29 October 2020

News Flash

बिस्वाचा डब्बू

टऽण टऽण घंटा झाली तसे जोरात आवाज करत पोरं शाळेबाहेर पळाली. पाचवीतला बिस्वा मात्र फळ्याजवळ उभा राहून गणितं सोडवत होता.

(संग्रहित छायाचित्र)

अपर्णा देशपांडे

adaparnadeshpande@gmail.com

टऽण टऽण घंटा झाली तसे जोरात आवाज करत पोरं शाळेबाहेर पळाली. पाचवीतला बिस्वा मात्र फळ्याजवळ उभा राहून गणितं सोडवत होता.

‘‘ए बिस्वा, घरी नाही जायचं का?’’ यतीन दास सर विचारत होते. बिस्वा मात्र आपल्याच नादात होता.

सरांनी आत डोकावून पाहिलं. पाचवीतला मुलगा नववीच्या पुस्तकातील गणितं सोडवत होता. बिस्वाच्या तल्लख बुद्धीची सरांना कल्पना होती, पण आसाममधील चंगसारी या खेडय़ात फक्त सातवीपर्यंतचीच शाळा असताना, या मुलाला नववीचं पुस्तक कुठून मिळालं असेल? हा विचार करत सर त्याच्या जवळ गेले.

‘‘बिस्वा, तुला हे गणित कुठून मिळालं?’’

‘‘सर, बाबांनी गौहाटीवरून आमच्या ‘डब्बू’साठी गळ्यातील घंटी आणली होती, एका पुडक्यात बांधलेली. त्या कागदावर हे गणित होतं.’’ त्याच्या अशा मेहनती वृत्तीचं सरांना नेहमीच खूप कौतुक वाटे. पण त्या खेडय़ात त्याच्या तल्लख बुद्धीची योग्य मशागत होत नाहीये याचं त्यांना फार वाईट वाटे.

‘‘मी तुला आठवी, नववी, दहावीची गणिताची पुस्तकं आणून देईन हं? आणि विज्ञान परीक्षेची तयारी पण करवून घेईन.’’ सर म्हणाले तसे बिस्वाचे डोळे आनंदाने चमकले.

आपलं फाटकं दप्तर खांद्याला लावून तो बाहेर पडला. त्याला घरी जायची खूप ओढ असे. त्याचं कारण होतं त्याचा डब्बू- त्याचा गोंडस गब्रू हत्ती! जाताना पायवाटेवर थांबून त्याने दप्तरातील विळा काढला आणि सपासप गवत कापून त्याची एक पेंढी बनवली. बिस्वा त्याच्या खोपटापाशी पोहोचला तेव्हा डब्बूने सोंड वर उचलून त्याचा नेहमीचा आवाज केला.

‘‘डब्बू, अरे होऽ, आणलाय तुला चारा, हे घे. मॉं, बाबा कुठं गेले?’’ डब्बूसमोर चारा टाकत त्याने आईला विचारलं.

‘‘गौहाटीला कारखान्यात गेलेत. तिथं काही काम मिळतं का बघायला.’’

‘‘तिथं का? आज डब्बूला जंगलात नाही न्यायचं का? तिथं मिळतात की पैसे!’’ मॉंनं काहीच उत्तर दिलं नाही. गौहाटीजवळ बऱ्याच लाकडाच्या वखारी होत्या. तिथं आजूबाजूच्या जंगलांतील लाकडी ओंडके कापले जात. चंगसारीच्या जंगलात खूप जुने वृक्ष होते, जे तोडण्यास परवानगी होती. तिथल्या झाडांचे तोडलेले मोठे ओंडके उचलून एका ठिकाणी गोळा करण्याचं काम डब्बू हत्ती करत असे. तेथील ठेकेदार या कामासाठी डब्बूला बोलावत आणि मग बाबाला थोडेफार पैसे मिळत.

‘‘मी नेऊ डब्बूला जंगलात?’’ बिस्वाने विचारलं.

‘‘काही नको. तू तुझा अभ्यास कर!!’’ मॉं जरा फणकाऱ्यानेच म्हणाली.

आज अचानक मॉंला काय झालं असं विचार करत त्यानं डब्बूला मोकळं केलं. आपल्याला आता अंघोळ करायला मिळणार याचा डब्बूला खूप आनंद झाला. आपले मोठाले कान फडफडवत त्यानं आपली भली मोठी सोंड बिस्वाकडे वळवली. बिस्वा पटकन् त्यावर बसला. अगदी सफाईने डब्बूने सोंड वर करून त्याला आपल्या पाठीवर बसवलं. आपल्या धडय़ातील आसामी कविता म्हणत बिस्वाची सवारी तळ्यापर्यंत पोहोचली. पाठोपाठ वस्तीतील दोन-चार पोरंही तिथं पोहोचली. कारण सगळ्यांनाच डब्बूचा खूप लळा होता.

डब्बू पाण्यात फार मस्ती करत असे. सोंडेत पाणी भरून फुऽस्स करून सगळ्या बालचमूच्या अंगावर फवारणं, पाण्यात धप्पकन् लोळण घेणं आणि मनसोक्त अंघोळ करणं हे त्याच्या अत्यंत आवडीचं होतं. अगदी छोटं पिल्लू असतानाच जंगलात जखमी अवस्थेत तो बिस्वाच्या बाबाला सापडला  होता. मॉ आणि बाबाने त्याची पोटच्या पोरासारखी काळजी घेतली होती- अगदी छोटय़ा बिस्वासारखी. बिस्वा आणि डब्बू म्हणजे जुळी भावंडंच जणू!

आजदेखील बिस्वा आणि बाकी पोरंसोरं डब्बूसोबत पाण्यात डुंबत असतानाच कालू ओरडतच आला. ‘‘बिस्वाऽऽ! ए बिस्वा! लवकर चल! तुझी मॉं रडतेय. तुला बोलावलंय घरी.’’

बिस्वाने डब्बूला पाण्याबाहेर काढलं आणि धावत सुटला. हत्ती वेगात धावू शकत नाही, पण डब्बूला जणू संकटाची चाहूल लागली होती, म्हणून तोही बिचारा त्याच्या कुवतीने घराच्या दिशेने धावू लागला.

‘‘काय झालं मॉं?’’

‘‘तुझ्या बाबाने डब्बूचा सौदा केलाय. तो मेला कंत्राटदार आहे नं, त्याला विकणार म्हणे!’’

‘‘डब्बूऽऽ!!’’ असा आकांत करत बिस्वा माघारी धावला. डब्बू मागून येतच होता. बिस्वाने त्याच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि मोठय़ानं गळा काढला.

‘‘तू कुठेही नाही जाणार डब्बू! तू माझा आहेस, फक्त माझा.’’ डब्बूला काय कळालं माहीत नाही, पण त्याच्या डोळ्यात पाणी साठलं होतं. थोडय़ा वेळाने बाबा आले. सोबत दास सर होते. सरांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता.

‘‘बिस्वा, तुला शिष्यवृत्ती मिळाली रे! तू मेरिटमध्ये पास झालाय!! शाब्बास!! आता तू न..’’

सर उत्साहात बोलत होते, पण बिस्वाचं सगळं लक्ष बाबाकडे होतं. बिस्वा बाबाला जाऊन बिलगला. ‘तुम्ही असं करूच कसं शकता,’ म्हणत भांडू लागला.

‘‘अरे, तुला आता शिष्यवृत्ती मिळालीये, तुला लवकरच गौहाटीला मोठ्ठय़ा शाळेत जायला मिळणार. तू खूप शिकणार.. मोठा होणार.’’

‘‘ते मला काही नको. डब्बू कुठंही जाणार नाही बस.’’ बिस्वा ओरडला.

‘‘हे बघ बेटा, आता साहेब लोक जंगलात मोठाल्या मशिन्स आणतात, कारण ओंडके उचलायला हत्तींना खूप वेळ लागतो. गेला एक महिना मला आणि डब्बूला कुठलंच काम मिळालं नाहीये. जवळ एक पसा नाही. मग तुला पुढं कसं शिकवू? तुला पण इथं या जंगलातच राहायचं आहे का आयुष्यभर?’’

बाबा आणि सर खूप समजावत होते, पण बिस्वा डब्बूला धरून बसला होता. मॉं पण सरभर झाली होती. त्या रात्री बिस्वा न जेवताच डब्बूजवळ बसून होता. आपण परीक्षेत (स्कॉलरशिप) विशेष प्रावीण्य मिळवलंय याचाही त्याला विसर पडला होता. मॉंने कितीदा त्याला आत बोलावलं, पण तो मुळीच जागचा हलला नाही.

सकाळी मॉं बाहेर आली. बिस्वा जागेवर नव्हता. तिने आजूबाजूला बघितलं. मित्रांकडे पाहिलं, छोटंसं खेडं ते, लगेच समजलं की बिस्वा गावात नाही. बाबा दास सरांना भेटायला शाळेत गेले. नेमके सर सुटीवर होते. आता मात्र मॉं आणि बाबा घाबरले. डब्बूपण सारखा चीत्कारत होता.  छोटासा बिस्वा नाराज होऊन आत जंगलात कुठे गेला असेल का, या विचाराने मॉं आणि बाबा पुन्हा जंगलात गेले.

दुपार उलटली. बिस्वा घरी आला नव्हता. मॉं, बाबा आणि डब्बू निराश मनाने सुन्न बसले होते. काही मिनिटांतच डब्बू आनंदाने डोलायला लागला. त्याला कशाची चाहूल लागली म्हणून मॉं बघू लागली. दास सरांसोबत मोटरसायकलवरून बिस्वा येत होता.

‘‘माफ करा बाबूजी, तुम्हाला न कळवता आम्ही गेलो होतो, पण कुठे ते.. सांग रे बिस्वा.’’ सर म्हणाले.

‘‘मॉं, गौहाटीला ते मोठ्ठं मंदिर आहे न, त्यांना देवाची मिरवणूक काढायला हत्ती लागतो. सरांनी मला आधी याबद्दल विचारलं होतं. त्याची देखभाल करणाऱ्यांसाठी तिथं राहायला जागा आहे. बाजूलाच मोठी शाळा आहे. मला तिथं प्रवेश मिळेल. शिवाय मंदिराची सफाई आपण केली तर चांगला पगारदेखील मिळेल.’’ मॉं आणि बाबा तर हे ऐकून आवाक्च झाले.

‘‘सर, तुमचे उपकार कसे फेडू?’’

‘‘सगळं श्रेय तुमच्या बुद्धिमान मुलाला द्या. त्यानेच हा मार्ग काढला. आता बघा डब्बूचा हा बिस्वा किती मोठं यश मिळवेल.. हो ना रे बिस्वा?’’

बिस्वा तर केव्हाच डब्बूच्या सोंडेवरून अलगद त्याच्या पाठीवर चढून बसला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2020 4:04 am

Web Title: aparna deshpande balmaifal article abn 97
Next Stories
1 मनमैत्र : सकारात्मक विचार करा
2 दात पळून न जाण्याची गोष्ट
3 चित्रांगण : पतंग
Just Now!
X