12 December 2017

News Flash

जलपरीच्या राज्यात : आहे विषारी तरी..

समुद्री साप प्रामुख्याने किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्यामध्ये आढळतात.

ऋषिकेश चव्हाण | Updated: August 6, 2017 2:59 AM

भारतामध्ये अंदमान बेटांजवळ टिपलेलं समुद्री सापाचं छायाचित्र.

माझ्या बालवाचकांनो, जमिनीप्रमाणेच समुद्रातही सापांच्या प्रजाती आढळतात. समुद्री सापांचं शरीर माशांसारखं उभं, चपटं असतं आणि शेपूट वल्ह्यसारखी असते. हे साप समुद्री जीवनाकरिता अनुकूल झालेले असतात. समुद्री पाण्यातील खारेपणाचा आणि त्यायोगे शरीरात जमणाऱ्या मिठाचा बंदोबस्त करण्याकरिता यांना मीठ-ग्रंथी असतात, यांची उजवी फुप्फुसं जास्त प्रसरण पावण्यायोग्य असल्याने प्राणवायूचा पुरवठा अधिक चांगला होतोच; शिवाय अधिकाधिक काळापर्यंत या सापांना पाण्याखाली राहण्याची क्षमताही या फुप्फुसांमुळे मिळते. तर या सापांची जाड त्वचा समुद्रातील खाऱ्या, क्षारयुक्त पाण्याचा त्वचेवाटे शरीरात प्रवेश होण्यापासून संरक्षण करते.

समुद्री साप मासे खात असले तरी ईल हे त्यांचं सर्वात प्रिय खाद्य आहे. शिवाय समुद्री अपृष्ठवंशीय प्राण्यांवरदेखील हे साप ताव मारतात. जमिनीवरील अजगरासारख्या सापांप्रमाणेच समुद्री सापही त्यांच्या आकारापेक्षा खूप मोठा प्राणी गिळू शकतात. काही सर्वात लांब समुद्री सापांचं डोकं तर फारच लहान असल्याचं आढळतं. इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा अनोखी गोष्ट म्हणजे अनेक समुद्री साप पिलांना जन्म देतात, अंडी घालत नाहीत. शिवाय चिमुकल्या, नवजात समुद्री सापांची काळजी आई घेत नाही. विशाल समुद्रात स्वत:च ते आपली काळजी घेतात.

समुद्री साप प्रामुख्याने किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्यामध्ये आढळतात. दगडांच्या कपारींमध्ये, पाणवनस्पतींच्या मुळांशी आणि जिथे त्यांना सुरक्षित जागा मिळेल अशा जागी समुद्री साप आढळतात. जगभरात आढळणाऱ्या ६० समुद्री सापांच्या प्रजातींपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २० प्रजाती भारतात आढळतात. सारेच समुद्री साप भयंकर विषारी असले तरी खूपच शामळू असतात, त्यामुळेच या सापांना डिवचल्याशिवाय ते सहसा चावत नाहीत.

शब्दांकन : श्रीपाद – rushikesh@wctindia.org

First Published on August 6, 2017 2:59 am

Web Title: amazing facts about sea snakes
टॅग Sea Snakes