एक एप्रिल म्हणजे आपल्या मित्रमंडळींना ‘एप्रिल फूल’ बनवण्याचा दिवस. त्या दिवशी लोकांना त्यांचा विश्वास बसेल अशा थापा मारायच्या. किंवा अस्तित्वातच नसलेल्या गोष्टी आहेत असे भासवायचे व ते फसले की त्यांना एप्रिल फूल म्हणून चिडवायचे. जगभरातील लोक आपापल्या देशाच्या संस्कृतीनुसार त्या दिवशी एकमेकांच्या खोडय़ा काढून आणि गमतीजमती करून एप्रिल फूल साजरा करतात. आपल्या मित्रमंडळींची फजिती करण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या शोधतात; पण आपण कोणाची फजिती करण्यात यशस्वी होतो की आपलीच कोणाकडून फजिती केली जाते, याबद्दल मात्र सगळे जागरूक असतात. एप्रिल फूलचा विशेष म्हणजे या खोडय़ा आणि चिडवणे कोणी गांभीर्याने घ्यायचे नसते. आपली कोणी चेष्टा केली, फजिती केली तरी ती खेळीमेळीने घेऊन त्यातली मजा अनुभवायची असते.

या सगळ्याची सुरुवात कशी झाली याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातल्या एका फ्रेंच कथेनुसार पंधराव्या शतकात फ्रान्समध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरात होते. त्या कॅलेंडरप्रमाणे नववर्षांची सुरुवात २५ मार्च ते १ एप्रिल या आठवडय़ात होत असे. या आठवडय़ात सगळे लोक वसंत ऋतूचे स्वागत व १ एप्रिलला नववर्ष साजरे करत असत. फ्रेंच लोकांनी १५८२ मध्ये जॉर्जयिन कॅलेंडर अंगीकारले. या नवीन कॅलेंडरनुसार १ जानेवारीला नववर्षांचा प्रारंभ होत असे. हा बदल काही लोकांना मान्य नव्हता, तर खेडय़ापाडय़ांतील लोकांना हा बदल केलेला कळला नव्हता. त्यामुळे ते पूर्वीप्रमाणेच १ एप्रिलला नववर्ष साजरे करत राहिले.

उच्चभ्रू फ्रेंच लोकांनी आपल्या या अश्वानी देशबांधवांना ‘मूर्ख- फूल्स’ ही उपाधी दिली आणि जे लोक जुन्या कॅलेंडरनुसार १ एप्रिलला नववर्ष साजरे करत राहिले त्यांना ‘एप्रिल फूल’ संबोधल गेलं. अशा तऱ्हेने १ एप्रिलला ‘एप्रिल फूल’ करण्याची पद्धत हा हा म्हणता युरोपभर आणि कालांतराने इतर देशांत पसरली.

आजही फ्रेंच मुले आपल्या शाळेतील मित्रांच्या नकळत त्यांच्या पाठीवर कागदाचा मासा करून चिकटवतात. जेव्हा त्या मुलाच्या हे लक्षात येते तेव्हा सगळी त्याला ‘एप्रिल फिश’ म्हणून चिडवतात.

पोर्तुगालमध्ये लेंटच्या (ईस्टरपूर्वीचा ४० दिवसांचा काळ) आधीचा रविवार आणि सोमवार हा एप्रिल फूल म्हणून साजरा करतात. त्या वेळी ते एकमेकांच्या अंगावर पीठ फेकून खोडय़ा काढतात.

डेनमार्कमध्ये १ मे हा विनोद दिवस मानला जातो व त्याला ‘मे कॅट’ असे म्हणतात. स्वीडन व इतर स्कॅन्डिनेव्हियन देशांत इतर देशांप्रमाणे १ एप्रिल हाच एप्रिल फूल म्हणून साजरा करतात.

आपल्याकडेही लहान-मोठे सगळेच जण एप्रिल फूलची वाट बघत असणार. उद्या कोणाची कशी फजिती करायची, याबद्दल त्यांचे बेतही चालले असणार.