21 March 2019

News Flash

माझी ताडोबा सफारी

मी जिथे होमी भाभा परीक्षेसाठी क्लासला जायचो तिथे एक दिवस वझे सरांनी ताडोबा सफारीची सूचना दिली.

ताडोबा सफारी

नंदन काल्रे

मी जिथे होमी भाभा परीक्षेसाठी क्लासला जायचो तिथे एक दिवस वझे सरांनी ताडोबा सफारीची सूचना दिली. सर अशा सफारी नेतात हे माहीत नव्हतं. पण हे ऐकल्यावर आपण नक्की जायचंच असं ठरवलं. आई-बाबाही तयार झाले. ५ मे ते १० मे अशी टूर होती. मी, आई, बाबा, आजी, आजोबा व इतर सगळे मिळून ४० जण होतो.

ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यत आहे. आम्ही सेवाग्राम एक्स्प्रेसने सुमारे १६ तासांचा प्रवास करून तिथे पोहोचलो. ळ्रॠी१ ँेी २३ं८ १ी२१३ मध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती. ४० जणांमध्ये आम्ही १० मुलं होतो. त्यामुळे अजूनच धमाल! त्यातून वाघाच्याच राज्यात वाघ बघायला मिळणार म्हणून उत्सुकताही होती. पण काहीजणांनी उगाचच ‘वाघ दिसतील असं काही नाही,’ हे सांगून जरा निराश केलं होतं. पण तसं झालं नाही. उन्हाळ्यात वाघ दिसतातच.

जंगलात दोन झोन असतात. एक बफर झोन- जिथे लोकवस्ती असू शकते. दुसरा कोअर झोन- जिथे फक्त प्राणीच असतात. ताडोबा जंगल ६२५ चौ. किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. त्यापैकी २० टक्केच पाहता येते.

जंगलात सफारी करण्यासाठी जिप्सीतून (उघडी जीपच म्हणा ना!) जावे लागते. एका जिप्सीत आम्ही गाईड आणि ड्रायव्हर धरून ८ जण होतो. उन्हापासून (तापमान ४५ डिग्री होते) वाचण्यासाठी आम्ही  स्कार्फ, टोपी, गॉगल असा जामानिमा केला होता. आणि बरोबर भरपूर पाणी तसेच कोकम सरबत, ग्लुकॉन- डी अशी एनर्जी ड्रिंक्स घेतली होती.

पहिली सफारी बफर झोनमध्ये होती. गाईडने एका कृत्रिम पाणवठय़ावर जिप्सी नेली. आणि आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. लारा वाघीण आणि तिची तीन पिल्लं पाण्यात बसून मस्त खेळत होती. त्यांच्यासाठी जणू वॉटर पार्क होतं ते. जिप्सीतील लोक स्तब्ध होऊन तो देखावा पाहात होते आणि धडाधड फोटो काढत होते. उन्हाळ्यात पाणी आटते, त्यामुळे जंगलात असे कृत्रिम पाणवठे केलेले आहेत. वाघाला ऊन सहन होत नाही म्हणून तो पाण्यात येऊन बसतो. त्यामुळे हमखास सायटिंग होणार म्हणून गाईड पहिल्यांदा इथेच घेऊन आला होता. जिप्सीत अजिबात बोलायचे नसते. बोलले तर प्राणी निघून जातात.

नंतर आम्ही दुसरे प्राणी बघण्यासाठी निघालो तेव्हा चढावर आमची जिप्सी बंद पडली. आई, आजी आणि आजोबा खूप घाबरले. पण मला अजिबात भीती वाटली नाही. नंतर दुसरी जिप्सी आली आणि आम्ही त्यातून गेलो. ताडोबा लेकजवळ गेलो. तिथे आम्हाला मगर, रानडुकरे, गवा (कळपच होता) आणि जंगली कुत्र्यांनी शिकार केलेले सांबराचे अवशेष दिसले. जंगली कुत्रे आपल्या भक्ष्याला न मारताच फाडून खातात. खूप भयंकर असतात. आमच्या गाडीसमोर एक गवा आला. तेव्हा आमचा गाईड म्हणाला, ‘हा गवा आपली जिप्सीसुद्धा उलटवू शकतो.’ तेव्हा मात्र मला भीती वाटली.

सात वाजता रिसॉर्टवर परत आलो. सरांनी काही अ‍ॅक्टिव्हिटीज् घेतल्या. अ‍ॅड मेकिंग, वर्तमानपत्र, सुतळी, चिंध्या वापरून एखाद्या सेलिब्रिटीचा गेटअप करणे, ट्रेजर हंट. आम्हाला खूप मजा आली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता कोअर झोनमध्ये सफारी होती. तिथे आम्ही खूप सुंदर पक्षी (नवरंग, स्वर्गीय नर्तक, नीलपंखी, खंडय़ा, बुलबुल, सुतारपक्षी, घुबड, टिटवी, सातभाई, उघडय़ा चोचीचा करकोचा, सूर्यपक्षी, इंडियन रोलर, टायगर डेंटिस्ट- हा वाघाच्या दातात अडकलेलं मांस खातो.) आणि मटकासुर नावाचा वाघ बघितला. तसेच अर्जुनाच्या झाडावर अस्वलाच्या नखांचे ओरखडे बघितले. तेंदूची फळे खाल्ली. जंगली चिक्कू म्हणता येईल त्यांना. बेल, पळस, घोस्ट ट्री, ऐन, साग, इ. झाडे पाहिली.

दुसऱ्या दिवशी दुपारच्या सफरीत शर्मिला वाघीण आणि तिची तीन पिल्लं बघितली. एक पिल्लू तर जिप्सीच्या अगदी जवळून गेलं. थोडं पुढे गेल्यावर छोटय़ा मधूचा बछडा दिसला. बाबांनी मला वेगळा कॅमेरा दिला होता. त्याने मी भरपूर फोटो काढले.

प्रत्येक सफारीच्या आधी सर आम्हाला जंगलात काय काय बघता येईल ते सांगायचे; त्यामुळे आम्ही गाईडच्या मदतीने केवळ वाघच नाही तर पक्षी, झाडे, इ. बघू शकलो. आम्ही वाघ आणि त्यांची पिल्लं मिळून ११ वाघ, नीलगाय, भरपूर सांबर, असंख्य चितळ, चौशिंगा, बार्किंग डियर (भेकड), जंगली कुत्रे, रानडुकरे, मगर, इ. प्राणी आणि खूप वेगवेगळे पक्षी बघितले. खूप मजा आली. अशा जंगल सफारींना जायला हवं. त्यामुळे नवीन प्राणी- पक्षी बघायला मिळतात. त्यांच्याबद्दल माहिती मिळते. आणि सायन्सच्या तासाला उत्तरं देऊन सरांची शाबासकी मिळवता येते. आता मी ठरवलंय की, सरांबरोबर अशा जंगल सफारी करणार. ताडोबालाही नक्की पुन्हा भेट देणार.

(७ वी, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, डोंबिवली)

First Published on May 27, 2018 1:02 am

Web Title: an experience of full of wild life in tadoba jungle safari