|| अलकनंदा पाध्ये

‘‘मल्हार, या शनिवारी-रविवारी तू, आई आणि मी एका ठिकाणी वेगळीच धम्माल करायला जाणार आहोत. आणि हो जय, तुझेही आई-बाबा येणार आहेत हं.’’ तिथेच खेळत असलेल्या जयला मल्हारच्या बाबांनी सांगितले.

‘‘पण कुठे जाणार ते तर सांगा! आणि फक्त दोनच दिवस? म्हणजे कुठल्या रिसॉर्टला की वॉटर पार्कला.’’

‘‘अं हं.. एकदम वेगळ्याच ठिकाणी.. आणि तिथली धम्माल पण वेगळीच असणारे हं.’’ आई हसत हसत म्हणाली.

‘‘आता मला प्लीज तुम्ही नीट सांगणार का आपण कुठे चाललोय आणि वेगळे काय करणार ते?’’ – इति मल्हार.

‘‘हे बघ, तू टी.व्ही.वर वॉटर कप स्पध्रेबद्दल-पाणी फाउंडेशनबद्दल ऐकलेयस का? थांब त्यापेक्षा मीच थोडक्यात सांगते. आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कमी पावसामुळे दुष्काळ पडतो. तिथल्या लोकांना पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. आपल्याकडे नळाला एक दिवस पाणी आले नाही तर केवढी गडबड होते की नाही सगळ्यांची! पण तिकडे तर महिनोन् महिने अशी पाणीटंचाई असते. फार त्रास होतो त्यांना. तो टाळण्यासाठी पाणी फाउंडेशनने अनेक दुष्काळी गावात काही योजना आखल्यात. तिथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी आधीपासून गावात मोकळ्या जागी मोठे चर म्हणजे खड्डे खणून ठेवायचे. म्हणजे त्यात पावसाळ्यात पावसाचे पाणी जिरेल. ज्याचा त्या गावाला नंतर उपयोग होईल.’’ आईने मुलांना समजावून सांगितलं.

‘‘पण मग आपण तिथे जाऊन काय करणार?’’ मल्हारने गोंधळून विचारले.

‘‘आपण श्रमदान करणार! म्हणजे दोन दिवस तिथे जाऊन फाउंडेशनची माणसे आपल्याला जे काम सांगतील ते करणार. अरे, हे एकटय़ा दुकटय़ाचे काम नाही. शाळेत तुम्हाला पर्यावरण रक्षणाबद्दल सांगतात ना. ‘पाणी वाचवा.. झाडे लावा.. जगवा..’ तेच काम आपण करणार आहोत. पाणीटंचाईचा त्रास टाळण्यासाठी बऱ्याच गावांतून अशी कामे करायची आहेत, म्हणून तर त्यांनी सर्वाना मदतीसाठी बोलावलेय. मी आणि आई दोघे नक्की जाणार आहोत. तुम्ही काय करणार? बोला. पण मला वाटते तुम्हीही या आमच्याबरोबर. जरा वेगळा अनुभव मिळेल.’’ – बाबा म्हणाले.

‘‘हो हो आम्हीपण येणार.’’ मल्हार आणि जय एकसुरात ओरडले.

‘‘ए, पण आधीच सांगते. तिथे आपण श्रमदान करायला जातोय, आराम करायला नाही. तिथे उन्हातान्हात काम करावे लागेल. पंखे, ए.सी. वगरे लाड नसणार कबूल आहे ना?’’आईने बजावल्यावरही दोघांनी होकाराच्या माना डोलावल्या.

ठरल्या दिवशी भरदुपारी जय आणि मल्हार आई-बाबा आणि त्यांची मित्रमंडळी सगळे मिळून ३० जणांचा ग्रुप चांदवड गावात पोचला तेव्हा तिथे खूप कडक उन्हाळा जाणवत होता. गाडीतून उतरल्याबरोबर गावातले सरपंच आणि काही माणसांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. मल्हारला एकदम त्याच्या वाढदिवसाची आठवण आली. त्याची आईही त्याचे असेच औक्षण करते. जय आणि मल्हार त्यांच्या ग्रुपमध्ये सर्वात लहान असल्याने प्रत्येकजण त्यांचे विशेष कौतुक करत होता. तिथून जवळच्याच एका शाळेत त्यांची राहण्याची, झोपण्याची सोय केली होती. गावातली शाळा साधीच, पण छान स्वच्छ होती. शाळेपुढे मोठ्ठे मदान होते. गावकऱ्यांनी दिलेले थंडगार सरबत प्यायल्यावर सर्वाना एकदम ताजेतवाने वाटले. मग तिथल्या एका काकांनी पाणी फाउंडेशनबद्दल माहिती सांगितली. तसेच सर्वानी कामाची कल्पना दिली.

‘‘काका, आता आम्हाला कुठे काम करायचेय?’’ जयने उत्साहाने विचारले.

‘‘अरे हो हो.. तुला तर खूपच घाई झालेली दिसतेय. हे बघ आता खूप ऊन आहे ना म्हणून तिथे जायचे नाही. आपले काम फक्त सकाळी ७ ते १०.३० पर्यंत आणि संध्याकाळी ४ ते ७ पर्यंतच चालते. तेव्हा आता आधी तुम्ही पोटभर जेवून घ्या. म्हणजे काम करायला ताकद येईल. हो की नाही?’’ काकांनी समजावले.

तिथल्या गावकऱ्यांनी ग्रुपला मस्त गरमागरम जेवण आग्रह करून वाढले. मल्हार आणि जयला मात्र कधी एकदा कामाच्या ठिकाणी पोचतो असे झाले होते. थोडय़ा वेळाने सगळ्यांना कामाच्या ठिकाणी न्यायला २-३ ट्रॅक्टर्स आले. टी.व्ही.वर पाहिलेल्या ट्रॅक्टरमधून प्रवासाचा अनुभव दोघांनाही सॉलीड वाटला. एका मोठय़ा माळरानावर सगळे पोचले तेव्हा त्यांच्यासारखीच खूप माणसे तिथे श्रमदान करायला आलेली दिसत होती. जमिनीवर ठिकठिकाणी पांढऱ्या चुन्याने लांबलचक आयत काढले होते. एका आयताशी थांबून ५-६ जणांचा एक असे ग्रुप तयार केले. जय, मल्हार एकाच ग्रुपमध्ये होते. प्रत्येक ग्रुपसाठी कुदळ, फावडी आणि माती ठेवण्यासाठी पाटय़ा असा सेट ठेवला होता. गावातले काही कार्यकत्रेही त्यांच्यासोबत होते. सुरुवातीला त्यांनी कशा पद्धतीने कुदळीने खणायचे ते दाखवून आयतात खड्डा खणायला सुरुवात केली. नंतर बाबा आणि काका मंडळींनीही कामाला सुरुवात केली. थोडे खणून झाल्यावर काहीजण ती माती फावडय़ाने पाटीत भरू लागले. मग आई आणि बाकीच्या मावशा असा जय, मल्हारचा ग्रुप पाटीतील माती पांढय़ा हद्दीच्या कडेने म्हणजे आयताच्या बाजूने ओतायचे काम करायचे. थोडक्यात, खणलेल्या खड्डय़ाला वरून बांध घालायचे काम करत होते. जय, मल्हारच काय, पण आई-बाबा आणि कुणालाच अशा कामाची कधीच सवय नव्हती. सगळेचजण घामाघूम झाले. दुपारी अंगात घातलेले सगळ्यांचे पांढरे टी-शर्ट, पँट आणि टोपीसुद्धा मातीच्या रंगाचे झाले होते. संध्याकाळ होत आली तरी उन्हाच्या झळा जाणवत होत्या. इकडे-तिकडे फिरताना मधूनच आजूबाजूच्या झुडपाचे काटे सांभाळावे लागत होते. पण तरीही आजूबाजूला त्यांच्यासारखीच काम करणारी माणसे पाहून सगळ्यांना हुरूप चढला होता.

रात्रीच्या चविष्ट जेवणानंतर त्यांच्यासारखाच श्रमदानाला आलेल्या ग्रुपने तिथे ‘पाणी वाचवा, झाडे जगवा’ असा संदेश देणारे छोटेसे नाटक सादर केले. ते पाहून जय-मल्हारनेही पाणी वाचवा असा संदेश देणारे शाळेत शिकवलेले गाणे म्हणून दाखवले. उशीर झाला होता तरी कुणालाच झोप येत नव्हती. उलट खूप मज्जा करावीशी वाटत होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दिलेले काम करायला जायचे होते म्हणून सगळे झोपायला गेले. जय-मल्हारची जोडगोळी खूप उशिरापर्यंत गप्पा मारत होती.

पहाटे दोघेही आईच्या एका हाकेने उठून झटकन् तयार झाले आणि ७ वाजता सगळेजण माळावर पोचलेसुद्धा! आजूबाजूला पाहिले तर कालच्यासारखीच ठिकठिकाणी श्रमदानासाठी माणसांची गर्दी दिसत होती. पुन्हा कालचेच अर्धवट राहिलेले काम पूर्ण करायला त्यांच्या ग्रुपने सुरुवात केली. तासाभराने गावातून वडा-पावचा नाश्ता आला तो खाऊन सगळेजण पुन्हा अधिक जोमाने कामाला लागले. खड्डा पुरेशा उंचीचा खणला गेल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितल्यावर त्यांनी काम थांबवले. कालपासून मेहनत करून खणलेल्या खड्डय़ाशेजारी उभे राहून बाबांनी सर्व ग्रुपचा सेल्फी काढला. त्यातले सगळ्यांचे धुळीने माखलेले चेहरे ओळखणे कठीण झाले.

‘‘बाळांनो, तुम्ही सर्वानी किती मोठे काम केलेय माहितेय का तुम्हाला?’’ तिथल्या काकांनी जय-मल्हारला विचारले.

दोघांनी नकाराच्या माना डोलावल्यावर ‘‘अरे, तुम्ही हा खड्डा खणलाय ना त्यात पाऊस पडल्यावर एकावेळी पाच हजार लिटर पाणी साठेल. आहात कुठे?’’ तुमच्यासारख्या अशा हजारो माणसांनी या कामात भाग घेतल्यामुळे आता या गावांचा पाण्याचा त्रास खूप कमी होणार आहे,’’ असं म्हणत काकांनी हसत हसत दोघांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. तिथून सगळेजण शाळेत येऊन अंघोळी करून जेवून निघाले तेव्हा गावच्या सरपंचांनी सर्वाचे पुन्हा एकदा आभार मानले. जय आणि मल्हार या छोटय़ा स्वयंसेवकांचे विशेष

कौतुक केल्यामुळे दोघांना लाजल्यासारखे वाटत होते.

मुंबईकडे परत येताना शेजारी बसलेल्या जयला मल्हार म्हणाला, ‘‘जय, दर मे महिन्यात आपण कुठे कुठे ट्रिपला जातो. मजा करतो, पण यावेळी सुटीत आपण दुसऱ्या कुणासाठी काहीतरी छान काम केले म्हणून भारी वाटतेय ना?’’

‘‘हो रे. मला तर कधी एकदा शाळेतल्या मित्र-मत्रिणींना हे सगळे सांगतोय असे झालेय.’’ जयने त्याला सहमती दर्शविली.

alaknanda263@yahoo.com