News Flash

जीवचित्र : भिंत उंच, उंट उंच, उंच चित्रं!

या भित्तिचित्रात आढळणारे प्रमुख प्राणी म्हणजे उंट, हत्ती, घोडे.. तेही मस्त सजवलेले.

जीवचित्र : भिंत उंच, उंट उंच, उंच चित्रं!

भारतीय चित्रकलेत दोन मुख्य भाग आहेत. एक म्हणजे, लघुचित्र आणि दुसरं भित्तिचित्र!  लहान आकारावर काढली गेली ती लघुचित्रं. आणि लेणी, मंदिर, घर यांच्या भिंतीवर काढली गेली ती भित्तिचित्रं. आदी माणसाने पहिल्यांदा गुहेच्या भिंतीवरच चित्रं काढली. आजही महाराष्ट्रातील कित्येक दगडी बांधकामं असणाऱ्या मंदिरांच्या छतावर काळ्या रेषेची (आउटलाइन ) चित्रं असतात. पण बहुतेकदा ती माणसांची किंवा देवांची असतात.

दक्षिण भारतात मंदिरातील छतावर रंगीत मूर्त्यांची खूप गर्दी असते. तसेच जुन्या मंदिरांत स्तंभावर उठावशिल्प असतात. पण त्यातही यक्ष-यक्षिणी जास्त असतात. अशीच काही शिल्पचित्रं आपल्या अजंठा-वेरुळ येथील लेण्यांत पाहायला मिळतील. ही सर्व भित्तिचित्रं बरं का! पण आज आपण पाहणार आहोत ते ‘प्राणी’ मात्र राजस्थान कलेमधले आहे.

मागील लेखात पाहिलेली लघुचित्र शैलीदेखील राजस्थान या प्रदेशात जास्त खुलली. तिकडचे राजे- राजपूतांची सुंदरता त्यांच्या शहरातदेखील दिसून येते. शहरातील सरसकट सर्व दुकानं व घरांना गुलाबी रंग देण्याचा किंवा निळा रंग देण्याचा वेगळा विचार राजस्थानमध्ये झालेला दिसतो. अशाच शेखावती भागातील राजपूत राजा रावशेखा या कलाप्रेमी राजाकडून छत, भिंती, खांब (पिलर्स) रंगविण्याची सुरुवात झाली. मग ती त्यांच्या पदरी असलेल्या श्रीमंत जहागीरदार, सरदार, कारकून यांनी आपापल्या घरी नेली. तुम्ही घरी पाहतच असाल की, मालिकेतील अभिनेत्री जसे दागिने, साडय़ा वापरतात, डिट्टो तसेच आपल्या घरीदेखील आई-मावशी-बहिणीकडून लागलीच आणले जातात.

या भित्तिचित्रात आढळणारे प्रमुख प्राणी म्हणजे उंट, हत्ती, घोडे.. तेही मस्त सजवलेले.  आता राजस्थान म्हटलं की उंट असणारच! आणि हौशी राजांचे राजवाडे म्हटलं की हत्ती- अंबारी असणारच! पदरी असलेले राजेशाही घोडे आलेच. राजस्थानमधील राजांच्या वंशजांना आजही घोडय़ांचे आकर्षण आहे. मग भित्तिचित्रात याचा प्रत्यय येतो. आधीचे चित्रकार यासाठी नैसर्गिक रंग वापरायचे, पण नंतर काळानुसार बदललेलं सिंथेटिक रंग आले. यातही निळा, लाल रंग जास्त दिसतो. सोबतची ही चित्रं पाहा. चटकदार रंगात रंगलेली भिंत, तर ही भित्तिचित्रं काढायची स्टाइल वेगळी- त्याला फ्रेस्को असं नाव. फ्रेस्को म्हणजे भिंतीला गिलावा देतानाच चित्र भरत जायचं. या पद्धतीमुळे भिंतीवरील चित्रं खूप काळ टिकतात. (इतक्या वर्षांनंतरही अजंठा लेण्यातील चित्रं याच पद्धतीमुळे आपण पाहू शकतो.)

भिंतीवर गवंडी कामगार व चित्रकार असे एकत्र काम करायचे. एकत्र काम करायचं म्हणजे त्यांच्यात जाम भांडण होत असेल नाही! आदिमानवापासून चालत आलेली परंपरा आजची मुलंदेखील घरातील भिंतींवर चित्र काढून टिकवून ठेवतात व मग ओरडा खातात. आणि बिनधास्त मुले शाळेतल्या भिंतीवरदेखील चित्रं काढतात.

मला कधी कधी प्रश्न पडतो की आदिमानवाला त्याच्या आई-वडिलांकडून ओरडा मिळाला असेल का? की लाकडी सोटा पाठीत बसला असेल? तुम्हला काय वाटतं!

पण आजचा सराव म्हणजे, आपल्या घरातील तुमच्या खोलीतील कोपऱ्यावर, दरवाजावर, स्वतंत्र खोली नसेल तर मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूला तुमच्या आवडत्या प्राण्याचे चित्र काढा. हो, उगाच हत्ती-उंट वगैरे काढत बसू नका. महाराष्ट्रातले प्राणी आठवा आणि त्याचेच चित्र काढून रंगवा. चित्र पूर्ण काढून झाल्यावरच ‘चांगला मूड’ बघून आई-वडिलांना सांगा. नाहीतर.. हुश्शार मुलांना समजलं असेलच!

श्रीनिवास आगवणे shreeniwas@chitrapatang.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2017 1:45 am

Web Title: animal drawing on wall wall drawing ideas wall paintings
Next Stories
1 जाहिरातीमधली आई
2 जलपरीच्या राज्यात ; रंगीबेरंगी प्रवाळभित्ती
3 कोडिंगचं कोडं : व्हेरिएबल डिक्लरेशन
Just Now!
X