाबद्दल सातत्याने प्रश्न विचारत असते. समजा, कुणी तुम्हाला सांगत असेल की, आई-बाबा, भावंडं, आजी-आजोबांपेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं महत्त्वाचं आहे, तर ती व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते, हे लक्षात ठेवा.

१  अनेक साइट्समध्ये इतरही अनेक साइट्सच्या लिंक्स येत असतात. काही वेळा जाहिराती असतात. अशा साइट्सच्या लिंक्सवर क्लिक करायचं नाही. त्या साइटबद्दल आई-बाबांना विचारून मग त्या साइटला भेट देणं कधीही चांगलं.

टॅवीचा ब्लॉग आणि रूकी वेबसाइट वाचण्यासाठी या लिंक्सचा वापर करा.

ब्लॉग : http://www.thestylerookie.com

वेब मॅगझिन : http://www.rookiemag.com

 muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

First Published on February 25, 2018 1:00 am

Web Title: 15 year old web magazine editor tavi gevinson